दिलीप लिमये ह्यांची हे आत्मकथन एका झटक्यात वाचण्यापेक्षा...अशा भागात वाचायला तुम्हाला निश्चित आवडले...प्रत्येक भाग स्वयंपूर्ण आहे...
विक्रम
भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये
त्र्याऐंशी सालच्या दिवाळीत पहिल्याप्रथम दिवाळी भेटकार्डे हातांनी रंगवायचा खटाटोप केला.
नोकरी सांभाळून भेटकार्डे रंगवायचो. वर्षातील सहा महिने खपून काम करायचे आणि दसऱ्यापासून पुढे विकायचा धंदा करायचो...बकुल जेमतेम सहा महिन्यांची असताना सुरुवात केली...पुढच्या पाच वर्षांत माझी बायको भारती या व्यवसायात सामील झाली. त्या वर्षी तिनं स्क्रीन प्रिंटींग शिकून घेतलं. मी कार्डे हातानं रंगवायचो..दादा घोलप मित्र मदतीला असायचा.अख्खी सासुरवाडी मदतीला उभी असायची...काम वाढत राहिलं.
त्या साली भारतीनं आप्पा बळवंत चौकातील नंदादीपच्या महाजनांकडून मोठ्ठा अल्बम आणला..तो ओळखीच्या माणसांना दाखवायचा.कार्डांचा आकडा ठरवायचा , काम मोठं असेल तर आधी थोडी रक्कम आगाऊ उचल म्हणून घ्यायची..आणि काम दोघं मिळून पूर्ण करायचो..
गरीबी नको असली तरी अपरिहार्य असते. तिच्यावर मात करायची...नको, ही वाक्यरचना नको...तिच्याशी चार हात करायचे आणि या चिकट लढाईत लक्ष्मीच्या हातातली नाणी आपल्या प्रपंचाच्या घरट्यात खेचून आणायचे ते मंतरलेले दिवस होते..
चार हात करायचे....हा शब्दप्रयोग कुणी सुरु केला असेल? नक्की तो लगीन झालेला..आणि भारतीसारखी संगिनी मिळालेला भाग्यवान माणूस असणार..शंकाच नाही. माझे दोन हात चाकरी सांभाळून काम करणारे. भारतीचे दोन हात बकुळाबाईला सांभाळत प्रिंटींग करणारे, स्वैपाक करणारे, ...
-------- मी सकाळी चाकरीसाठी निघालो की भारती लुना घेऊन घर सोडायची. जड अल्बम, रेवा, तिचा डबा असं लुनावर घेऊन ती कामाला लागायची. ऑर्डर्स गोळा करणे, त्या नंदादीपच्या प्रेसमध्ये नोंदवणे, टाईपसेटिंगचा मजकूर देणेघेणे...आणि बकुळला घेऊन पुन्हा घरी येऊन नव्या दमाने स्वयंपाक रांधणे...मी बँकेतून आलो की कापलेल्या पांढऱ्या धोप गुळगुळीत कागदांचा गठ्ठा समोर घ्यायचो आणि रंगांच्या खेळात रमून जायचो...मग रात्री दहासाडे दहाला डोळे थकून जात. रंग कळेनासे होत..भारती सांगायची..
"आता पुरे...उद्या पहाटे उठा..पण आत्ता झोपा. दिवा बंद करा...”