सरड्या पेक्षाही चपळाईने माणसं रंग बदलतात... परिस्थितीचे भान न ठेवता. काय आहे खरे सत्य..?
-अक्षय
सत्य? – मंजुषा अनिल
त्यांच्या घरासमोर गर्दी जमा व्हायला लागली. शेजारी आत डोकवायला लागले. घरातल्या बाई रडायला लागल्या होत्या. साहजिकच ना, आईचं काळीज. खूप रडत होत्या. त्यांच्या मुलीने पेटवून घेतलं स्वतःला असा फोन आलेला त्यांच्या घरी.. हळूहळू सांत्वनांचे हात पाठीहून फिरायला लागले तश्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या... सासरचे वाईटच होते आधीपासून ..पैशाचे लोभी..मुलगी सुखी नव्हतीच त्यांची... जावयाचा व्यवसाय असातसाच... सतत कश्याची न कश्याची मागणी असायचीच... पोलिसांत कम्पलेंट करायला हवी... कोणाच्या आहेत का ओळखी...हे, अन् काय काय...
मग आणखी एक फोन... त्यांच्या मुलीने नाही तर मुलीच्या जावेने पेटवून घेतलं..पाठीवरचे हात खाली यायला सुरुवात झाली..विलापाची जागा सुस्कार्यांनी घेतली. आता गोष्टी बदलल्या..आजकाल मुलींना पटवून घेताच येत नाही..करायचं ना सहन... काय होतं...
मी माझ्या मुलीचा हात घट्ट धरून घरी परतले.