आजकाल न लिहिलेली पत्रे वर अनेक पत्र मालिका नाते आणि त्यातील दांभिकता...विश्वासाची गरज...अशा मुलभूत प्रश्नांची बेधडक चर्चा करीत आहेत. स्वातीची कथा..सुद्धा काही हळूंवार मुद्द्यांना स्पर्श करते आहे..
विक्रम
सुरेल मैफिल – स्वाती फडणीस.
सगळं कसं छान, सुंदर चालले आहे. दाखवण्याचा माणसाला भारी सोस.. म्हणून मग "सुख सांगावे जनात, दुःख गाडावे मनात..!" या उक्तीनुसार जो तो फसव्या सुखाचा मुखवटा धारण करून वावरत राहतो. सगळीकडे रियाजाने कमवलेलं संगीतमय मंद स्मित किणकिणत राहतं..प्रेयस शब्दांची देवाण घेवाण होत जाते..अगदी सहज, विनासायास हे असंच तर असतं म्हणत ठरलेला पदन्यास करत मैफिल रंगत राहते.. त्यात कोणता विसंवादी सुर उमटणे कोणालाच नको असते. कारण सगळ्यांना भय असतं.. आपापला मुखवटा गळून पडण्याचे. म्हणून मग ते मोठमोठ्याने गात मोठमोठ्याने गात दडपून टाकतात विसंवादी सुर किंवा गाळून टाकतात त्याला आपल्या सुरेल मैफिलीतून. दुःखाचे कढ गळ्यातून बाहेर पडू न देता. सुरळितपणे वठवून नेतात सुखाचा आभास..
तरी कधीतरी एखाद्या गळ्यातून बाहेर पडणारा चिरका आवाज क्षण भर सगळे मुखवटे दूर करून जातो. तो आवाज ज्याला दडपण त्या वक्तीच्या हाती राहतं नाही. तो आवाज जो तिच्या आत क्षणोक्षण गुंजत असतो. तो घुमत जातो तीच अस्तित्व भेदून. मुखवट्याची कवच कुंडले इतस्ततः विखरत..
"प्रत्येकीला लग्न करावंच लागतं का गं..?" बरीच प्रश्नोत्तरे पोटात घेऊन मैफिल स्तब्ध होते. विसरून जाते क्षणभर रियाजाने कमावलेली सुरेल किणकिण.. सुखाच्या बुरख्याआड लपलेल्या दुःखाची कबुली द्यायला घाबरते. आणि नाहीच करून देत ओळख.. दुःखला सोन मुलामा चढवणाऱ्या बावनकशी शुद्ध भावनेशी. कारण मग कदाचित ती नाकारेल त्या गुंजभर सोन्याच्या ओटी घातलेलं अवडंबर. चुकेल पदन्यास..! म्हणून मग प्रश्नाला प्रतिप्रश्न करत करून घेतली जाते सोडवणूक उत्तरदेण्यातून.
विसंवादी सुराला त्याचा सूर सापडत नाही. तो गुंजत राहतो आतल्या आत. सामूहिक पदन्यासाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत. विसंवादी सुराशी अडखळत. चिरत चिरकत.. "एकत्र कुटुंबातील स्थळ नको.." सांगत, त्या विधानाचा परिणाम म्हणून नकार पचवत. "आजकालच्या मुली फक्त आपला विचार करतात." म्हणून स्वार्थी ठरत तिचा पदन्यास चालूच आहे. माहीत नाही कधीपर्यंत.. कधीपर्यंत आपण तिच्या प्रश्नांची उत्तरे टाळणार आहोत. आता तिची तालीम पूर्णं झाली आहे. "होणार सून मी त्या घरची.." म्हणत तिने कित्येक वर्ष पदन्यास केलाय.. आता तिला काय सांगणार..? तिचं पदोपदी अडखळणं उघड्या डोळ्यांनी कुठवर पाहणार..? दुःखात न लडबडलेल्या सुखाचा शोध ती कधी घेणार..? ही किणकिणती रात्र कधी संपणार..?