ऐश्वर्यचे हे लेखन मी त्याच्या फेसबुकच्या भिंतीवर पहिले आणि त्याची सहसंवेदना मला विलक्षण भावली...असाह्यता हीच क्रांतीची पहिली पायरी असते..कधीतरी हा बाप हातात मशाल घेऊन उभा राहील...मेणबत्त्या पेटवून काय होतंय...???
विक्रम
लेकीचा बाप – ऐश्वर्य पाटेकर
लेकीच्या बापाचा रातीबेराती धपापून उठतो ऊर तो पुन्हा वर्तमानपत्र हातात घेवून चाचपून पाहतो बातम्या लेकीच्या संदर्भातली कुठलीच अनुचित बातमी त्याच्या हाताला लागत नाही म्हणून जरा डोळे मिटतो अन पुन्हा दचकून उठतो..
लेकीच्या बापाचं काळीज असतं काचेचं हलक्याशा धक्क्यानेही होऊन जातं चुरा चुरा लेकीच्या बापाला इतकं कुणी घाबरंवून सोडलंय?
लेकीच्या बापाचं मन जरा कुठे खुट्ट झालं की सशासारखं सैरावैरा धावतं लेकीचा बाप रात्रीनं नेसलेलं वस्त्र न्याहळून पाहतो त्याला कुठे काही रक्ताचा व्रण आहे का? कळवळून बोरीबाभाळींना विचारतो कुठे ओरखडलं का म्हणून..! तो चिमण्यांना विचारतो तो साळुंक्यांना विचारतो दिवसभरात तुमच्या काळजाला कुणी चोच तर नाही नं लावली?
लेकीच्या बापाच्या मनात सतत कुणीतरी पेरत आलंय दहशत, लेकीचा बाप झोपत नाही! लेकीच्या बापाची झोप कुणी पळवून नेलीय? लेकीच्या बापाला झोप येईल असं एखादंही अंगाईगीत इथं शिल्लक ठेवलेलं नाही..
आणि एकाएकी लेकीचा बाप अंधाराच्या दिशेनं धावत सुटला हजार पायांनी..
रात्रीचं वस्त्र फाटलं होतं बोरीबाभळींना ओरखडलं होतं चिमण्या अन साळुंकीच्या काळजाला चोच लागून रक्त रक्त अन पिसेच पिसे
आता मात्र लेकीचा बाप गाढ झोपी गेला त्याला कुणीच उठवू शकत नाही..