नुक्कडवर नवी लेखिका भाग्यश्री भोसेकर बिडकर- हे क्षण जगणे महत्वाचे असते....
विक्रम
जगण्याची कला – भाग्यश्री भोसेकर बिडकर
"शेवटचे बहात्तर तास राहिलेयत त्यांचे..बाकी मी फार काही बोलू शकत नाही"...
माझे शेवटचे बहात्तरतास!!! औषधाच्या ग्लानिमूळे मला नीटसं समजत नवहतं....ओहो, फक्त इतकं कमी आयुष्य उरलय माझं...सगळं एखाद्या चित्रपटा प्रमाणे डोळ्यापुढून सरकलं..समृद्ध, लाडकोडाच लहानपण..आई बाबा..मायेची खाण... माझी शाळा..माझ्या जडणघडणीत जिचा मोठ्ठा वाटा आहे...शाळेतल्या बाई...महाविद्यालयीन जीवन..तिथले शिक्षक..माझं hostel life...जिथे आयुष्यातले सगळे अनुभव मी घेतले, सगळ्यात आनंदाचे दिवस होते ते..माझ्या room mates...नंतर लागलेली नोकरी, माझे सहकारी,...नंतर प्रेमात पडणं... प्रेमाच लग्नात झालेलं रूपांतर...ती तर आनंदाची परिसीमा होती...माझा नवरा प्रेमाची खाण...सगळी प्रेमळ मंडळी....आणि...आणि आता मी हे सगळं सोडून जायचं!!! नाही मी नाही जाणार हे सगळं सोडून...ओहोहो...हा विचार करण्यातच एक तास गेला..आता फक्त एकाहत्तर तास!!
मला भा. रा. तांबे यांची कविता आठवली "जन पळभर म्हणतील हाय हाय...मी जाता राहील काय काय"..खरंच काय राहील मी गेल्यावर...माझ्या आठवणी...मग अजून काही चांगल्या आठवणी निर्माण करून जाते...काय काय करायचय बरं...आई बाबांना खूप खूप थँक्स म्हणायचय...इतकं केलं त्यांनी माझ्यासाठी...त्यांच्या संस्कारांच्या शिदोरीने जन्मभर मला साथ दिली...शाळेतल्या बाईंच्या पाया पडायचंय..त्यांच्यासोबत प्रत्यक्षात गुरुपौर्णिमा साजरी करायचीय...शाळेतल्या कॉलेज मधल्या मैत्रिणींना भेटून पुन्हा ते सोनेरी दिवस जगायचेत...नवऱ्यासोबत पुन्हा long drive ला जायचय...सगळं जग विसरून बेभान होऊन पुन्हा प्रेम करायचय त्याच्यावर...माझ्या ऑफिसमधले सहकारी, माझे साहेब हे देखील माझ्या जगण्याचा महत्वाचा भाग आहेत, त्या सगळयानादेखील खूपखूप थँक्स म्हणायचय...ऑफिस मधले वॉचमन काका, जे रोज त्यांच्या स्मितहस्याने स्वागत करतात, त्यामुळे कामाचा ताण कुठल्या कुठे पळून जातो...माझी रोजची भाजीवाली मावशी..supermarket मधली मैत्रीण..येता जाता रोज भेटणारे असे अनेक जण..या सगळ्यांना परत एकदा मनापासून भेटायचंय...बाप रे!! परत एक तास गेला...इतकी काम करायला आता उरलेले सत्तर तास अपुरे पडणार आहेत...
किर्रर्रर्रर्रर्रर्रर्र....गजर वाजला सकाळचा...आवाजाने गाढ झोपेतून जाही झाले मी...ओहहह!!! म्हणजे ते स्वप्न होत!!!...
मरणाच्या नुसत्या जाणिवेने पण मला दरदरून घाम फुटला होता...पण या स्वप्नाच्या निमित्ताने अचानक उमगलं होतं की हे रोज आपण फक्त श्वास घेतोय...पण जगणं विसरतोय.