शशी डंभारे एक आवडती लेखिका - तिच्या शोधक नजरेतून जीवनाकडे पाहणे हा एक शोधच असतो....
विक्रम
स्ट्रीट लाईट्स- शशी डंभारे
अंधाराची चाहूल लागली की काजळी धरलेली कंदीलाची काच कोरडया मऊ कपडयाने स्वच्छ पुसून घ्यायची. मग रॉकेल भरुन असलेल्या स्टिलच्या बेसवर ती मोहक आकाराची काच फिट्ट बसवायची. आणि प्रकाशमान झालेल्या घराच्या त्या टप्प्यात एखादं पुस्तक घेऊन झोकात अभ्यासाला बसायचं अशा देखण्या बालपणाचे दिवस आजही चकचकीतपणे नजरेसमोर येतात. स्वच्छ पुसलेल्या काचेसारखेच.
त्यानंतर काही दिवसांत, घरोघरी लाईट्स येण्याआधी चौकाचौकात स्ट्रीट लाईटस् आले. चौकातली पोलची जागा आधी ठरवली जाई. एमएसईबीच्या माणसांना हाताशी धरुन लाईटचा पोल आपल्या घराजवळ येईल असे प्रयत्न वस्तीतली माणसं करत. बाबाने काही प्रयत्न केला होता की नाही माहित नाही पण आमच्या घरासमोरच इलेक्ट्रीकचा पोल लागला नी काही दिवसांतच संध्याकाळी 7.30 वाजता दारात लख्ख प्रकाश पडू लागला.
घराबाहेर, ओसरीत लाकडी बांबूची, नारळाच्या दो-यांनी विणलेली एक बाज नेहमीच पडलेली असायची. स्ट्रीट लाईट लागायच्या आधी ओसरीवर पडलेल्या त्या निर्जिव बाजेवर लवंडून अनेक स्वप्नं सजीव होऊन चांदण्यांशी शेअरही केली जायची. या कानाची त्या कानाला खबर व्हायची नाही. आईवरचा राग, शाळेतले लूटूपूटूचे अपमान आठवून गूपचूप अश्रू ढाळले जायचे. आतून हाक आली की डोळे पूसून लगेच 'जैसे थे ' घरात. स्ट्रीट लाईटने ही सोय अचानक बंद केली. ओसरीपासून चौकातला कितीतरी मोठा परिसर चट्ट प्रकाशात आला आणि बाजेवर लवंडण्यावर अनेक नियम लागले.
कसे नी किती वेळ, येणा-या जाणा-याचे लक्ष जाणार म्हणून हात पाय व्यवस्थीत पसरुन, खरंतर आक्रसूनच बसायचे उठायचे वगैरे ठरले. मला मग जामच पोरकं वाटायचं त्या प्रकाशात. आधीसारखी उब देईनाशी झाली बाज. मग नुसतंच पुस्तक हातात धरुन बसायचं. पूर्ण परकेपणानं. आधीचा, अंधारात लोळत पडतानाचा काँफीडन्सच गायब झालेला. घाबरे घुबरेपणाच वाढलेला.
दुसरा पोल पुढच्या चौकात, नाक्यावर लागलेला. दारातल्या पोलच्या प्रकाशाचा टप्पा संपला की मधे बराचवेळ नुसता अंधार, पण त्या अंधारानंतर नाक्यावरच्या पोलचा पुन्हा प्रकाश. या स्ट्रीट लाईटचा प्रकाश मात्र जीवाला दिलासा द्यायचा. कारण नाक्यावर त्या वेळी म्हणजे 7.30 ते 8.30 च्या दरम्यान वेगळीच हालचाल असायची. बस, रिक्शा थांबायच्या. सकाळी घरातून बाहेर पडलेले बहुतेक सगळेच चाकरमानी या वेळेत बस-रिक्शातून उतरायचे. त्यांच्या हातात त्यांच्या कुटूंबासाठी आणलेल्या भाज्या, फळं, खाऊ बीऊ असायचा. त्यात बाबा पण असायचा.
या पोलवरील लाईटच्या प्रकाशात अवघडलेली मी त्या पोलवरील लाईटच्या प्रकाशाकडे बघायचे तेव्हा हुरुपायची. त्या लाईटचा प्रकाश बाबासारखाच वत्सल वाटायचा. बाबाचं नी आईचं भांडण झालं की जीव कासावीस व्हायचा. दिवसभर काहीतरी चूकचूक वाटत रहायचं. मग रात्री बाबा येण्याची नी त्यांच्यातलं भांडण मिटण्याची वाट पाहत राहणं इतकंच हातात उरायचं.
बाबा त्या दिवशी नेमका उशीरा यायचा, मुद्दामच येत असेल. तेवढं समजायचं नाही तेव्हा. पण जीव थांबून असायचा. नजर सारखी नाक्यावरच्या प्रकाशात थांबणा-या एसटी- रिक्शाकडे. ब-याच उशीरा एखाद्या एसटीतून बाबा उतरायचा. तो दिसला नुसता तरी जीव खळ्कन् भांडयात पडायचा. त्या दिवशी त्याच्या हातात पिशवी नसली तरी खूपच्या खूप खाऊ मिळाल्याचं समाधान वाहायचं डोळयातून. लख्ख प्रकाशात ते दडवता यायचं नाही. भरभर पुसावं लागायचं.
बाबा आता प्रकाशाच्या कितीतरी टप्प्यांच्या पार गेलाय. पण अजूनही एखाद दिवशी संध्याकाळी 7.30 ते 8.30 च्या दरम्यान अचानकंच पोरकं पोरकं वाटायला लागतं, ते त्याचमुळे बहुतेक.