मैत्र ही भावना ज्यांना गावली ते आयुष्यात सर्व काही भरून पावले...
विक्रम
मैतर...गायत्री गोखले
त्या दिवशी संध्याकाळी प्रदर्शनाहून घरी परत आले. घरात आल्या-आल्या फोन वाजला. फोन उचलणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. फोनवर "हॅलो" म्हणायला आणि दार उघडायला एक वेळ यावी असंच झाली. दार उघडल्यावर समोरचा चेहरा बघून माझा 'आ' वासला गेला. गेल्या कित्येक वर्षात जो चेहरा माझ्या गावीदेखील नव्हता तो आज अचानक माझ्या समोर उभा राहिला होता... हातातील फोन तसाच होता अजून. मी एकदा हातातील फोन कडे बघत होते, एकदा समोर... करता-करता पुन्हा जेव्हा माझं लक्ष फोनकडे गेलं तेव्हा समोरूनच आवाज आला "आधी फोनवर बोलून घे; मग आपण बोलू, मी आज भरपूर वेळ काढलाय..."
मी फोनवर बोलायला सुरुवात केली तर ज्या प्रदर्शनाहून परतले होते तिथे 'तुमचं एक पेंटींग राहिलं आहे' हे सांगायला फोन आला होता. कशीबशी बोलले; फोन ठेवला तसा एक प्रश्न कानावर येऊन आदळला
"तुझी देखील पेंटींग्ज होती?"
मी चटदिशी "नाही" म्हटले आणि आत येऊन बसायला सांगितलं.
डोळ्यांसमोरून असंख्य आठवणी सरकल्या. रेल्वे स्टेशनवर उभं असताना डोळ्यांसमोरून एखादी फास्ट लोकल जावी अन् ती आपल्याला हव्या असलेल्या प्लॅटफॉर्म वर न थांबता भलतीकडेच थांबली तर कसं वाटेल तसं वाटलं...
आताशा मीही जराशी भानावर आले आणि प्रश्न केला,
"आज कशी आठवण झाली?"
त्यावर तो म्हटला "आठवण रोजच येते, वेळ आज मिळाला; म्हणून आलो होतो, घाईत असशील तर नंतर येईन काही दिवस तरी आहे अजून." मी 'बस' म्हटले आणि आत गेले.
चहा करायला ठेवला... कॉलेजात असताना तरी खूप चहा प्यायचा, आताचं काहीच माहित नव्हतं; पण मग वाटलं घेईल म्हणून केला अन् सरळ समोर नेऊन ठेवला. चहाच्या कपाकडे बघून चेहऱ्यावर आनंद दिसला आणि मला हुश्श झालं...
चहा संपल्यावर एक भलताच विषय काढला... त्या विषयामुळे भूतकाळात रमायला झालं... मागे एकदा आमच्या कॉलेजला दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून सगळ्या सिनिअर्सनी शिक्षकांच्या परवानगीने एक टूर काढायची ठरवली होती, ज्यायोगे आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी मिळून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तिथल्या सीनरीजची पेंटींग्ज कॉलेजला भेट देणार असं ठरवलं होतं; पण ऐनवेळेस काहीतरी घडलं, माशी शिंकली आणि जे दोन ग्रुप्स ठरवले होते त्या दोन ग्रुप्समधे भांडणं झाली आणि ते सगळं हवेत विरलं...मग सगळ्यांचाच उत्साह संपला...जो-तो दुसर्याकडे बोटं दाखवू लागला आणि कॉलेजने देखील आमचे सगळे बेत रद्द करायला लावले...शिक्षकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली; मात्र ह्या सगळ्या पलिकडे त्यावेळी झालेलं आणखी एक मोठं नुकसान म्हणजे त्यावेळी विरूध्द गटात असलेला; त्यामुळे मनात नसतानाही भांडाव लागलेल्या आणि ज्याच्याविषयी माझ्या मनात काहीतरी वाटायला सुरूवात झाली होती अन् कदाचित त्याच्याही; अशा ह्या माझ्या जिगरी मैतराचं दुर्मिळ झालेलं दर्शन...आज कित्येक वर्षांनी तो माझ्या समोर उभा होता ज्यावर माझा विश्वास बसायला कितीतरी वेळ गेला.
माझ्या डोक्यात हे सगळे असंख्य विचार चालू होते आणि त्याच वेळी तो बोलत होता..एकटाच. मी मात्र काहीच बोलत नाही हे पाहून पुनः त्याने बोलायला सुरुवात केली...
"कॉलेजने पुनः आपली ती रखडलेली टूर काढायची असं ठरवलं आहे. सुमंत सरांनी बोलावून घेतलं परवा, म्हटले जुनं झालं आता सगळं...कॉलेज, आम्ही...तेव्हा आता भांडणं सोडून एकत्र या."
मी ऐकत होते आणि त्याचं बोलणं थांबताच मी म्हटले
'म्हणजे पुन्हा सगळं?'
त्यावर तो म्हटला,
"फार कठीण नाहीये ते. तुला वाटतंय कारण कॉलेज मध्ये तो सगळा प्रकार झाल्यावर गायब होणारी कदाचित तू एकटी होतीस; नंतरच्या पाच-दहा वर्षात आम्ही सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मधे होतो... तुला खूप शोधलं पण मग वाटलं तुझं लग्न वगैरे झालं असेल तर उगाच नकोच!"
असं बोलून क्षणभर थबकला, कोण जाणे का? पण मान खाली घालून म्हटला
"सोरी, म्हणजे तसं नव्हतं म्हणायच मला; म्हणजे तुझं लग्न झालं असतं तरीही तुला शोधलंच असतं पण; I don't know, नको वाटलं." (तो बोलत असताना मी मनाशीच म्हटले-का नसेल वाटलं? तो बोलतच होता) ...पण आता ठरवलं काही झालं तरीही सगळ्यांनी एकत्र यायचं आणि हे फेस्टिवल करायचंच...येशील ना तू?"
मी म्हटले, "तुला काय वाटतं मी काय करेन किंवा मी काय करायला हवं?"
"तुला हवं ते मी काय सांगणार? पण मी सुचवेन की तू यावंस... सगळ्यांनाच खूप बरं वाटेल" क्षणभर थांबून म्हटला "मलाही आवडेल तू असशील तर... ये ना प्लीज़!"
ह्या 'प्लीज़' मधून मला माझा पूर्वीचा मित्र भेटला, नाहीतर इतका वेळ कसंतरीच वाटत होतं... त्याच्या त्या प्रेमळ निमंत्रणानी मी फेस्टिवलला येण्याचं कबूल केलं...
तो मला पुढचे सगळे प्लान्स सांगत गेला अन् मी ऐकत होते...सगळा वृत्तांत सांगून झाल्यावर म्हटला
"चल, मी निघू? अजूनही बरीच निमंत्रणं बाकी आहेत, जी मी करायची आहेत... फेस्टिवलला भेटूच पण त्याआधी मी येणार आहे...मला तुझी सगळी पेंटींग्ज बघायची आहेत...आता परवाच सुमंतसर खूप कौतुक करत होते...मला म्हटले की, 'कॉलेजातल्या एकूण उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या पैकी ती एकमेव विद्यार्थिनी असेल जी स्वतःच्या हिमतीने सारं एकटीनेच सांभाळते आहे, नावारूपाला येतेय...तिची पेंटींग्ज पाहाण्यासारखी असतात; तेव्हा तिला बोलवा.' म्हणून म्हणतोय, नक्की ये!"
“ठीक आहे-“ मी.
"मग निघतो मी..." असं म्हणून दाराशी गेला; थबकून मागे वळला आणि म्हटला "एक विचारलं तर चालेल?"
"विचार ना!- मी.
"तुझं लग्न झालंय की अजुनही एकटीच आहेस? नाही म्हणजे सर म्हणाले तसं एकटीनेच सांभाळते आहेस की आहे कोणी?"
मी हसून म्हटले, "नाही भेटला कोणी..."
“खरंच?"
"अरे, मी का खोटं बोलू?"
"तसं नाही गं, मी विचारलं कारण... असो येतो फेस्टिवलला भेटूच पण मीदेखील मारेन चक्कर...Bye."
असं म्हणून निघण्यासाठी म्हणून निघाला पण माझ्या एका प्रश्नानी त्याला थबकवलं..
"तुझं झालंय लग्न?"_
माझ्या ह्या प्रश्नांवर त्यानी एक नजर पाहून पुन्हा मान खाली घालून म्हटला "तेव्हाही जमलं नाही आणि आज, आत्ता जमेल असं वाटलं होतं पण...येऊ मी? उशिर होतोय.निमंत्रणं बाकी आहेत आणि शिवाय आईही वाट बघत असेल.. चल भेटूच. बाय!" असं म्हणून गेला.
मागे वळून न बघता.. कुठून त्याला विचारलं असं झालं. दोघांच्याही जखमेवर मीठ चोळल्यागत झालं...
'कॅनव्हासवर रंगवायला घेतलेली चित्रं लगेचच चितारलेली बरी, नंतर कितीही प्रयत्न केले अन् रंग वाळून गेले तर चित्रं अपूर्ण राहतात',
हे त्याचंच वाक्य तो दिसेनासा होईतो कानी घुमत राहिलं; ज्याचा अर्थ आज आम्हा दोघांना खर्या अर्थानी लागला...