Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

ढोर - विनया पिंपळे

$
0
0

हे विदारक आहे. समाजातल्या दोन स्तरांतील ही विषमता जेव्हा संपेल तो सुदिन.

- अक्षय

ढोर - विनया पिंपळे

"छकुबाई , जाय बरं पारापसल्या हिरीवरनं येक खेप घ्यून ये."- शांतानं आपल्या पोरीला सांगितलं.

"जाय वं मी नाई आनत ... लग्गे बुडात्नी हाये पानी. निरा गायच येते. नंबरय लावा लागते. मी सयपाक करतो यकपरी पन पान्याचं नोको सांगू." ...आणि छकू खरंच चुलीपाशी जाऊन बसली. मग काय इलाजच नव्हता. घरातल्या दोन हंड्यातलं बुडाला लागलेलं चुळभर पाणी तिनं एका छोट्या वाटीत काढून ठेवलं अन् स्वतःशीच पुटपुटली-'दलिंदर गाव मेलं ...मरत्या मान्साले घोटभर पानी भेटनार नाई इथं. नळ तं कवा येनारच नाई अन् कंच्या हिरीलेबी पानी नाई.'

दोन्ही रिकामे हंडे डाव्या हातात घेऊन तिनं दोरीवरचं पालव चुंबळीसाठी ओढलं...खांद्यावर टाकलं आणि घरातून बाहेर पडली. अंगणभर एक नजर फिरवली. सगळं अंगण उखरवाखर झालेलं. तिला वाटलं-'जिथं प्यायले पानी भेटना तिथंसा अंगनात टाकायला कुठून आनाचं पानी?" .. गावातल्या प्रत्येक घरापुढचं अंगण हे असंच. अस्तव्यस्त रखरखीत ! अपवाद म्हणून दोन तीन घरं असतीलही. पण फक्त दोन तीनच !! ...म्हणजे सांगायचंच झालं तर पाटलाच्या घरी बोअर आहे. बटण दाबलं की धो धो धार पडते ...पण पाटील कोणाच्या बाप्पाला थेंब देत नाही.

... बाभळीच्या काट्यांचे कुंपण असलेल्या अंगणात फाटकाच्या रिकाम्या जागेवर अडवून ठेवलेली खाट खरकन् बाजूला करून शांता पाराच्या दिशेनं झपझप चालू लागली. डोक्यावर उन्हाची धग आणि पायाजवळ पडलेली बुटुकभर सावली यांच्या सोबतीनं तिनं कसाबसा पार गाठला.

"शांतेव ...कायले आली आता?" ...विहिरीवर आधीच हजर असलेल्या रखमानं विचारलं.

"कायले मंजे?? ..तुले पानी पायजे अन् मले काय नको का काय?"-शांतानं हिसक्यात उत्तर दिलं तशी रखमा उत्तरली.

"आत्ता माय बाई.... इत्का काहिचा तनका आला वं तुले? ... हिर पूरीच आटली मनलं ... पानी पायजे असन तं एखांदा बाॅम टाक हिरीत ...आखीन फुटला तं फुटन एखांदा झरा."

आता मात्र शांतीचे अवसानच गळाले. गावच्या त्या टोकाले जाऊन हापशीचंच पाणी तिला आणावं लागणार होतं....'देवा ... एखांदी जहागिरदारीन तरी कराचं होतं मले. बात शे-दोनशे रुपय फेकले असते अन बलवलं असतं ट्यांकरगिंकर ...पन इथं पन्नास रुपय कमवालेच रगत आट्टे तं ट्यांकरले कुठून देवाव? ...मराच लागन .. हापशीलोक जाच लागन आता.' ...विरत चाललेल्या साडीच्या मळक्या विटका पदराच्या टोकाने डोक्यावरचा घाम पुसत शांती स्वतःलाच म्हणाली आणि हापशीकडे जायला निघाली.

पहिल्यांदा जनाबाईचं मंदीर, मंग सखूचा पिंपळ अन् मानदाराची सामट ओलांडून पुढे जातांना पाटलाचं घर दिसलं. आखीवरेखीव अंगण...शेणसडा टाकलेलं... रांगोळी काढलेलं. अंगणापुढच्या रस्त्यावर पाटलाच्या ढोरांना गडीमाणसं बोअरच्या पाण्याखाली बदाबदा धूत होती ....ते पाहून शांतीला वाटलं ....

'मानूस व्हायपरीस पाटलाच्या घरचं ढोर व्हायले कवाबी परवडते ....'


Viewing all articles
Browse latest Browse all 1118


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>