सुंदर कथा...वाचत असताना हरवून गेलो मी तिच्या विश्वात....
विक्रम
अल्बम - ऋचा घाणेकर थत्ते
“आई गं, बघ ना गेल्या वर्षभरात मी बरंच काही अचिव्ह केलं नाही? बघ ना हा अल्बम... या आमच्या कवितांच्या मैफलीचे पंधरा प्रयोग झाले. पाच कथा लिहिल्या. केतनकडे दोनगाणी गायले. एक गाणं मला चालीसकट सुचलं. स्क्रिप्ट्स तर बघ कोणाकोणाला लिहून दिली. आपले सण आणि शास्त्र यावरची व्याख्यानंही मस्त झाली. चांगला विचार पोचला. नाट्यशिबिरही मनासारखं घेतलं गेलं. मुलांनी खूप मजा केली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट.. व्यावसायिक नाटकातला लीड रोल. एक स्वप्न पूर्ण झालं. असो आता उद्यापासून नवं वर्ष नवा ध्यास.”
तेवीस वर्षांची मीनल फेसबुकवरचे जुने फोटो पहात होती. आणि तिची आई सानिका कौतुकानं ते पहात होती. मीनूचा दरवर्षी वाढदिवसाचा हा कार्यक्रम असायचाच झोपण्याआधी वर्षभराची उजळणी करायची आणि नव्या उत्साहानं नव्या स्वप्नांना भिडायचं. अष्टपैलू मिनू प्रत्येक संधीचं सोनं करायचीच.
सानिकानं कपाटातून एक पिशवी काढली आणि म्हणाली
“मिनू, सगळे फोटो तू सेव्ह केले आहेसच. पण माझ्यासाठी एक कर ना.. त्याच्या प्रिंट काढ आणि यात लाव. जागा आहे अजून यात.”
सानिकाच्या हातात एक जुना अलबम होता. मिनूने तो उघडला. १८-२० वर्षाची सानिका दिसत होती. बक्षीसं घेताना, मान्यवरांच्या मुलाखती घेताना, भाषण करताना, शकुंतलेच्या भूमिकेत...फोटो पहाता पहाता सानिका आठवणीत हरवली. खरंच हे जगलोय आपण? की स्वप्न होतं हे? शेवटच्या फोटो नंतरच्या घटना वेगानं डोळ्यासमोरून सरकत गेल्या.
घरातली मोठी मुलगी, बेताची परिस्थिती त्यामुळे बी.ए.चा रिझल्ट लागला आणि बाबांनी स्थळं पहायला सुरुवात केली. पहिल्याच स्थळाने होकार दिला. नकार देण्यासारखं काही नव्हतंच, मग काय सानिका गोखलेची सानिका जोशी झाली. कॉलेजचे फुलपंखी दिवस केव्हाच मागे पडले. सासरचे लोक उच्चशिक्षित होते. मात्र चाकोरीबाहेर जाणं माहीतच नव्हतं. त्यामुळे सानिकाची घुसमट व्हायची. तालमींना वेळ नाही देता येणार म्हणून नाटक आणि गाण्याचे कार्यक्रम तिनं थांबवलेच. पण लेखन आणि कथाकथन, व्याख्यानं तरी सवडीनं करता येतील असं वाटलं होतं. एका दिवाळी अंकात तिची कथा छापून आली. आई मुद्दाम तिच्या आवडीच्या करंजा घेऊन आली होती. तेव्हा सासूबाई म्हणाल्या.
“बाईच्या जातीनं बाहेर कितीही दिवे लावले तरी घराची घडी नीट तिलाच बसवायची असते.”
खरं तर हे ऐकवण्याची काहीच गरज नव्हती वाटून गेलंच तिला. पुढच्याच महिन्यात कथाकथनासाठी बोलावणं होतं एका ठिकाणी. दिवसभर पाहुण्यांच्या गडबडीत वेळ झाला नव्हता तर रात्री जागून तयारी करायची होती. पण महेशने
माझ्यापेक्षा का कथाकथन महत्वाचं आहे?”
म्हणत तिच्या उत्साहावर बोळा फिरवला होता. मग मिनूची चाहूल लागली आणि मग मात्र स्वतःची अशी स्वप्न मिटलीच. तानपुराही कोपऱ्यात पडून राहिला आणि कविता-कथांच्या वहीतल्या रिकाम्या पानांवर जमाखर्च लिहिला गेला. नाही म्हणायला मिनूच्या स्पर्धा, पाठांतर, गाण्याचे क्लास, नाटकाची शिबिरं यात सानिका स्वतःची हौस शोधत होती. बघता बघता मिनूही लग्नाची झाली. समाधान एकच होतं. मिनूनं स्वतःचं स्वतः लग्न ठरवलं होतं तिच्या मैत्रिणीच्या मुलाशीच सुबोधशी. अभिरुचीसंपन्न घरात जाणार होती मिनू. आपली स्वप्न आता हीच पूर्ण करेल म्हणून सानिका तिला प्रिंट आणायला सांगत होती.
“आई अगं ऑल राऊंडर आहेस तू आणि मला हे आज कळतंय?”
मिनूच्या बोलण्यात आश्चर्य होतं आणि तिला हेही समजत होतं आपल्याला सतत प्रोत्साहन देणारी आईच होती एकटी. सगळं क्षणात समजून ती म्हणाली
'भांडली का नाहीस तू बाबांशी, आजीशी... '
“त्यानं काय झालं असतं. बाळा कला ही कलेकलेनं वाढते, मनाला आनंद देणारी असते. पण या आनंदावर विरजणच पडणार असेल, तेही सातत्यानं.. तर कशाला आपणच कलेचा अपमान करायचा? त्यापेक्षा मन मारून जगावं हेच बरं. चूक का बरोबर हे माहित नाही पण हाच विचार केला मी तेव्हा. घरातली शांती ढळण्यापेक्षा एकटी मन मारून जगले, तर बाकीचे तरी आनंदात राहतील. तुझ्या बाबांच्या भाषेत मी काही न करून काय असं बिघडणार होतं?”
''अगं आई, पण तुझा आनंद...''
''आटापिटा करून, वाद वाढवून काय आनंद मिळणार होता मला? शेवटी आपलं यश कोणाबरोबर वाटता आलं तर त्याला अर्थ असतो ना? म्हणून मग घेतले स्वतःचे पंख मिटून, विस्तारत चाललेला परीघ पुसला आणि बंद केलं स्वतःला तुझ्या बाबांनी आखून दिलेल्या चौकटीत. आणि कोण म्हणतं मी आनंदात नाही? तुला घडताना पाहिलं. अजून काय हवं मला? म्हणून म्हणतेय प्रिंट आण आणि लाव यात माझ्यासाठी. तू सासरी गेलीस की मी...”
“सॉरी आई ते मला जमणार नाही. फोटो लावायचे तर तूच लाव आणि तुझे लाव. अगं काय बोलतेस मिनू? आई यु आर जस्ट फोर्टि फाईव्ह, वेळ नाही गेलीये. आजी आजोबा नाहीत आता. माझं लग्न होईल. बाबा टूरवर असतात. हीच वेळ आहे तुला स्वतःसाठी जगायची. आणि आय नो तू टचमध्ये आहेस. सुरुवात कर. गृप जॉईन कर एखादा. सगळ छान होईल. ऑल द बेस्ट!!! “
“खरंच आपल्याला का नाही सुचलं? कुणीतरी कर म्हणायचा अवकाश होता. ते या लेकीनं केलं.”
सुबोधचा फोन आला तशी मिनू बाहेर गेली.
सानिका अल्बमची कोरी जागा पहात राहिली. ब्लॅक अँड व्हाईट अल्बमची उरलेली पानं रंगणार होती तिच्या पूर्ण झालेल्या स्वप्नांनी. नकळत ती गुणगुणू लागली..एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी!!!