सायकल ही सुचिताची कथा आत आत खूप दुखावून गेली..एका आईचे जग किती सीमित असते...आणि एका मुलाची दृष्टी किती वेगळ्या अर्थाने किती "सीमित" असते ह्याचे खूप दुखावणारे चित्रण सुचिताने केले आहे...सायकल ह्या कथेत..जियो सुचिता
सायकल – सुचिता घोरपडे
“ये आय माझा उद्या जलम हाय नव्हं, तू गेलं साल म्हणली व्हती की औंदच्या साल तू मला सायकल घेवून श्यान देशील म्हणून.”
“व्हय रं, पर तुला ठाव हाय म्या म्हनली व्हती की सायकल घ्यायला पूर पैसा जमा झाल की मग घेवू आपणबी. तवा अजुन थोड दिस जावूद्यात मग बघू.”
“नाय नाय आय, मला उद्या पायजे म्हणजी पायजे. मी वरीसभर तुझ्याकडं काय बी नाय मागितलं. नवी कापडं बी नाय शिवली. मला पुढल्या सालला बी काय नगं देवूस पर औंदा सायकल पायजे.”
त्याची कळकळ तिला समजत होती. खरेच त्या पोराने गेली काही वर्षे काहीच नव्हते मागितले. पण गावातल्या पोराच्यांकडे सायकली होत्या आणि ह्याच्याकडे नव्हती. त्यात त्याला लहानपणापासूनच सायकल खुप आवडायची, तिच्या एका फेरीसाठी तो त्यांच्या मागे मैलमैल धावायचा. पण ती तर बिचारी काय करणार, गावोगावी फिरून डोंबा-याचा खेळ करून त्यांना कधी पुरेसे पैसे मिळत तर कधी नाही. पण आपल्या पोराची खुप दिवसाची सायकलची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिही झटतं होती. पैसे साठवत होती मडक्यात. पण पुरेसे पैसे अजूनही जमा झाले नव्हते.
“काय वं, आज तालूक्याच्या गावाला जावूया, तिथला बाजार हाय तवा तिकडच ख्योळं करू. ख्योळं बी लै रंगल बघा तिथं. चार पैसे बी जादा मिळतील. मग रंग्याला नवी सायकल घेवून देवूया. पोरं लै हिरमुसलयं ओ.”
“अगं ते समदं खरं हाय पर खेळ किती बी रंगला तरी बी एवढं पैसं जमायला बी पायजे.”
“अव माझ्याकडं हायीत थोडं, म्या मडक्यात चार साल साठवल्यात, बघू कमी पडलं तर काय बी करू परं रंग्याला सायकल घेवून श्यान देवूच.”
“आज येगळा ख्योळं करू, म्हणजी लोक बी खुष व्हतील.तुमी समदं जुनं सामान काढा, तेबी नेवू आज.”
“येगळा ख्योळं म्हणजी गं, काय करणार हायीस आज.”
“ते समदं तिथचं दावते, पर पयलं जावू चला.”
आज रंग्या पण त्यांच्यासोबत गेला तालूक्याला. तालूक्याचा बाजारला चांगलीच गर्दी जमली होती. माणसांनी बाजार फुलून गेला होता. आणि या तुडुंब गर्दीत मोक्याची जागा शोधून गाठोडं टाकल. आणि काठया दोरखंड बांधायला चालू केले. तशी पोरंटारं बाया माणूस जमा होवू लागली आणि खेळ चालू झाला.
मधोमध एक खांब उभा केला. रंग्याच्या आईने कासोटयाला गाठ मारली अन सरसर खारूटली सारखी ती वर चढून गेली सुध्दा. आज वेगळाच उत्साह तिच्या ठायी भरला होता. रंग्याच्या बाबा ढोल वाजवत होता आणि ती त्या तालावर हाता पायाच्या मदतीने लोंबकळून वेगवेगळे कसब दाखवत होती.प ण जेव्हा कधी तिचा एखादा हात सुटल्यासारखा वाटायचा तेव्हा रंग्या आणि त्याच्या बाबाचा जीव भितीनी गारठायचा. पण तिच्या चेह-यावर भितीचा लवलेशही दिसत नव्हता. सगळे थक्क होवून पहात होते.
टाळ्यांच्या कडकडासरशी एक खेळ संपला. आज पहिल्या खेळातच लोकांनी पैश्यांची उधळण केली. त्यामुळे ती जाम खुष झाली आणि दुस-या खेळाला सज्ज झाली. जुन्या सामानातील एक रिंग काढली, त्याला चिंध्या गुंडाळल्या होत्या. मशाल पेटवली रॉकेल टाकून आणि तिने त्या रिंगला सुध्दा जाळ लावला. जसजशी रिंग पेट घेवू लागला तसतसे रंग्याच्या डोळ्यातील भाव बदलू लागले. भितीचा गोळाच उठला त्याच्या पोटात. तो तिला नको म्हणू लागला पण ती कुठली थांबतेय. थोडे लांबवर ती गेली आणि तिथून पळत येवून तिने आगीच्या जाळातून उडी घेतली. सगळे आ वासून बघतच राहिले. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. खुप पैसे टाकले गेले.
डोळ्यांनीच तिने रंग्याला ते उचलायला सांगितले, पण नेहमी उडया मारत पैसे उचलणा-या रंग्याला आज त्या पैश्यांचा मोह होत नव्हता. आज जीवावर उदार होत तिने खुप वेगवेगळे खेळ दाखविले. रंग्याचा बाबा ढोल बडवून आणि भितीने घामाघूम झाला होता. रंग्या तर रडायच्या घाईला आला होता.
पण तिच्यात आज असे काही संचारले होते की ती थांबायला तयारच नव्हती. आता फक्त दोरीवरचा खेळ बाकी होता. हातात काठी घेत ती वर चढली आणि दोरीवर चालू लागली, काहीतरी वेगळे करायचे असे अजून बाकी होते तिने जळती मशाल वर फेकण्यासाठी रंग्याला इशारा केला.पण रंग्या काही केल्या तयार होत नव्हता, लोक दंगा करू लागले तसे त्याने नाइलाजाने मशाल वर दिली.एका हातात काठी आणि दुस-या हातात मशाल घेवून ती चालू लागली. रंग्याचा बाबा जीवाचा आकांत करत ढोल बडवू लागला. अर्धा अधीक दोर पार झालाच होता तोच दोरखंड सैल झाला आणि काठी निसटणार तोच रंग्या व त्याचा बाबाने काठी पकडली. तश्या स्थितीतही तिने खेळ पूर्ण केला. रंग्या आता रडू लागला होता.
बघणारे सगळे लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागले. जशी ती खाली उतरली तसे रंग्याने जावून तिला कडकडून मिठी मारली. आज खुप म्हणजे खुप पैसे जमा झाले. रात्रभर रंग्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. तसाच तो झोपी गेला.
सकाळी जेव्हा तो उठला चूळ भरण्यासाठी दारात आल्यावर त्याला नवीन सायकल दिसली.