कालाय तस्मै नम: ह्या म्हणीचे अनेक अर्थ आहेत...पण ह्या कथेच्या संदर्भात...त्याचे अर्थ दुर्दम्य इच्छा शक्ती कडे अंगुली निर्देश करतात
विक्रम
संघर्ष - स्वाती फडणीस
या सगळ्याची सुरुवात झाली ती एका साध्याशा तापाने आणि निदान झाले कॅन्सरचे.. तो देखील अगदी तिसऱ्या श्रेणीतील कॅन्सर..! 'कॅन्सर' शब्द उच्चारताच वातावरणात परिस्थितीचं गांभीर्य भरून येतं नाही.. त्याच्या आई-वडिलांनी जेव्हा हे निदान ऐकलं तेव्हा वातावरण तसंच गंभीर झालं असेल. एककुलत्या एका तरुण मुलाच्या प्रकृतीचं निदान ऐकून क्षणभर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली असेल. हृदयाचा ठोका चुकतो की काय..? असं काळीज कळवळलं असेल.. पण ते कोसळू शकत नव्हते..
"डेकतर, आम्ही पाहिजे तेवढा पैसा ओतायची आमची तयारी आहे.. पण हा नक्की बरा होईल ना? " गरगरणाऱ्या जमिनीवर स्थिर उभे रहात त्याच्या आईने विचारले. आणि डाॅक्टरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच एका संघर्षाची सुरुवात झाली. क्षण, क्षण जगण्यासाठी कणा कणाने मारणारा संघर्ष. टेस्ट्स, केमो, पथ्यपाणी.. करत आल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी त्या तिघांनी आपली कंबरकसली. जिद्दीने, न थकता, न कंटाळता प्रतिकार सुरू होता. वर्ष उलटलं. सुधारणा दिसू लागली. पण संकट येतं तेव्हा ते एकटं येत नाही असं म्हणतात..
या आजारपणात सहा महीने पगारी उरलेले सहा महीने बिन पगारी रजा देऊन साथ देणारा एक आधार, त्याची नोकरी, थोड्याशा स्थैर्याची चाहूल लागताच त्याच्याकडे पाठ वळवून निघून गेली. अजून वर्ष सहा महीने घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. "बचेंगे तो अौर भी लडेंगे..! " म्हणून तोही आघात धीराने पचवला.
पण दैवच फिरलं तिथे कुठे कुठे पुरे पडणार... लग्नाच्या नंतर दीड, दोन वर्षात समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात ती कमी पडली. तीच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं तिची अस्वस्थता मांडत होती. आपण फसवले गेलो आहोत या विचाराने तिच्या मनाची आणि पर्यायाने घराची शांतता स्फोटक बनत चाललेली. तिच्या मनात एकच शब्द दिवस रात्र गुंजत होता.. तो म्हणजे ' घटस्फोट'. "धाकटीचं लग्न व्हायचं आहे. तोपर्यंत थांब. " माहेरच्यांच मत पडलं. आणि घरात अजून एक वादळ घोंगावू लागलं..
अन्याय झाल्याची भावना, माहेरचा सुटला आधार, आणि अनिश्चित भविष्याची चाहूल.. दिवस रात्र घोंघावतं राहिली. आणि तिसरा ही आघात सामंजस्याने स्वीकारला गेला.. लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ती, बरीच लक्ष्मी घेऊन गेली. आरोग्य, नोकरी आणि बायको गमावून तो जवळ जवळ बरबाद झाला. पण जगणं तिथेच थांबत नाही आणि त्यामुळेच लढणाऱ्या देखील चालूच राहतं.
कधीही कोणतीच लढाई न ओढलेला तो तसाच लढत गेला. आज सहा - सात वर्षांच्या कालावधी नंतर तो हरलेली तिसरी ही बाजी जिंकून घेण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा दुसरा विवाह संपन्न होतोय. पुन्हा काळ कोणत्या खेळी खेळेल ते तोच जाणे पण आज आजच्या घडीला त्याचा संघर्ष पूर्ण झालाय. आज आता तो निर्विवाद जिंकलाय..!