कांचन दीक्षितची ही कथा...काल दुपारी हातात आली आणि तिने आल्या आल्या आपले अस्तित्व सिद्ध केले. ती आली आणि ती जिंकली...मी भारावलो...आणि ठरवले ही उद्याच पोस्ट करायची...काही कथा रांगेत उभ्या राहणाऱ्या नसतात.
सुई दोरा - कांचन दीक्षित
आमची सोसायटी तशी जुनी बैठी घरं असलेली. येताना जाताना चेहे-यांनी ओळख सगळ्यांशीच होती. नेहमीचा रस्ता. कॉलेजहून परत येताना माझ्या घराच्या दोन तीन घरे अगोदर एका घराच्या भिंतीवर नवीन पाटी लावलेली दिसली...लेडीज टेलर्स म्हणून. नवीन कुटुंब आलेलं दिसतंय. एखादा ड्रेस टाकून बघावा. मनात विचार आला.
मग दुस-या दिवशी ती दिसली. खिडकीजवळ सुई दो-याने काहीतरी शिवत बसलेली. साधारण माझ्याच वयाची गोरीपान सुंदर आणि लक्ष वेधून घेणारे मोठे केस. पलीकडे मशीनचा खडखड आवाज येत होता. एक किडकिडीत मध्यमवयीन गृहस्थ कपडे शिवत होता नाकाच्या टोकावर आलेला चष्मा. ओझरतं इतकच दिसलं.
मग रोज ती दिसायची. तशीच. एकदा तिने मान वर करून बघितलं. मी पाहिलं तर छानशी हसली. मग एक दिवस मी गेले शिलाईची चौकशी करायला. तिचे वडील होते ते, आई आत मध्ये स्वैपाक करत होती. बाहेरची खोली हेच दुकान. शिवलेले कपडे भिंतीवर लावलेले होते. बोलून झाल्यावर मला सोडायला बाहेर आली. घराबाहेर ओटा होता तिथेच बोलत उभे राहिलो पण तिच्या हातात कापड आणि सुईदोरा तसाच होता. मग एकदम काहीतरी लक्षात आल्यासारखी ती ओट्यावर बसली आणि कापड उघडले. सुंदर भरतकाम सुरु होते. सुरेख रंग आणि सुबक नक्षीकाम.
'आपण बोलूया पण मला काम करावे लागेल " ती म्हणाली
"चालेल की" माझं उत्तर.
मग मला एक मैत्रीणच मिळाली. आम्ही नियमित ओट्यावर बसून गप्पा मारायचो. तिने बारावी नंतर शिक्षण सोडले होते. वाईट वाटले.
'कॉलेज मध्ये जाऊन काय करायच? बाबांना आवडत नाही. शिवाय माझ्याशिवाय त्यांना मदत करणारे कोणी नाही. तिचा भाऊ चार पाच वर्षांचा असावा. खेळताना दिसायचा. मग मी तिला कॉलेजच्या गमती जमती सांगायचे. ऐकताना कधी कधी दोरा थांबायचा. मग नाकावरच्या चष्म्या पलीकडचे डोळे दिसले की परत वेगाने धावू लागायचा.
मी तिला म्हणायचे
"माझ्या घरी ये ना कधी"
तर तिला सारखे काम असायचे. शिवणकाम. तिला फिरायला, खरेदीला, सिनेमाला बाहेर येतेस का? विचारले तरी उत्तर ठरलेले. एकदा बाहेरून पिशव्या घेऊन येताना दिसली मी विचारलं
"अग मी पण आले असते. कुठे गेली होतीस?
तर म्हणाली
"शिवणाचे साहित्य आणायला"
आता मला तिच्या वडिलांचा राग येऊ लागला होता.
एक दिवस माझी वाट पहात ती दारात उभी दिसली. मी जवळ जाताच माझा हात घट्ट हातात घेत म्हणाली
"माझं लग्न ठरलंय”'
आणि चेहे-यावर आनंद दिसत होता. तिला फक्त पाहून एका देखण्या तरुणाने तिला मागणी घातली होती. एकच जात होती. मुलाचे आई वडील फक्त एक नारळ आणि मुलगी द्या या शब्दात मुलीला मागणी करून गेले होते.
'लग्न करेन तर याच मुलीशी नाहीतर करणार नाही' मुलाचे शब्द होते. श्रीमंत घर सुखवस्तू कुटुंब . मला तर एखाद्या चित्रपटाच्या नायिकेसारखी भासली ती. दोरा तसाच धावत होता. पण आता कापडावर सुई नाचत होती बागडत होती. घरातल्या घरात साखरपुडा झाला.
एक दिवस ओट्यावर ती दिसली. जराशी उदास. वडील लग्न पुढे ढकलत होते, घराचे हफ्ते बाकी होते. अजूनही अडचणी होत्या. मुलगा भेटायला येत असे. लग्नाला विलंब त्याच्या घरच्यांना पटत नव्हता.
"आपण लग्न करून तुझ्या बाबांना भेटायला येऊ" मुलगा म्हणाला. "पण तू थांबू शकत नाही का?"
प्रश्न चुकले ऊत्तरे चुकली. आणि ती गप्प होत गेली.
अचानक आम्हाला घर बदलावे लागले. निरोप घेतांना
"सगळं चांगलं होईल" म्हणाले. हातात हात घट्ट धरला. निरोप घेतला.
हळूहळू संपर्क कमी झाला. एकदा रस्त्यात जुने शेजारी भेटले. विचारपूस झाल्यावर हळूच तिची चौकशी केली .
“तुला माहित नाही का? ती तर पळून गेली...”
मला आनंद झाला माझ्या कहाणीतल्या नायिकेने धाडसी निर्णय घेतला होता. आता सिंड्रेला राजपुत्रासह सुखात रहात असेल आणि पुढचं बोलणं ऐकू आलं “दोन मुलांच्या बापाबरोबर. ..जरा तरी विचार करायचा... “
मला ऐकवेना. घाईघाईने निरोप घेतला. घरी आल्यावर दार बंद करून रडून घेतलं. आता बरीच वर्ष झाली. विसरले आहे सगळं.
पण कोणी भरतकाम करतांना दिसलं की ती सुई काळजाला टोचत जाते. दो-यांचा रंग फिकट होतो आणि कट्ट असा आवाज करत दोरा तोडला की तिची आठवण येते.