मित्रानो...ही एक वेगळ्या जगाची फिरस्ती आहे..मी वाचता वाचता गुंग झालो...हे असेही एक विश्व असते...तर...
विक्रम
स्क्र्याम्ब्ल्ड एग - स्वाती फडणीस
नेहमीप्रमाणे स्वतःच्या जवळील चावीने दार उघडून तो घरात आला. बैठकीच्या खोलीतील एका खुर्चीत पाठीवरील बॅग टाकून त्याने स्वतःला सोफ्यावर झोकून दिले.. "Only five minutes..!" तो पुटपुटला. तेवढा वेळ गेल्यावर.. "'सोहम' उठ.. बघ अजून shoes देखील काढले नाहीयेस. उठ, शूज काढ, कपडे बदल, हातपाय नीट धुऊन घे.." तो स्वतःलाच सांगत गेला.. त्या नंतर अगदी लगेचच नाही पण थोडा वेळ घेऊ
"शूज काढले. First task done.
कपडे बदलले. Second task done.
हातपाय धुतले. Third task done.
Now it's time to have lunch." करून स्वतःला सूचना देत तो स्वयंपाकघरात आला. स्वयंपाकाच्या ओट्यावर त्याच्यासाठी Plate, bowl, त्याच्या बाजूला चपात्यांचा डबा आणि भाजी असलेली कढई असे सगळे ओळीत मांडून ठेवले होते. "That's good..!" ओट्यावरील तयारी बघून त्याने समाधान व्यक्त केले. चपात्यांचा डबा उघडून त्यातून त्यातल्या त्यात पातळ चपात्या शोधून घेताना.. "तरी, मी मम्मीला सांगितलं आधीच्या मावशी याहून बऱ्या चपात्या करायच्या..!" म्हणून त्याने किंचित ओठ मुडपला. मग भाजीच्या कढई वरील झाकण उचललं.. "O, no. Again cabbage..!" असा निषेध व्यक्त करत त्याने कढईतील भाजी पानात वाढून घेतली आणि तो पुन्हा बैठकीच्या खोलीत आला. एका हातात रिमोट खेळवत त्याने टीव्हीवर surfing करत पहिला घास तोंडात सरकवला. " यक..! यात double salt आहे." म्हणून त्याने जेवायला घेतलेली डिश बाजूला ठेवली.
"Master 'Soham', should we cancel the lunch..? O no..! I am quite hungry..!! Let's cook something.." म्हणून तो पुन्हा एकदा स्वयंपाकघरात आला.. आता काय करावे याचा विचार करत त्याने freeze उघडला.. "yes, scrambled egg.." म्हणत त्याने फ्रिजमधुन तीन अंडी बाहेर काढली..
"तीन अंडी घ्या.. step one complete.
ती फोडून एका बोलमध्ये घाला.. step two complete.
मग त्यात थोडंसं दूध, चिमूटभर मीठ आणि किंचित मिरपूड घालून एकजीव होईपर्यंत ढवळा.. step three complete." हे म्हणताना तो विशेष खूश झाला. "Very good master 'Soham'..! आज तुम्ही दूध, अंडं काहीही न सांडता फेटण्याची क्रिया पूर्ण केलीत. I am proud of you my boy..!" बोलतं त्याने आनंदाने स्वतःची पाठ थोपटून घेतली.
त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं बटर घेऊन तो मंद आचेवर तापत ठेवा.. 'butter..?' मिळालं. आता 'पॅन' घेतला. आता पॅन शेगडीवर ठेवा. अरे हो त्या आधी स्टूल आणायला पाहिजे नाही का..! नाहीतर तुम्हाला पुढची क्रिया नीट करता येणार नाही." म्हणून scrambled egg च्या recipe मध्ये अजून एका स्टेपची भर घातली.
" एक स्टूल घ्या. तो ओट्यालगत ठेवा. स्टूल वर उभा राहून गॅसची शेगडी पेटवा. त्यावर पॅन ठेवा. पॅनमध्ये थोडं बटर घाला. ते वितळलं की फेटलेलं अंड्याचे मिश्रण पॅनमध्ये ओता. Task four, five, six complete. आता तुम्हाला काही वेळ पॅन मधील मिश्रण हालवतं रहायचं आहे तेवढं झालं की तुमची डीश तयार.. 'Chef Soham..!'" बोलून त्याने पोटातल्या कावळ्यांना धीर दिला. "Yes.. it's done." म्हणून तो स्टूल वरून खाली उतरून त्याची प्लेट घेऊन आला. हात उंच करून गॅस वरील पॅन खाली उतरवून नुकताच बनवलेला गरमागरम- पदार्थ ताटात वाढून घेतला.
"आज एका मुलाची ऐष आहे." म्हणत अर्धवट सोडलेले दुपारचे जेवणं पूर्ण केले.
"Master 'Soham', आता तुला अजिबात वेळ नाही आहे. चल टुशनला जायची तयारी करायला घे.. " बोलत त्याने जेवणाची प्लेट सिंकमध्ये टाकली. एवढ्यात फोनची बेल वाजली. सोहमने फोन घेतला. "हो पप्पा, मी वेळेवर आलो. मावशींनी चपाती भाजी करून ठेवली होती. हो जेवण झालं मी ट्युशनलाच निघालो आहे. संध्याकाळी भेटूच.." बोलून त्याने ट्युशनची बॅग भरली, कपडे केले, बॅग घेऊन सवयीने दाराला कुलूप घातले. आणि तो नेहमी प्रमाणे ट्युशनला निघाला.