स्वाती चांदोरकर ह्यांची ही कथा वाचली आणि मला त्यांच्या वडिलांची व.पु. काळे ह्यांची तीव्र आठवण झाली...आज वपूना खूप अभिमान वाटला असता....स्वाती चांदोरकर आपल्या वडिलांचा वारसा किती सुंदर चालवत आहेत..!! माझे भाग्य की माझ्या तरुणपणी कोहिनूर थियेटर समोरच्या पहिल्या मजल्या वरच्या घरात मी वपुंच्या तोंडून संवादिनी ऐकल्या आहेत...आणि आज त्यांची मुलगी नुक्कड वर गोष्टी लिहित आहे...
विक्रम
दाणे – स्वाती चांदोरकर
आज्जीने आजोबांच्या ओंजळीत मुठभर तांदूळ दिले. रोजच्यासारखे आजोबा तांदळाने भरलेली ओंजळ घेऊन अंगणात आले. झोपाळ्यावर बसले आणि तांदळाचा सडा अंगणात घालायला सुरुवात केली. रोजच्या प्रमाणे एक चिमणा आला, एक दाणा टिपून उडून गेला. एक चिमणी आली दाणा चोचीत घेऊन उडून गेली. दाणे संपेपर्यंत हेच चालू राहिलं.
दाणे संपले तशी आजोबा घरात आले. आज्जीला म्हणाले, “आता दिवसभरात एकही चिमणा, चिमणी दिसणार नाही.”
दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच सिलसिला...
बरेच महिने, वर्ष हेच चालू होतं.
एका सकाळी मात्र आजोबांनी न रहावून चिमण्याला विचारलं,
“काय रे बाबांनो, दाणे संपले की दिवसभरात आजीबात फिरकत नाही तुम्ही कुणी. जाता तरी कुठे?
चिमणा म्हणाला,
“जिथे दाणे असतात तिथे जातो. दाणे नसतील तर येऊन काय करू?”
शेवटचा दाणा चीमण्याने चोचीत उचलला आणि तो भुर्रर्र करून उडून गेला.
आजोबा बराच वेळ झोपाळ्यावर विचार करत बसले. काही एक निर्णय घेतला आणि तरातरा घरात गेले. कपाट उघडलं, एक फाईल काढली आणि त्यातले कागद काढून टराटरा फाडून टाकले.
आज्जी आली. तिने कागदाचे कपटे खोलीभर विखुरलेले बघितले.
“अहो, काय हे? काय झालं? काय फाडून टाकलंत ?
आजोबा म्हणाले, “दाणे.”
आज्जीला काsssही समजलं नाही.
नेहमी प्रमाणे शनिवार उगवला,
आज्जी आजोबांचा एक मुलगा आला, भेटला, विचारपूस केली, निघून गेला.
संध्याकाळी लेक आली, खाऊ घेऊन आली, बसली, निघून गेली.
रात्रीला एक मुलगा आला, औषधं दिली, हवं नको बघितलं, निघून गेला.
आजोबा हसले, आराम खुर्चीत पहुडले, गाणं गुणगुणू लागले....
एक चिमणा आयुष्याचं गणित शिकवून उडून गेला....