खूप वेधक फिरस्ती.....
विक्रम
फुलवाली – सुचिता घोरपडे
आज तिची फारच धावपळ चालली होती सकाळपासून. तिने पटापट डबा तयार केला, सासूला आवडते म्हणून मटकीची उसळ बनवून डबा भरला. झोपडीला कुलूप लावले, आणि ती झोपडपटटीतील नळावर चाललेल्या भांडणाकडे पाहत भराभर पावले टाकू लागली, त्या गडबडीत अगोदरच तुटत आलेली तिची चप्पल तुटली. तशीच ती चप्पलला रेटत दवाखान्याच्या दिशेने चालू लागली. तिच्या सासूचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे असल्याने तिने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. आता तिला ऑपरेशनसाठी पैसे जमा करायचे होते तेही तीन दिवसात. नव-याविना सासूचा घराचा ती सांभाळ क़रीत होती. व्यापा-याकडून ती रोज उधारीवर फुले घ्यायची आणि फुले विकली गेली की पैसे दयायची. त्यामुळे काहीही करून आज सगळी फुले विकायचीच असा तिने निश्चय केला. विचाराच्या तंद्रीत दवाखाना कधी आला तिला कळालेच नाही. तिने सासूला डबा दिला आणि आज लवकर जायला लागेल असे सांगून ती तिथून बाहेर पडली.
लगबगीने तिने पदर खोचला आणि ती दोन सिग्नल पार करून फुलबाजारात पोहचली. तोपर्यत सगळा बाजार गर्दीने फुलून गेला होता. आपल्या नेहमीच्या व्यापाराकडून तिने अगदी पाहून निरखून टपोरी गुलाबाची फुले घेतली. कालचा हिशोब सांगून खात्यावर नेहमीप्रमाणे पैसे मांडले. फुलांची टोपली उचलून तिने आपला रस्ता धरला.
सिग्नल चालू झाला, तसे सगळे फेरीवाले आपापली जागा पकडू लागले.तिलाही आता हळूहळू या सगळ्याची सवय झाली होती.तिनेही टपोरी फुले पाहून कोणाचेही मन आकर्षित होईल या रितीने फुले मांडली. आणि इतक्यात सिग्नल लागला, पायातली तुटकी चप्पल ओढीत ती गाड्यांच्या ग-याडयात शिरली.
“ये दादा, बघं रे, किती भारी फुले आहेत ती. लै आवडतील तुला, घे फकस्त पाचला एक हाय, दादा घेरे.”
त्याने फुले नाहीच घेतली. उलट बाइकला किक मारली नी तो पुढे सरकला. परत तिचे ओरडणे चालू झाले,
“घ्या फकस्त पाचला एक फुल. घ्या मस्त गुलाब घ्या, पाच रुपयाला एक.”
एका व्यक्तीने मग तिच्याकडून दोन फुले घेतली. सिग्नल संपला आणि गाडया धावू लागल्या. तिने सगळी फुले नीट लावली आणि सिग्नलची वाट पाहू लागली.
थोडयावेळाने सिग्नल लागला, परत धावपळ परत गोंधळ. गाडयांचा धूर आणि बोथट माणसांची गर्दी. तिने एका छोटया मुलीला फुलाकडे पाहताना पाहिले आणि ती तिकडे जावून
“ताई घ्या पाचला एक हाय फकस्त, पोरी साथी घ्या ताई.”
त्या बाईने मानेनच नकार देवून गाडी थोडी पुढे नेली, मग ती छोटी मुलगी रडू लागली फुलासाठी. तिची आई तिला दम देता, ती जास्तच रडू लागली. तसे तिने आपल्या टोपलीतील एक छोटे फुल काढले आणि त्या मुलीला दिले तिच्या चेह-यावरचे गोड हसू ती मन भरून पाहू लागली. देवाने तिच्या पदरात पोराचे सुख टाकलेच नाही कधी. त्यामुळे ती लहान मुलांना पाहून नेहमी हळवी व्हायची. त्या मुलीच्या आईने फुल परत घ्यायला सांगितले, तशी ती म्हणाली
“ताई पैसे राहूदे, पर पोरीला फुल घेवू दया.”
सिग्नल चालू झाला आणि ती हसरी मुलगी तिच्या नजरेआड झाली. दुपार सरत आली तरी फुले काही खपली नव्हती. संध्याकाळपर्यत सगळी फुले संपली तर बरे. तिच्या जवळ एक गाडी उभी राहिली, त्यातील एका बाईने काच खाली करून तिच्याकडून 25 फुले मागितली, तिने आनंदाने अगदी वेचून टपोरी फुले दिली आणि 125 रुपये मागितले, पण त्या बाईने फक्त 100 ची नोट तिच्याकडे भिरकावली आणि काच वर करून गाडी चालू केली. ती दूरपर्यत गाडीच्या पाठीमागे धावू लाग़ली, “ताई पैसे दया, रायलेलं पैसे दया, थांबा ताई, गाडी थांबवा.”
शेवटी ती गाडीच, गेली निघून. आणि ती हताश होवून गाडीकडे पाहतच बसली.
संध्याकाळपर्यत थोडीच फुले शिल्लक राहिली. रात्र व्हायला आली होती, सासूला रात्रीचा डबा देऊन घरही गाठायचे होते. जंगल बरे पण या शहरातील जनावारा जपून राहिले पाहिजे असे तिला वाटायचे. त्या नराधमाच्या नजरेला न येता ती घरी पोहचली. दुसरा दिवस उजाडला तशी रोजच्यासारखे आवरून ती फुलांची टोपली घेण्यासाठी बाजारात पोहचली. आज तिने दोन टोपल्या घेतल्या, काल नुकसानही झाले होते आणि जास्त फुले विकून पैसेही जमा करायचे होते.
आज सगळीकडे जणू उत्साहच संचारला होता. कॉलेजची सग़ळी मुले अगदी मस्त तयार होऊन गाडया फिरवत होती. ती न ओरडातही सिग्नलला तिची टपोरी लाल फुले विकली जात होती. तश्यात तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला डबल किंमतीने फुले विकायचा सल्ला दिला. तिला जरी हे पटत नसले तरी ते करावे लागणार होते सासूच्या ऑपरेशनसाठी. तिला कळतच नव्हते डबल किंमत करूनही सगळी फुले कशी काय विकली जात आहेत. अजून दुपारही झाली नव्हती आणि दोन्ही टोपल्या संपायलाही आल्या, तिला उगाचच वाटले की अजून एक टोपली घेतली असती तर बरे झाले असते. त्यामुळे टोपली संपल्यावर ती घरी निघून गेली.
आता थोडेच पैसे कमी होते, त्यामुळे ती आजही कालच्या सारखे दोन टोपल्या घेऊन निघाली. पण नेहमी सारखे जोरजोरात ओरडूनही तिची फुले आज कोणी विकत घेत नव्हते. तिला अजब वाटले काल न ओरडातही केवढी फुले खपली आणि आज एकही नाही. तर तिच्या साथीदारांनी सांगितले की काल वॅलेंटाईन डे होता, प्रेमाचा दिवस.म्हणून फुले खपली आज कोण घेणार तुझी फुले. तिला बापडीला कायं कळतय वॅलेंटाईन डे नी कायं. परत दुपारपर्यत फुले तशीच पडली, तिला आता भिती वाटू लागली. आज फुले नाही संपली तर काल झालेल्या सगळया फायदयाचा काहीही उपयोग होणार नाही. तोपर्यत एक व्यक्ती कारमधून बाहेर आली आणि रडक्या स्वरात दोन्ही टोपल्या खरेदी केल्या आपल्या अगदी जवळच्या मयत व्यक्तीच्या अंतीम संस्कारासाठी.
तिला पैसे तर मिळाले पण नवल वाटले देवाच्या अजब न्यायाचे, निसर्गाच्या अजब गजब रितींचे. एक फुल कुणाच्यातरी जीवनात प्रेमाचा अंकूर फुलवित असते, तर एक फुल कुणाच्या तरी अंतीम यात्रेत सहभागी होते अनंतात विलीन होण्यासाठी.