काय सुंदर कथा आहे...ही..व्वा...व्वा...!!
विक्रम
निशिगंध…गायत्री गोखले
“हॅलो अग ऐक ना, आपण लावलेल्या निशिगंधाला मोठा दांडा आलाय. आज दिवसभरात कधीही उमलेल. कधी येणार आहेस तू परत? ए, आणि आता मी ह्याचा फोटो पाठवणार नाहीए हं तुला.”
“अगं हो, येतेय मी. निघालेच आहे. हे काय गाडीतच बसतेय. लवकर पोहोचेन मी.” रेवाचा आजच्या दिवसातला हा पाचवा फोन होता, निशिगंधाचा दांडा आला हे सांगणारा.
मी ऑफिसच्या कामासाठी दोन-तीन दिवस मी शहराबाहेर गेले होते. मी कधी परतणार हे तिला पक्कं ठाऊक होतं तरीसुद्धा पाच-पाच फोन. मी बॅग भरून तयारच होते आणि एअरपोर्ट वर नेण्यासाठी गाडी आलीच. गाडीत बसताना मला हसूच आलं. एकाच दिवशी एकच गोष्ट सांगायला पाच वेळा फोन फक्त रेवाच करू शकते. रेवानं एवढे फोन करण्या इतक महत्वाचं असं खरंतर काहीच नव्हतं पण तिला कशाचंही अप्रूप असायचं आणि त्यातून जर ती फुलझाडं असतील तर मग झालंच…
विचार करता करता मी एअरपोर्टला पोहोचले. सगळे सोपस्कार झाल्यानंतर मी फ्लाईट मध्ये जाऊन बसले आणि पोहोचले एकदाची बेंगलोरला. घरी आले. दरवाजवरची बेल वाजवणार इतक्यात रेवानं दार उघडलं. तिनं दार उघडताच मी म्हणले,
”अगं काय दाराला कान लावून बसली होतीस की काय? मी बेल ना वाजवताच बरं कळलं तुला मी आलेय ते” असं म्हणत मी आत आले आणि बॅग टेकवली. तशी ती मला म्हणाली,
”मग काय गं, केव्हाची वाट बघतेय तुझी. तुला गाडीतून उतरताना पाहिलं आणि आले लगेच दार उघडायला. गॅलरीतच उभी होते ना मी”- रेवा.
“गॅलरीत? जागा तरी आहे का तिथे उभं राहायला?” मी हसत म्हणाले. त्यावर रेवा म्हणाली,
”ए, तू पुन्हा आलीस का माझ्या झाडांवर? आणि तसंही आपली चार पावलं मावतील एवढी जागा आहे कळलं ना!”
मी हसले फक्त, बोलले काहीच नाही; कारण मला माहीत होतं रेवाचं झाडप्रेम. तिचं म्हणणं असं होतं की, आपण झाडांची जागा त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यावर घरं बांधतो मग त्यांना आपल्या घरात राहायला थोडीशी जागा दिली तर बिघडलं कुठं…त्यामुळे आमच्या गॅलरीत खरोखरच आम्हा दोघींची चार पावलं मावतील एवढीच जागा होती बाकी सगळी फुलझाडं.. माझ्या मनात हे सगळे विचार चालू असतानाच रेवा म्हटली,
”बरं,ऐक मी वरण भात केलाय तू आवरून घे आणि मग जेवायला बस काय!” मी ‘बरं’ म्हटलं आणि आवरायला गेले.
रेवाच्या आग्रहपूर्ण आज्ञेतदेखील एक माया असायची, आपुलकी असायची ज्याविषयी कधीही संशय यायचा नाही किंवा त्याला कधीही स्वार्थाचा रंग दिलेला नसायचा आणि म्हणूनच सगळ्यात जवळची अशी तीच होती मला.
रेवा… रेवा – माझी कॉलेजातली मैत्रीण. आम्ही पुण्याला एकत्र होतो; शिकायला. दोघीही एमबीए करत होतो. पुढे योगायोगाने आम्हाला एकाच कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि आम्ही एकत्र राहायला लागलो..
रेवा, माझी कमालीची घट्ट मैत्रीण होती.. मात्र ही मैत्री होण्यापूर्वी आमचं जोरदार भांडण झालं होतं.. कारण फार काही मोठं नव्हतं पण आमच्या घरच्या वातावरणात कमालीचा फरक होता त्यामुळेच ते भांडण झालं.. निमित्त असं झालं होतं की, माझ्या घरुन माझ्यासाठी आलेलं एक एनव्हलप तिने उघडलं होतं. आणि आल्या आल्या तिनं ते माझ्या हातात देत मला सांगितलं होतं की,
”तुझ्या आईचं पत्र आलंय.. वाचलं नाहीए मी पण बघ.. पैसे आहेत त्यात बरेच”
हे ऐकल्यावर माझं डोकं फिरलं आणि मी तिला वाट्टेल तशी बोलले. माझं आणि माझ्या घरच्यांचं फार बरं नाही हे मला कोणालाच कळू द्यायचं नसायचं आणि असं असताना तिने पाकीट उघडल्याने मला राग आला आणि मी तिला बोलले. पण रेवाचा काही विचित्र किंवा माझ्या आयुष्यात लुडबूड करायचा हेतू नाही ह्याचा मला साधारण अंदाज आला; कारण काही काळापुरती ती माझ्याशी बोलली नाही.
रोज कॉलेजातून आल्यावर माझी चौकशी करणारी रेवा बोलेनाशी झाली; मलादेखील ते फार विचित्र वाटलं आणि मी तिची माफी मागितली तोच आमच्या मैत्रीचा पहिला दिवस. त्या दिवसानंतर ना रेवानी कधी त्या पाकिटाविषयी मला विचारलं ना मी कधी तिला सांगितलं… त्यादिवसानंतर आमच्या नात्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही
आमच्या नात्यात एक गोष्ट मात्र कायम आहे. माझ्या घरुन हे असं पाकीट आलं की, ते हातात देताना रेवा हमखास म्हणते,”उघडलं नाहीए हं मी.. नाही म्हटलं उगाच म्यानर्स पाळले नाहीत असं नको वाटायला तुला…” असं म्हणून स्वतःच हसायची.. आजही तिने हेच केलं. मला जरा ओशाळाल्यागत झालं. मी म्हटले,
”काय गं रेवा, मी एकदा बोलले होते तुला त्यावरून तू दर महिन्याला न चुकता ऐकवतेस.. इतकी वर्ष झाली आपल्या मैत्रीला.. गेले कित्येक महिने झाले एकत्र राहतोय असं असताना देखील तू असं का म्हणतेस प्रत्येक वेळेला? आणि मी तुला सॉरी म्हणले होते ना!”
“मजा केली गं. मला माहितेय तुझ्या मनात आता तसं काहीच नाही; पण महिन्यातला हा एकच दिवस असतो ना ज्या दिवशी तू जराशी उदास असतेस; मग जरा तुझा मूड चांगले करायचा प्रयत्न करते मी. तुलाही माहितेय, माझा तुला दुखवायचा हेतू नसतो.”-रेवा.
“ते माहीतच आहे गं;पण तुला खरं सांगू; माझ्या लहानपणापासून मी हेच पाहत, ऐकत आलेय त्यामुळे तसंच वागायचे मी. तुला सांगू का, मी माझ्या लहानपणापासून माझ्या घरात कोणाला मोकळं असं वावरताना पहिलंच नाही कधी. सतत काहीतरी लपवत आहेत असं वाटायचं.. कमालीची प्रायव्हसी जपायची. का? माहित नाही; पण जपायची. माझ्या आईचे कित्येक दागिने मला माहित नसायचे. प्रत्येक साडी तर नेसल्यावर कळायचं की असंही काही आपल्या आईकडे आहे. ‘स्टेटस’ ह्या एकमेव शब्दाभोवती माझं घर फिरत असतं. कोणाच्या तरी मुलीनी एमबीए केलं म्हणून मलाही करायला लावलं.
आमच्या घरचं वातावरणच कृत्रिम गं, स्टेटसच्या खोटया, कृत्रिम आणि अंधाऱ्या जगामागे धावणारे घोडे सगळे. स्टेटस-स्टेटस म्हणजे काय असतं, हेच मला कळलेलं नाही कधी. कोणाची तरी मुलं बोर्डिंग स्कूलला असतात म्हणून मी सुद्धा. पण ज्यांचं अनुकरण करत मला त्या बोर्डिंगमध्ये ठेवलं होतं, ते त्यांच्या मुलांना भेटायला यायचे. सुट्टीत ती मुलं त्यांच्या घरी जायची. मी मात्र फक्त वाट बघत असायची. माझ्या त्या वाट बघण्याचा शेवट अशाच एका पाकिटाने व्हायचा. मायेचेच शब्द आहेत असा स्वतःसाठी गैरसमज निर्माण करून घेत त्यात असलेलं ते रूक्ष पत्र मी वाचायची; पत्र कसलं, वर्षाचा आर्थिक अहवाल असायचा तो.
‘कोणी किती खर्च केला,कोणती नवी गाडी घेतली, ट्रिप्स किती झाल्या, पार्ट्या किती, किती रुपयांची दारू ढोसली इ..’ आणि मी हे सगळं न करून कशी स्टेटस जपत नाही, हे सांगणारं पत्र असायचं ते. नाही म्हणायला माझ्यासाठी एक दोन वाक्य असायची चौकशीपर पण तेवढंच.
आत्तापर्यंत मी माझ्या आई वडिलांचं तोंड कमी वेळा आणि माझ्या घरातल्या नोकरांच चं तोंड जास्त वेळा पाहिलंय. अगदी लहान असताना म्हणजे पाचवीत असताना मी घरी गेले होते तेव्हा माझे आई वडील टूरला निघून गेले आणि मला नोकरांनी सांभाळलं होतं, पुढे जेव्हा जेव्हा मी गेले घरी तेव्हा असंच झालं. मग मीच जाणं बंद केलं. तरीही पैसे येतच असायचे घरून पण मग मी एन्जॉय करायची. सुट्टीत पैसे आले की मस्त मजा करायची एवढंच कळायचं मला.
मलाही त्या सगळ्या भयाण जगात ओढायचा त्यांचा हेतू होता; मला वडिलांच्याच कंपनी मध्ये कामाला लावून. पण मला ते जमलंच नसतं. कामाच्या नावाखाली ऑफिस कॉन्टॅक्टस सोबत पार्ट्या करायच्या वगैरे. म्हणून मी नोकरीचा निर्णय घेतला. नाहीतर मलाही माझ्या घरी जायला आवडलंच असतं पण मुळात मी जिथे रहाते, त्याला घर म्हणावं की नाही इतकाही प्रश्न पडतो मला.
आताही पैसे येतायत पण गेले काही महिने म्हणजे कमवायला लागल्यापासून मी घरचे पैसे वापरणं बंद केलंय आणि तसंही काय गं, मी महागड्या वस्तू वापराव्यात म्हणूनच पाठवतात ना पैसे, पण त्यांना कुठं माहितेय कि मला त्या महागड्या गोष्टी नाही तर त्यांचं प्रेम हवंय; जे त्यांना कधीही कळणार नाही. म्हणूनच मी एक ठरवलंय रेवा.”
“काय?”- रेवा.
“जॉब करायला लागल्यापासून घरून येणारे हे पैसे मी एका वेगळ्या अकाउंटला ठेवतेय, मला ते पैसे परत करायचेत. येशील तू?”
“मी येऊन काय करू?”- रेवा.
“मला आधार मिळेल तुझ्या येण्याने, त्यांच्याशी बोलताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दाखवून देता येईल; नाती जपणं म्हणजे काय असतं ते. येशील प्लीज?”
“येईन. Don’t worry..”-रेवा.
“थँक्स रेवा, तुला माहितेय, गेले कित्येक दिवस मला हे सगळं बोलायचं होतं तुझ्याशी.” मी असं म्हटल्यावर रेवानी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हटली,
”जेवण तयार आहे चल जेवून घेऊ.” असं म्हणून ती kitchen कडे जायला निघाली. मी देखील उठले. जाताना वाटेत असणाऱ्या ग्यालरी मधून कसलातरी छान वास आला. ओळखीचा वाटला पण काही केल्या ओळखू येईना. मी रेवाला हाक मारली आणि म्हटले,
“अगं कसला तरी वास येतोय; छानसा!” माझं वाक्य ऐकून ती मागे आली आणि ग्यालरीकडे पाहत म्हणाली,
“निशिगंध फुललाय गं… त्याचाच सुगंध दरवळतोय.”
त्यावर मी हसले आणि म्हणाले, “आत्ताच बऱ्या उमलल्या गं ह्या कळ्या!”
“हो मग, झाडांना आणि विशेष करून फुलांना समजतं कधी उमलायचं ते, बघ आज आपली मैत्री खुलून आली आणि हा निशिगंधदेखील…”-रेवा हसून म्हणाली.
रेवाचं वाक्य ऐकून माझ्या डोक्यात बाकी काही नव्हतं, होता फक्त एक विचार, ’बाकी कितीही कृत्रिम नाती असतील जगात; पण मैत्रीसारखं खरं आणि सतत दरवळ पसरवणारं नातं नाही आणि मैतराहून सुगंधी असं काहीही नाही, ज्याची साक्ष हा निशिगंध आहे…