काय सुंदर रूपक कथा आहे पहा...अप्रतिम...हा एकच शब्द आहे..
विक्रम
वटवृक्ष - प्रा. डॉ. ललित विठलाणी
कोणे एके काळी,
नदी किनारी एक वटवृक्ष होता.
ती नदी त्या वट वृक्षाकडे आशयघन डोळ्यांने बघत असे, कधी हसे, कधी रुसे, अन कधी कधी त्याच्या पायथ्याशी जावून बसे.
एकदा वटवृक्षाचे नदीवर प्रेम जडले. ती ही नेमाने यायची त्याला भेटायला, न चुकता. आली की त्याला चहुबाजूने व्यापून टाकायची, मिठीत घ्यायची.
तिचे भेटणे सुरूच राहिले, तो ही मग अंतर्बाह्य तृप्त व्हायचा तिच्या प्रेमळ सहवासाने.
अशी प्रेम कहाणी सुरु होती. राजा राणी सुखात होते, अन त्या वटवृक्षावर असलेले पक्षीसुद्धा त्या दोघांच्या प्रेम कहाणीने प्रेरित होवून, "प्रेम गीत" गात होते.
एक दिवस त्या नदीला, भरभरून आला पूर. सुटला भावनेचा बांध, अन अनावर झाले तिला आतून. तिचे अश्रू बघून, वटवृक्षाने तिला अलगद मिठीत घेतले.
नदीने वृक्षाला आकंठ सामावून घेतले, अनाहूत तो वटवृक्ष तिच्या प्रेमाच्या भरतीने उन्मळून पडला.........अन नदीच्या सोबतीने पडत, झडत, खितपत, अडकत, सामोरे जावू लागला. तो आताही वाहतोय तिच्या संगतीने, आपले अस्तित्व सोडून............
काल एक पक्षी, त्याच नदीतील वाहणाऱ्या खंगलेल्या, झडलेल्या वटवृक्षाकडे बघून दुसर्या पक्ष्याला म्हणाला, हा ''ओंडका'' ओळखीचा वाटतोय....................... आता ऐकायला येत नाहीत पक्षांचीही गाणी.
नदीचे ही हळू हळू, आट्लेय पाणी.-------ओंडक्याच्या डोळ्यात दाटलेय पाणी.............