नुक्कड मध्ये एक पायंडा सुरु करीत आहे...चांगली कथा समाविष्ट करण्यासाठी ...क्रमशः गोष्ट पोस्ट करणा...गायत्री मुळ्ये ह्यांच्या ह्या कथेला अलीकडेच वसंतराव होशिंग पारितोषिक मिळाले होते...
"हौदामागची खोली"...मी काही बोलत नाही...तुम्ही वाचा...
"हौदामागची खोली" - गायत्री मुळ्ये
लग्नाला काहीच दिवस झालेले .तिला सकाळी लौकर जाग येत नसे.अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती.एवढे मोठे कुटुंब ; कोण काय म्हणत असेल ह्या विचाराने तिला लाजीरवाणे व्हायचे.अजून वाड्यात किती खोल्या ,किती दरवाजे कुठून गेले म्हणजे कुठे बाहेर निघता येईल ह्याचा ती फक्त अंदाज घेत होती .घरात एकूण माणूस किती ? नौकर चाकर किती ?कोण कोणत्या कामाला आहेत घरातले कोण बाहेरचे कोण ह्यात सारखा गोंधळ उडत होता.बावरली गोंधळली नव्या नवलाईची अवस्था अजून संपली नव्हती.तरी जाग आल्यावर ती एक क्षण खोलीत घालवत नसे.माडीवतून खाली उतरताना हातातला हिरवा चुडा पायातल्या पैंजणांचे तसेच जोड्व्या बिरोद्यांचे घुंघरू वाजायला लागले की गडी माणसे वळून पहात...ती लालबुंद व्हायची अश्या वेळेस शरमेने.
माडीवरून उतरले की मधे मोकळी जागा.डाव्या हाताला माजघर मोकळ्या जागेत सणावारांच्या पंगती बसतात असे कुणीतरी सांगीतलेले.एरवीचे जेवण स्वयंपाक घरात व्ह्यायचे.25 पाने बसतील एवढे स्वयंपाक घर .मोकळ्या जागेला 3/4 दरवाजे.त्यातील एक कोठीघरात उघडायचा.एक परसात.परसात खूप झाडी ,वापरायच्या पाण्याचा हौद ...हौदाजवळ पाणी तापवायचा बंब..तिथेच पाण्याच्या बादल्या भरून ठेवलेल्या.बाजूला न्हाणीघर .फक्त बायकांचे.त्यालाच जोडलेली एक प्रशस्त खोली.तिथे घरातल्या बायकांचे कपडे ठेवलेले घरात घालायचे.आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश नव्हता.हौदाच्या थोड पलीकडे टिनशेड .डाव्या हाताल गुरांचा गोठा आणि त्यांच्या चारापाण्याची सोय...त्या पलीकडे विहीर.हौदाच्या उजव्या हाताला सरपणाच्या टिनशेड नंतर एक खोली.ती खोली आजपर्यंत तिने उघडी पाहीली नव्हती.त्या खोलीला एक झरोखा तेवढा मोठ्या गजांचा...आणि जमीनी लगतच...फक्त त्याला तावदाने नव्हती.तो झरोखा मागच्या बाजूने.....जिथून झाडी फक्त दिसायची.
ती आलेली दिसताच एक गडी धावत पळत आला.त्याने बंबाखाली बादली लाऊन तिच्यासाठी पाणी काढले.ती बादली आणि थंड पाण्याची बादली आत नेऊन ठेवली.
ती आंघोळ करून बाहेर आली.स्वयंपाक घराकडे गेली.आज ओट्याजवळ 'बाई'दिसत नव्हत्या.मधली ने गॅस वर चहाचे आधण मांडले.लहानी भाजी चिरत बसली होती.स्वयंपाकघराचे आतले दार देवघराकडे उघडत होते.तिथे सासूबाई जपमाळ ओढत बसलेल्या.मोठी खमकी बाई असावी ही असे तिला रोज सारखे आजही वाटून गेले.आंघोळ झाल्यावर देवाला आणि समोर असतील तितक्या मोठ्याना नमस्कार करायचा हा शिरस्ता होता...त्याप्रमाणे तिने केले.स्वयंपाकघर स्वच्छ होते.शेणाने रोज सारवण व्हायचे.उजवी कडे मातीचा ओटा त्यावर चुली...तिथे सोवळ्याचा नैवेद्याचा स्वयंपाक व्हायचा.कुळाचाराचे ,नवसाचे देव सगळे मोठ्या मराबतीने देव्घरात बसलेले.जोशी भटजी पहाअते येउन इथे आंघोळ आ न्हीक करून इथलेच सोवळे नेसून पूजा करायचे.एवढ्या माणसांच्या घरात देवासाठी कुणालाच वेळ का नसावा ह्याच तिला कोडे पडलेले असायचे.देवघरात कंबरे एवढी समई कायम तेवत असायची .पोळ्या करायला एक मद्रासी अय्या यायचा.बाकी स्वयंपाक म्हणजे वरण भात भाजी चटण्या कोशींबीरी आणि काही गोडाच...असा बेत रोजचा...हा सगळा स्वयंपाक 'बाई'करत...साग्रसंगीत नैवेद्य वैश्वदेव झाला की आरती आणि मग जेवणाची पंगत.बाई म्हणजे मोठ्या जाऊबाई.त्यांचा मुलगा शहरात शिकायला होता.मधलीचे मुल इथल्याच शाळेत जात होते.लहानीचा मुलगा लहान होता.आणि ही चार नंबर.
-------------(क्रमश:)