भूतबंगला चे तुम्ही उत्स्फूर्त स्वागत करणार ह्यात मला शंका नाही...आणि म्हणूनच मी शुभारंभाला जेष्ठ आणि सन्मानित साहित्यिका डॉ. माधवी वैद्य ह्यांची कथा देत आहे...एन्जोय....
विक्रम
थरार – डॉ. माधवी वैद्य
नुकतीच तिची कोकणात नोकरीच्या निमित्ताने बदली झाली होती. पुण्यासारख्या शहरातून एकदम कोकणात जायचं म्हणजे तसं जीवावरच आलं होतं तिच्या. पुण्यातलं रुळलेलं, स्वस्थ जीवन कोकणात जाऊन आपल्याला लाभणार नाहीच, हे तर खरच होतं, पण जायला तर हवंच होतं. हवा, पाणी, माणसं, परिसर साऱ्यांमधेच अचानक बदल घडून येणार होता. पण स्थलांतरित होण्याचा निर्णय तर झाला होता. तिनं सामानाची बांधाबांध करायला घेतली होती. पुण्याचं घर इतक्यात सोडायचं नाही असं ठरवलं होतं. न जाणो आपलं कोकणातलं राहणं आपल्याला मानवेल नं मानवेल!
एका दृष्टीनं हे स्थलांतरित होणं तिला बरंही वाटत होतं कारण पुण्यात आता पाहिल्या सारखं स्वास्थ्य राहिलं नव्हतं. पंचवीस वर्षापूर्वी तिनं जेव्हा पुण्यात घर बांधलं तेव्हाचा परिसर आणि आताचा परिसर याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडला होता. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यालगतच असणाऱ्या एका जमिनीच्या तुकड्यावर घर बांधलं तेव्हा तो परिसर शांत निवांत होता. पण आता घर अगदी भर वस्तीत गजबजाटात आल्या सारखं झालं होतं. तिच्या तेव्हाच्या एकांड्या वाटणाऱ्या घरा भोवती आता सिमेंटची जंगलं उभी राहिली होती आणि माणसांची जंगलंही घनदाट झाली होती. तेव्हाचे ते पक्ष्यांचे आवाज कुठे पळून गेले होते आणि वाहनांचे हॉर्न्स अँम्ब्यूलन्सचे जीवघेणे भोंगे पूर्वीच्या शांत वातावरणाला अस्वस्थ करत होते. पूर्वी त्या परिसरात पाणी नव्हते, तो परिसर कोर्पोरेशन मध्ये आला. पाण्याची मुबलकता आली, आणि परिसर झपाट्याने बदलला होता. आता कोकणात गेल्यावर जरा निवांत वाटेल असं तिला वाटत होते.
आणखीही एका गोष्टीतून या स्थलांतरित होण्यानं सुटका होईल असं तिला वाटत होते. तिच्या घराशेजारी एक ओनरशिपची बिल्डींग उभी राहिली आणि त्या बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर बरोबर तिच्या घराच्या खिडकी समोरील खिडकीतून कोणीतरी तिला हाक देत आहे असं वाटून तिने खिडकी उघडली तर एक बाई तिला ‘ए हडळ ! ए डाकिण !’ असं करून बोलवत होती. तिच्या अंगावर काटा आला आतापर्यंत सन्मान मिळवून समाजात वावरणारी ती, तिला कोणीतरी अश्या प्रकारे हाकाराव हे तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तिनं त्या हाकेसरशी उघडलेली खिडकी लावून घेतली. पण हाक काही थांबेनात. तिनं शेवटी खिडकी किलकिली करून बाहेर डोकावलं. समोरच्या खिडकीत तिला एक चेहरा दिसला. कृश अशक्त, विचित्र, भांबावलेला कसातरीच. ती व्यक्ती बाईच होती आणि तिची नजर स्थिरावत नव्हती. ती ‘शुक शुक’असं करून टाळ्या वाजवून तिला बोलावत होती, ‘ए हडळ !! ए डाकीण !!!
ती पटकन खिडकी लाऊन घरात गेली आणि आरशा समोर उभी राहून स्वतःला न्याहाळत राहिली. आपण अशा दिसतो? हडळी सारख्या? तिच्या लक्षात आलं. आपले हल्लीचे पांढरे लांबसडक केस न्हाऊन मोकळे सोडले तर कदाचित असं वाटत असावं का? आपण न्हायल्यावर लांबसडक केसांना उन्हात सुखवण्यासाठी व्हरांड्यात बसतो कधी कधी. तेव्हा हिने आपल्याला बघितलं असणार. या विचाराने तिचं तिलाच हसू येत होतं. तिनं आपल्या मोकळ्या केसांचा चटकन अंबाडा घातला आणि ती घराकडे वळली. पण घरकामात तिचं लक्ष लागेना. तिच्या मनाला एक चाळाच लागला सारखं खिडकी किलकिली करायची आणि ती बाई समोर आहे का? याचा वेध घ्यायचा. बरं हाका तरी काय मारत होती ती ! म्हणे हडळ ! डाकीण ! अशा नावांनी आतापर्यंत संबोधण्याचं धारिष्ट्य कोणाला झालं नसतं इतकी ती दिसायला सुरेख होती. वय झालं तरी तिचं मूळचं सौदर्य लपत नव्हतं. चला ! आता आपण इथून हलणारच आहोत त्यामुळे आपल्या मागील हा हाकांचा सारेमिरा तरी सुटेल एकदाचा. तिला वाटलं.
आपल्या बरोबर नेमकं काय घ्यायचं, काय नाही याची एक यादीच तिने केलीन आणि ती कामाला लागली. बघता बघता निघायची तारीख उजाडली. तिनं सारं समान व्यवस्थित गाडीत चढवलं आणि देवघरातले देव एका बॉक्समध्ये व्यास्थित बांधून घेत ती निघाली. निघताना परत तिच्या कानी हाका आल्याच... ‘ए हडळ !! ए डाकिण !’ तिनं देवाचं नाव घेत खिडकी किलकिली केली. बाहेर बघितलंन तर ती बाई परत खिडकीत उभी राहून हाक देतच राहिली होती. यात काही अर्थ नाही अशा भावनेनं तिनं आपल्या घराची ती खिडकी आता काही काळापुरती तरी कायमची बंद करून टाकलीन. आता आपण इथे परत येऊ तेव्हाच ही खिडकी उघडायची, तोवर तरी हा छळवाद थांबेल. पण काय प्रकार आहे हा? काय भोग आहे आलेला आपल्या वाटेला? या हाकांनी तिचं स्वस्थ जीवन पार उध्वस्त करून सोडलं होतं हेच खरं, जाउदे आपला काही पूर्व जन्म वैगेरेवर अजिबात विश्वास नाही हे तर खरच ! ही बाई आपल्यालाच का हाक देते? आपण काय असं घोडं मारलं आहे हीचं? असले हे विचित्र भोग आपल्यालाच का भोगावे लागतात? ही खिडकी म्हणजे एक मायाजाळ झालं आहे आपल्यासाठी आता ती खिडकी, ते घर तिला नकोसं झालं होतं, मनातूनच उतरलं होतं तिच्या ! म्हणूनच कोकणात बदली झाली ही एका प्रकारे सुटकाच वाटत होती तिला.
ती कोकणात येऊन पोहोचली. तिच्या राहण्याची व्यवस्था गर्द आंबराई असलेल्या जागेतील घरात घरात केली होती. घर छान होतं. टुमदार. तिला आवडेल असं. निवांत शांत. आजूबाजूला घरं होती पण अंतरावर. राखणीसाठी रखवालदारही होता. थोडे दिवसांनी तिच्या सामानाची व्यवस्थाही छान लावली गेली. समान तिच्या मनाजोगते लावायला तिच्या घराच्या त्या हवालदारानं तिला मदत केली. घराच्या अवती भोवती उंचच उंच ताडमाड होते. संध्याकाळच्या वेळी ते वाऱ्याच्या साथीने डोलायचे. मजा वाटायची तिला. रात्रीच्या वेळी काजवे चमकायचे.
तिचा हवालदार तिला सांगत होता. ‘ बाईंनू ! रातच्ये गाड्येत्सून एकटे इल्यात तर सावध रवा हा !
ती उत्तरली, ‘सावध म्हणजे?’
हवालदार म्हणाला, ‘सावध हुंजे, रातच्याक कोणय तुमची गाडी थांबयत!”
ती हसत म्हणाली, ‘कोण थांबवणार?’
तो म्हणाला, ‘नाय म्हंजे कोकणात भूता-खेतांचो वावर खूप हा नाय. हडळ, डाकीण, भुताटकी कोणय अड्वात’
ती दबक्या आवाजात म्हणाली, ‘ए काहीतरी काय बोलतोस? गप बस..’
तो म्हणाला, ‘मिया आपला, आपला हुनान सांगतय, तुमच्याच भल्यासाठी. बाकी काय नाय..एखादे फावटी तुमची गाडी एखांदा पांढरा पाताळ नेसलेला बायल माणूस आडवीत.. केस मोकळे, कपळार मळवट भरललो, हातात हिरव्या बांगड्यांचो चुडो... आणि तुमका हुनात, ‘वडे दे ना वडे!’ आणि फाटसून तुमका घमघमीत वासय येयत वड्यांचो. पण गाडी थांबव नका. ती बायल दिसानाशी होय पर्यत थाबा नकात.. गाडी सोडून घाला. ऐकल्यात..!! “
तिच्या अंगावर काटाच आला. पण तिचा यावर विश्वास नव्हता. तिने तो विचार डोक्यातून काढून टाकलान. काही दिवस गेले.
आता ती इथे जरा रमून लागली, परिसर छान होताच, कामही छान होते. तिला स्वस्थ वाटायला लागलं.. अशीच एक दिवस ती दमून भागून घरी आली संध्याकाळ झाली होती. गार वारं सुटलं होतं आंब्याला सुंदर मोहोर आला होता. त्या मोहोराच्या वासानं आसमंत दरवळा होता. ती जरा घराबाहेर येऊन बसली व्हरांड्याच्या पायऱ्यांवर ताड माड वाऱ्यावर डोलत होते.. हळूहळू संध्याकाळ कलली. आता काजवे चमकायला लागले. किती सुंदर वाटतं आहे या वातावरणात. बरं झालं आपली बदली झाली ते. तिला वाटलं. ती घरात गेली. आवरा आवर करायला लागली.
आणि अचानक तिला वड्याचा खमंग वास यायला लागला. तिला हवालदाराचं बोलणं आठवलं. तिच्या मानेवर घाम जमला. नंतर वारा सुटला खमंग वड्याच्या वासाची तीव्रता अधिक वाढली. ती चांगलीच भेदरली. आता? आपण एकट्याच या घरात. आजूबाजूला कोणी नाही आपल्या. रात्रीची वेळ बाहेर अमावस्येचा काळोख. आणि अश्या अवस्थेत तिच्या कानी हाक आली, ‘ ए हडळ, ! ए डाकीण!’ तिनं घाबरून खिडकीतून बाहेर पाहिलं, तर तीच बाई ! पांढरं पातळ नेसलेली, मळवट भरलेली हातात हिरवा चुडा पुण्याच्या घराच्या खिडकीतून दिसत होता ना, तोच, तसाच तोंडवळा. तीच म्हणत होती. ‘ ए हडळ, ! ए डाकीण! वडे दे ना वडे!!’ आता मात्र ती चांगलीच भेदरली होती... ___________________________
इतक्यात तिच्या घरातला फोन खणखणला. तिनं घाबरतच तो उचलला. पलीकडून तिची मुलगी बोलत होती. “अगं ममी, ! मी बोलतेय”, ती उत्तरली “काय गं कशी आहेस? घरी सर्व ठीक ना? उघडलं होतस का घर? झाडून बिडून घेतलस ना?” तिची मुलगी उत्तरली, “हो! हो! सगळं व्यवस्थित आहे इथे. आणि हो! एक आनंदाची बातमी सांगायची आहे गं! कालच रात्री तुला ए हडळ! ए डाकीण ! म्हणून हाक मारणारी ती बाई अचानक गेली बरका ! आता निर्धास्त रहा ! काळजी नको!