ह्या फिरस्ती मध्ये तुम्ही जारा डोकावून आत पाहण्याची गरज आहे..वाचकहो आता ह्यापुढे मधून मधून मी तुम्हाला काही आव्हान ठेवणार आहे...प्रश्न विचारणार आहे..."तुम्हाला ह्या कथेतून काय मिळाले?" आणि तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये थोडक्यात आपल्याला ह्या कथेतून काय हाताशी लागले ते लिहायचे आहे. वर्षभर सातत्याने प्रतिक्रिया नोंदवणारे वाचक...पारितोषिक प्राप्त होतील.
विक्रम
उध्वस्त - स्वाती धर्माधिकारी
रोज फिरायला जातांना किंवा कुठेही जायला बाहेर पडलो की आपण भोवतालच्या बिल्डिंग्ज झाडं चाहुली सारं सारं टिपत जातो आपण, मारुतीच्या मंदिरासमोरच्या गेटवरचे प्रवचनांच्या माहितीचे फलक, किंवा कुठे घरगुती भाजी पोळी करून मिळेलची लागलेली नवी कोरी पाटी, कुठे घातलेला मंडप किती न काय काय आपल्या अनुभवांच्या बेचक्यात रोज गोळा करत असतो नाही आपण?
हे आठवणींचे, निरीक्षणांचे तुकडे देखील आपल्या दैनंदिन जगण्याचा एक सहज भाग बनून जातात. एक अनाम नातं जुळतं आपलं त्यांच्याशी अनासायास..त्या मंदिराच्या भोवती जरा जास्त गर्दी दिसली की लक्षात येतं कीर्तन असावं बहुधा. एखाद्या फ्ल्याट स्कीमच्या दर्शनी भागात ब्युटी पार्लरचा फलक वाचतांना आठवतं तिथल्या पाटलांच्या मुलीनी म्हंटलेल, “मावशी याल माझ्याकडे मस्त कलर करून देईन मी केसांना..किती पांढरे झालेत केस, मी काढतेय नवीन ब्युटीपार्लर लवकरच” ......'लवकरच' किती सापेक्ष शब्द आहे नाही, तिने हे वाक्य म्हणून देखील कितीतरी आठवडे लोटलेत.
त्या दिवशी कार जरा थांबवली बेल्ट लावायला तर घराजवळच्या डाव्या कोपऱ्यावर दिसलं नेहमीचं आंब्याचं झाड, त्याची कोवळी तांबूस पानं चकाकत होती, "आहा चैत्र पालवी" मनात उमटलाच आवाज! त्याच झाडाच्या कैऱ्या पाठवून दिलेल्या त्या मैत्रिणीनी मागच्यावर्षी..किती तरी दिवस पुरल्या होत्या त्या लोणचं, पन्हं, आंब्याची डाळ ..किती काय काय! डोळ्यांनी मोहोर शोधायचा प्रयत्न केलाच, कैरीच्या नुसत्या कल्पनेनीच की अपेक्षेनी तोंडाला पाणी सुटलं.
आज परत येतांना मंदिरापाशी मुलं क्रिकेट खेळत होती, नेमका चेंडू रस्त्यात, तिने कार हळू केली, जाऊ दिलं लहानांना चेंडू उचलून त्यांनीही तिला हसून थ्यांक्यू म्हंटल.....तिला आठवण आली तिच्या मुलाची, त्याच्या दंग्यांची आणि गल्ली खेळांची......डोळ्यात पाणी देखील आलं........आवंढा गिळत निघाली ती.....तो समोर हिरवा कल्लोळ पडलेला ....तिनी गच्चकन ब्रेक दाबले...खिडकीच्या जवळ हिरवा डोलारा.....पुढे जायला होता बाजूने रस्ता ....पण ती स्तब्ध झालेली...त्या दिवशी ज्या डहाळीनी मोहोर दाखवत खुलवलं होतं तीच मोठ्ठी डहाळी रस्त्यावर पडलेली .....हिरवी कंच, प्रत्येक पान अजूनही जिवंत होत...तिने वर बघितलं त्या आंब्याच्या झाडाचा सोलवटलेला बुंधा......तिला एक आक्रोश ऐकू आला ...सभोवताल जणू गरगरतंय वाटायला लागलं.. कांच खाली केली खिडकीची ... तिला त्या हिरव्या जावळाचा खूप लोभ दाटून आला, न रहावून ती उतरली......तो पिवळसर पोपटी मोहोर ....किती जिवंत वाटतोय अजून..पण ..का? का झालं असं अचानक? तिनी त्या घराच्या बंद गेटपर्यंत जाऊन बघितलं त्या घरात काहीच चाहूल नव्हती कुलूप लागलेलं, ...फांदी नुकतीच तुटून पडलेली असावी......आजचं वादळच जीवघेणं होतं..किती सोसाट्याचा वारा होता....पण मग वीज पडलेली का झाडावर?..ती बुंध्याजवळ गेली. कुठेही जळल्याचा मागमूस नाही....... अशी चिरल्या कशी गेली असेल फांदी? अख्खी उभी?
बाकीचं झाड जिवंत .......जगतंच आहे अजून ...ही डहाळी ......उद्या सुकून जाईल ...झडून जाईल मोहोर उद्या ....जीवनाच्या क्षणभंगुरतेच्या दर्शनानी एक काहूर माजलं मनात!
अस्वस्थ झाली ती खूप, हातांनी कुरवाळलं तिनी पानांना...पाणी आलं डोळ्यात.........ती परत गाडीत बसली ...चार घरं पलीकडच्या घरी कशीबशी पोहोचली...........दार उघडून कोसळलीच कोचात ...........तिला त्या जिवंत पानामध्ये तिचा सुहास दिसत होता.....विश्वासच नव्हता बसला तिचा तेंव्हाही अपघाताच्या बातमीवर ...कितीतरी वेळ ती त्याचा चेहरा मांडीवर घेऊन बसून राहिली होती ....सहावी मधला सुहास तिचा सुहास ..असा कसा मरु शकेल ....ती कोरडीच राहिली..निराश्रू .......... अश्रू ढाळून टाकावेत जेंव्हाचे तेंव्हा .....नाही तर असे कधीकुठे उमळतील नेम नाही ......कितीतरी वेळ तिला कानांत त्या दाणेदार मोहोरांचं न ऐकलेलं , न बोललेलं मनोगत ऐकू येत राहिल ..."मला जगायचं होतं आई ....." ......हो ....सुहासचाच आवाज होता ! .....
ती त्या सोलवटलेल्या बुंध्यागत ......तरीही जगतच राहिली .......सूर्यास्ता पासून सुर्योदया पर्यंत!