भूतबंगला आज खूप दिवसांनी तुमच्या भेटीला येत आहे...मित्रानो ही केवळ भयकथा नाही...
सावध – सुचिता घोरपडे
आबासाहेबांचा वाडा आज रंगरंबेगी फुलांनी आणि लाईटांच्या माळांनी फुलून गेला होता. वाडयाचा जणू कायापालटच झाला होता. सगळया कामकरी बाया माणसाची लगबग चालली होती कारण आज क्षणही असाच होता. आबासाहेबांच्या धाकटया मुलाचे लग्न होते. लग्न जरी वाडयात नसले तरी बाकी सगळे विधी वाडयातच होणार होते, त्यामुळे वाडयाला असे राजमहालासारखे सजविण्यात आले होते. आबासाहेबांची या सगळ्या गोष्टीवर जातीने देखरेख होती. कशाचीही कमतरता नव्हती. पै पाहूण्यांची तर खास बडदास्त ठेवण्यात आली होती.
शेवटी आबासाहेबांच्या इज्जतीचा प्रश्न होता. आबासाहेबांना प्रत्येक गोष्ट ही अगदी अचूकच लागायची. त्यासाठी ते काहीही करत. मग ते घर असो वा चावडी. त्याशिवाय का त्यांचा पंचक्रोशीत एवढा नावलौकीक होता आणि त्याचबरोबर तेवढी जरब, दराराही होता. पण ह्यावेळी एवढया शानोशौकतीला कारणही तसेच होते. धाकटयाचे लग्न धाकटी सून थोरलीच्या मानाने जरा जास्तच श्रीमंत होती. त्यामुळे त्यांच्यासमोर आपला बडेजाव कुठेही कमी पडू द्यायचा नव्हता आबासाहेबांना. तसे पाहता थोरलीच्या घरची माणसे खूपच साधी होती. अगदी थोरलीच्या स्वभावासारखीच अत्यंत गरीब.
लग्नाचा मुहूर्त जवळ आला. मुलीकडील लोकांनी कशाचीही कमी पडू दिली नाही. अगदी आबासाहेबांच्या मानाला शोभेल असेच लग्न झाले. अक्षता पडल्या. जेवणावळी झाल्या. आणि मुलीची पाठवणी करून मुलीकडील मंडळी निघाले. वाडयामध्ये नव्या नवरीचे अगदी थाटामाटात स्वागत झाले. नवी नवरी या सगळ्यामुळे थोडी दिपूनच गेली. वाडयात लग्नाचा गोंधळ घालण्यात आला. पूजा झाली,कुलदेवतेचे दर्शनही झाले. मग ती आपल्या माहेरीही जावून आली.
नवी नवरी वाडयात आता हळूहळू रूळू लागली. पण तिला तिच्या जाऊबाईंची उणीव सारखी भासत होती. कश्या असतील त्या. लग्नात फक्त एवढेच कळाले होते की त्या बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या आहेत. सासूबाईंचा तर स्वर्गवास फार पूर्वीच झाला होता त्यामुळे वाडयात आता तसे पाहता फक्त धाकटीच होती. तिला नणंदही नव्हती, जिच्यासवे तिला आपल्या मनाच्या गूजगोष्टी करता येतील.
एवढया मोठया वाडयात धाकटीला कशाचीही उणीव नव्हती पण असे काहीतरी होते अनाकलनीय अदृश्य जे फक्त तिलाच जाणवत होते. कुणाचातरी भास जो अगदी तिच्या आजूबाजूलाच सतत वावरत असे. कुणाला विचारावे तर काय म्हणतील आपल्याला असे वाटून ती गप्प बसली. रोज रात्री तिला एक बाई अंगाई गीत गात असल्याचे ऎकू येई. तिने खुप शोध घेतला पण तो आवाज कुठून येतो ते तिला कळतच नसे. अगदी न चूकता रोज तो आवाज येई मग असे वाटले की एखादी आई वाडयाजवळ राहत असावी जी आपल्या बाळाला अंगाई गीत गाऊन झोपवत असेल.
आज ती पहिल्यांदाच वाडयाच्या स्वयंपाक घरात आली. इतकी गडी माणसे होती की तिथे जाण्याची वेळच येत नव्हती ती काही मागण्याच्या आतच तिला सगळे हजर होई. तसा आबासाहेबांचा आदेशच होता. पण किती झाले तरी वाडयाची सून होती ती. साहजीकच इतर मुलींसारखे तिचेही मन या अश्या गोष्टीतच रमत असे. जेव्हा ती स्वयंपाक घरात गेली तेव्हा तिला सतत असे वाटत होते की कुणीतरी आहे ज्यांची नजर आपल्याला रोखून पाहत आहे. काहीही करताना एक वेगळीच मनाची अवस्था झाली होती तिची. तिचे मन आता सारखे घाबरू लागले होते. कोण माझा असा अदृश्य पाठलाग करत आहे.
एक दिवस आबासाहेबांनी धाकटीला बोलावून वाडयाच्या किल्ल्यांचा जुडगा तिला दिला.तिने तो थोरलीचा हक्क असल्याचे बोलता आता थोरल्या बाळंतपणातून परत येईपर्यत तुम्हालाच हे सगळे सांभाळावे लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे आता धाकटीचा बराचसा वेळ वाडयाच्या देखभालीतच जाई.
एक दिवस धाकटी वाण सामानाची यादी भंडार खाण्यात तपासून पहात असता वेगळेच घडले. त्या खोलीतील अत्यंत जीर्ण झालेले एक झुंबर अचानक कोसळले. ते धाकटीच्या डोक्यात पडणार इतक्यात नवल झाले तिला कुणीतरी खेचून बाजूला केले. ती खूप घाबरली होती तिला कळालेच नाही आपल्याला कोणी वाचविले कारण त्यावेळी तिथे ती एकटीच होती. त्यानंतर काही दिवसांनीही असेच घडले. तिचे आईवडील आल्याचे तिला कळताच ती धावत पळत जिण्यावरून उतरत असता अचानक तिचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात परत एकदा तिला कुणीतरी सावरले. हे काय होत आहे आपल्या बरोबर, अशी कोणती अदृश्य शक्ती धाकटीला नेहमी अश्या संकटातून वाचवत होती.
खुप वेळा धाकटीने याबाबत घर गडया पासून माळी पर्यत सगळ्यांना विचारले होते पण कोणीच याबाबतीत तिची मदत करत नव्हते. उलट त्यांच्यातही आता कुजबूज चालू झाली होती. आता काहीही झाले तरी याबाबत नव-याशी बोलायचे असे धाकटीने ठरविले. पण त्यानेही तिचे समाधान नाही केले, तूला कदाचीत भास होत असतील असेच सांगितले. वहीनी आल्या की तुला सोबत होईल असेही म्हणता तिला त्यांची खरच गरज वाटू लागली. त्या जर असत्या तर धाकटीला कधीच असे एकटे वाटले नसते. त्यामुळे तिने थोरल्या दीरांना याविषयी विचारले. तर तेही असेच म्हणाले की बाळ झाले की ती येईलच. लग्न झाल्यास धाकटीने कधीही थोरल्या दीरांना हसताना पाहिले नव्हते, नेहमीच ते कुठल्यातरी मानसिक दबावाखाली असल्यासारखे वाटत होते. नव-याला याविषयी विचारले तर वहीनीचा याआधी पाचवेळा गर्भपात झालेला आहे त्यामुळे त्यांची यावेळी खूप काळजी घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे असे तो म्हणाला. धाकटीने खूप वेळा त्यांना भेटायचीही इच्छा दर्शविली पण काही ना काही कारणामुळे ते शक्य नाही झाले.
आणि एक दिवस निरोप आला की थोरल्या बाळंतपणात बाळासह देवाघरी निघून गेल्या.तिला खुप दुःख झाले. एकदाही त्यांना न भेटल्याची खंत मात्र धाकटीला लागून राहीली. काही दिवसानी धाकटीला दिवस गेले. सगळा वाडा आनंदाने भरून गेला. ती खूप खुष होती.तीन महिने झाले होते. आज जेव्हा ती डॉक्टरांच्या कडून आली तेव्हा पहिल्यांदाच सगळे थोडे उदास वाटले. इतक्यात तिचा नवरा आला आणि उद्या परत आपल्याला दवाखान्यात जावे लागेल असे सांगितले. कारण विचारले असता बाळाच्या हितासाठीच जात आहोत बाकी काही विशेष नाही. फक्त एक इंजक्शन घ्यावे लागेल असे तो म्हणता ती गप्प बसली.
आज परत तिला ते अंगाई गीत ऎकू आले. आज तिला त्या आवाजात खूपच आर्तता जाणवत होती आणि ती आपोआपच त्या आवाजाकडे ओढली जाऊ लागली. आज त्या आवाजाच्या खूपच जवळ पोहचल्याचे तिला जाणवत होते. चालत चालत ती वाडयाच्या परसदारी एका कडूनिंबाच्या झाडाखाली आली. आणि अचानक वारा वाहू लागला. पक्षांच्या किलबिलाटांनी झाड भरून गेले.तिला खूप भिती वाटू लागली. आपण उगाचच इकडे आलो असे वाटून ती परत माघारी वळली तोच तिला आवाज आला.
“थांब, नको जाऊस; ऎक माझे एकदा.” ती भितीने कापू लागली,तिला आता पूर्ण जाणीव झाली की वाडयात वावरणारी हीच ती अदृश्य शक्ती आहे जी सतत आपल्या आजूबाजूला वावरते. तिची स्पंदने वाढू लागली. सगळा आवेष गोळा करून ती प्रचंड वेगाने तिथून निघणार तोच तो आवाज परत आला.
“थांब, नको जाऊस; ऎक माझे एकदा.नाहीतर तुझीही तीच स्थिती होईल जी माझी झाली.” हे ऎकून तिने धाडस केले आणि धीर धरून मागे पाहिले.तिला धक्काच बसला,ती व्यक्ती दुसरे तिसरे क़ुणी नसून तिची थोरली जाऊ होती. “जा...जा..जाऊबाई तुम्ही,प..पण तुम्ही तर ?....”
“घाबरू नको,मी तर तीन महिन्यापूर्वी देवाघरी गेलेय मग इथे कशी आले, हेच विचारायचे आहे ना तुला? पण मी तर कधीच हे जग सोडून गेले आहे. अगदी तुझ्या लग्नाच्याही अगोदर.”
“ म..म्हणजे मला नाही समजले.”
तिने सगळा धीर एकवटून तिला विचारले. “म्हणजे मी सांगते तुला सगळे; तुझ्यासारखेच एक नवी नवरी म्हणून मी या वाडयात आले. माझेही खुप उत्साहात स्वागत करण्यात आले. एक दिवस मला दिवस गेल्याची बातमी कळाली. सारेजण फार खुषीत होते. माझे सग़ळे लाड पुरविले जात होते. अशात तीन महिने कधी संपले कळालेही नाही. मग एक दिवस डॉक्टरांच्या कडून कळाले की माझ्या पोटात वाढणारे बाळ मुलगा नसून मुलगी आहे. आणि इथेच चालू झाला मग गर्भपाताचा विनाशकारी खेळ.” “काय .....? गर्भपाताचा खेळ म्हणजे मला नाही समजले?”
“ हो .. गर्भपाताचा खेळ. माझ्या उदरातील अजाण जीवांचा खेळ. ज्यांना अत्यंत क्रुरतेने संपविले केले माझ्या पोटातच. त्यांच्या जन्माचा हक्क हिरावून घेण्यात आला. माझी साधी संमतीही कधी घेतली नाही गं ह्या लोकांनी.”
“पण असे कसे घडू शकते? तुम्ही वाडयात नसताना मी खूपवेळा तुमच्या फोटोसमोर थोरल्या भाऊजींना रडताना, उदास होताना पाहिलेय. ते असे कसे करू शकतील.?”
“ते काय आणि धाक़टे बाळासाहेब काय...सगळे आबासाहेबांच्या हातातील चावीचे खेळणे आहेत.”
“म्हणजे हे सगळे आबासाहेबांनी केले असे तुम्हाला म्हणायचे आहे?”
“हो...हो.. त्यांनीच. कारण आबासाहेबांना वाडयाला वारस हवा होता. आबासाहेबांच्या साम्राज्याला सांभाळणारा मुलगाच हवा; हा आज पर्यत चालत आलेला घराण्याचा विधीलिखीत नियमच होता आणि त्याचसाठी पाचवेळा माझ्या मुलींना ह्या जगाचे तोंड देखील दाखविण्यात नाही आले. पण पाचव्या वेळा माझ्या शरीराने साथ दिली नाही. माझ्या साध्या भोळ्या आईवडीलांना धमकावून माझ्या मृत्यूची बातमी जगाला कळू दिली नाही. कारण तसे झाले असते तर आबासाहेबांच्या मानमरतबाला ठेच लागली असती. आबासाहेबांना आपल्या इज्जतीपेक्षा काहीही मोठे नाही. त्यांच्या धाकाने हे कधी बाहेरच आले नाही. मी नेहमी तुला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आज मला यावे लागले तुझ्यासाठी, तुझ्यासमोर तुला सावध करण्यासाठी.”
“म्हणजे मला कळाले नाही?”
“कारण तुझ्याही गर्भात एक कोवळा जीव, एक कोवळी कळीच आहे.त्या निष्पाप अजाण जीवाचा बळी मला जावू द्यायचा नाही आहे. वाचव तिला...त्या पोरीला तर या जगात येऊ दे,मोक़ळा श्वास घेवू दे.......”
आणि मग......दूस-याच दिवशी धाकटी पहाट होण्याआधीच वाडा सोडून बाहेर पडली.