खूप आकार घेते आहे ही ५ भागातील फिरस्ती...आज भाग ४था
विक्रम
ती ……………तृप्ती कुलकर्णी
भाग ४
पुस्तक देण्या-घेण्याच्या गोष्टी नंतर चार-पाच दिवस आमच्या दोघींची काही भेट झाली नाही. एक अर्थी ते बरच झाल कारण माझ्याकडे लगेच जाऊन पुस्तक आणायला वेळच नव्हता. पण त्या काळात मी ते पुस्तक आणले आणि तिची वाट पाहू लागले. पण त्यानंतरही ती दोन-तीन दिवस काही भेटली नाही. मग माझ्या मनाला रुखरुख लागली. ही गेली कुठे? तिला बर नाहीये की काय? असे प्रश्न मला सतावू लागले. पण तिच्या मैत्रिणी तर दिसत होत्या! मग हीच कुठे गायब झाली? बर तिच्या मैत्रीणीना माझी भाषा कळण जसं अवघड तसं त्यानाही माझ बोलण कळण अवघडच की. शेवटी ठरवलं बघू तरी प्रयत्न करून. संध्याकाळी तिच्या मैत्रिणींशी संवाद साधला आणि कळल की ती दुसरीकडे कामाला गेली आहे. मग त्यांच्या बरोबर मी तिला निरोप दिला म्हणाव, दीदी आठवण काढत होत्या त्यांना भेटायला ये.
त्यानंतर जवळ पास दोन-तीन दिवसांनी ती दिसली. नेहमीप्रमाणे मला पाहताच बोलायला आली. मी अगदी उत्साहाने ते पुस्तक तिला दिले. तिने ते फार हळुवारपणे हातात घेतले. जणू काही ती फार अनमोल अशी गोष्ट होती तिच्यासाठी. आतमध्ये तिचे नाव देखील लिहून ठेवले होते मी. त्याचे तिला फारच अप्रूप वाटले.
"माझ्यासाठी दिलेलं हे पहिला बुक आहे हा दीदी ". हे सांगतानाचा तिचा चेहरा मला आजही आठवतो. मी म्हणलं,
"आता हे नीट वाच, काय कळणार नाही ते मला विचार मी सांगेन तूला समजावून. जर हे पुस्तक तुला नीट समजल आणि तुला मराठी नीट यायला लागल की बाहेरून आपण तुला दहावीच्या परीक्षेला बसवु. पाहू आता काय होतंय ते." तिला फारच आनंद झाला.
"मला पहिल्यापासून मराठी शिकायचं दीदी".
"ठीक आहे तू तुझ्या सवडीने वेळ काढ तुला एकदम भारी मराठी शिकवण्याची जबाबदारी माझी."
हे ऐकताच तिचे ते पाणीदार डोळे एकदम लकाकू लागले. त्या गडबडीत तिने मला धन्यवाद दिले नाहीत हे तिच्या थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले. मग मला मोठ्याने हाक मारून, दीदी! आणि नमस्काराची खुण तिने केली. तिची ती धन्यवाद मानण्याची पद्धत मला फारच निरागस वाटली. मनाच्या अतिशय आनंदी आणि प्रसन्न अवस्थेत आम्ही दोघी आपापल्या घरी गेलो.