Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

आजी सापडली - डॉ. माधवी वैद्य

$
0
0

आज माझ्या मनात काय भावना आहेत हे सांगणे कठीण आहे....डॉ.माधवी वैद्य ह्यांनी नुक्कडसाठी गोष्ट लिहून...नुक्कडला खूप खूप मोट्ठे केले आहे..ही कथा एक स्वतंत्र अनुभूती आहे...ती प्रत्येकाने आपली आपण घ्यवी...मी त्या बाद्द्ल बोलू नये.

विक्रम

आजी सापडली - डॉ. माधवी वैद्य

तशी ती माणसांच्या गोतावळ्यातलीच. लहानपणापासून साऱ्याच नातेवाईकांची घरात वर्दळ असायची. ताई, मावशी, आत्या, काकू, पणजी साऱ्यांचा परिचय तिला व्हायला लागला आणि त्यांचे प्रेमही तिला मिळू लागले. फक्त एका नात्याची जागा रिकामी राहत होती. ती म्हणजे आज्जीची जागा. दोन्ही कडच्या आज्या म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई. त्या पैकी एका आजीची ओळख फोटोत का होईना पण झाली होती. वडिलांची आई तिने फोटोत तरी बघितली होती. आणि तिच्या सौंदर्याबद्दलच्या अने गोष्टीही तिने ऐकल्या होत्या. संस्थानिक घराण्यात या आजीला तिच्या सौंदर्यामुळे मागणी घालून लग्न झाल्याचेही तिने ऐकले होते. त्या आजीचं सौंदर्य फोटोत फार दिसत होतं असं नाही पण त्या आजीने डोक्यापासून पायापर्यंत घातलेले खूप सारे दागिने मात्र ती पाहतच राहिली होती. तिच्या त्या संस्थानिक घराण्याचा वारसा त्या वेळची श्रीमंती वैगेरे वैगेरे सर्व कहाण्या तिने अनेकदा ऐकल्या होत्या. पण दुसऱ्या आजीबद्दल मात्र फारसं कोणीच काहीच बोलत नव्हतं तिचा फोटोही घरात नव्हताच. साऱ्या नातेवाईकांच्या गोतावळ्यात देवानं या दोन आज्यांची जागा कायम रिकामीच ठेवली होती. आणि त्या जागेवर बसणारी व्यक्ती कशी असावी? असेल? होती? या कोड्याचं उत्तर तिला काही केल्या सापडत नव्हतं. त्यापैकी एका आजीबद्दल तिचं कुतूहल बऱ्याच अंशी भागवलं जात होतं पण तिच्या दुसऱ्या आजी बद्दल म्हणजे आईच्या आई बद्दल मात्र ते तसंच कायम राहिलं होतं..

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आज्जीचं एक स्थान हक्काचं असतं. तिचा मऊ मऊ साई सारखा स्पर्श आणि मायेने भरलेले मधाळ शब्द याची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. ही उणीव तिच्या आयुष्यात तिला सारखी भासत राहिली होती. वयाच्या सत्तराव्या वर्षी देखील ही उणीव तिला मध्येच काही प्रमाणात अस्वस्थ करून सोडी.

पण ही उणीव काही अंशी तिच्या पणजीनं भरून काढली होती. नांदत्या घरात देवघरातल्या समई प्रमाणे शांतपणे तेवणारी, जगणारी आणि जळणारी तिची पणजी. आईच्या आईची आई! नोनू म्हणायचे सगळीजण तिला “नोनू?” काय हे नाव तरी बाई! कुणी ठेवलं हिचं नाव असं विचित्र! नोनू म्हणे! तिला तिच्या नावाचं खूप हसू यायचं पण ती तिला आवडायची. कारण तिच्या आजीची काही अंशी उणीव भरून काढणारी ती एकमेव व्यक्ती आहे, असं वाटायचं तिला. पण नोनूचं घरातलं अस्तित्व मात्र असून नसल्या सारखं वाटायचं. कारण तिचं ‘मौनव्रत’. खूप कमी बोलणारी आणि सतत कुठल्या तरी कामात स्वतःला गुंतवून ठेवणारी नोनू होती. साऱ्या घरादारावर चाणाक्ष नजर ठेवणारी आणि जे बघतो आहोत त्याचा क्वचितच उच्चार करणारी ‘नोनू’! कोणत्याही गोष्टीचा उच्चार नाही, कोणाला बोल लावणे नाही कोणाचे उणेदुणे काढणे नाही. ‘आपण बरे की आपले काम बरे’ हे सततचे धोरण! काम करत निमूट जगणे हा मार्ग! तिच्याकडे बघून वाटायचं आयुष्य म्हणजे काय? तर तडजोड, अॅडजेस्टमेंट, हाच खाक्या! समजूतदारपणा तर इतका होता की आजकालच्या बायकांनी समजूतदार पणा शिकण्यासाठी क्लासच लावावा तिचा. जुन्या काळातली असूनही विचार मात्र प्रगल्भ होते तिचे. म्हणायची‘हे बघ ! बोलताना दहा वेळा विचार करावा माणसानं एकदा शब्द तोंडातून गेला की सुटला मग पुन्हा परतीची भाषा नाही.” विठ्ठल मंदिरात दरवर्षी विठोबा रखुमाईंना सुंदर पोशाख शिवायची. वर्षातून दहा बाळंतीणींना बाळंतविडा करून पोहोचवायची. कुणा न कुणा विद्यार्थ्याला दर आठवड्यातून एकदा जेवायला बोलवायची. तो जेवत असताना आस्थेने वाढायची मायेन बघायची! “ अन्नदान हे महाश्रेष्ठ दान आहे बाई ! त्याचं समाधान काही वेगळंच. समोरच्याची भूक भागवाण्यासारखं दुसरं पुण्य नाहीच बघ! घरात येणारा पै-पाहुणा तृप्त मनाने बाहेर गेला पाहिजे. साऱ्याना सामावून घेण्याची साऱ्यांना मूक आधार देण्याची वृत्ती होती तिची. अशीच असेल का? हिची मुलगी? माझी आजी?

तिच्या विषयी ही तिची मुलगी असूनही फार आठवणी काढत नाही तिच्या. किंबहुना घरात कुणीच या आज्जीबद्दल बद्दल कसं कोणी फारसं बोलत नाही? तिला असे प्रश्न वारंवार पडायचे ती घेरली जायची अश्या प्रश्नांनी. आता ती ही मोठी झाली होती. तिचेही लग्न होऊन तिलाही नातवंड झाली होती. ती तिच्या नातवंडांवर अपार माया करायची. कारण तिला सारखे वाटत राहायचे, तिला तिच्या आज्जीचं प्रेम मिळालं नाही. पण तिच्या नातवंडांना मात्र आज्जीचं भरभरून प्रेम देता आले पाहिजे. तिच्याही वाट्याचे आणि तिच्या नातवंडांच्याही वाट्याचे. तिची आज्जी असती तर तिनेही तिच्या पणजी सारखेच प्रेम केले असते ना? तिच्यावर?

तसे तिचे कुटुंबही प्रेमळ होते. आत्या मावश्या, माम्या बहिणी काकवा साऱ्या प्रेम करायच्या तिच्यावर कोडकौतुक करायच्या. पण तिची उणीव कुणीतरी भरून काढणार होतं का? पणजी मात्र तिची नाही म्हणायला जरा तरी भरून काढणारी होती. पण खरोखरच तिला सारखं वाटत राहायचं तिची पणजी कसलंतरी दुःख पोटात ठेवून जगते आहे. समईच्या वातीप्रमाणे जळत जगते आहे. तिचे हे जळणे फार थोड्यांना माहित होतं. तिचा उभा जन्म तिने निष्ठेने भावाचा संसार सावरण्यासाठी घालवला. तिची जाऊ देवाघरी चल धरली. पण आपली पाच मुलं हिच्या ओटीत घालून गेली. लहान लहान पोरांना वाढवण्यासाठी, त्यांना त्यांच्या आईची आईची उणीव भासून न देण्यासाठी काय काय केलं हिने/ दीर घरात पैसे आणून द्यायचा आणि हिचे हात मुलांच्या संगोपासाठी राब राब राबायचे. सारेजण तिला ‘वैनी’ म्हणायचे. वैनीचा लळा घरापासून दारापर्यंत साऱ्यांनाच !

बालविधवा होती ती. सासू माणुसकीची म्हणून केशवपनापासून वाचली ती! नाहीतर...! पण नोनू मात्र आपल्या सासूचे आभार जन्मभर मानायची. “त्या केशवपनाच्या भयंकर कृत्यापासून मला लांब ठेवलं माझ्या सासूबाईंनी! नाहीतर मला काय समजत होतं माझं काहीही होऊ शकलं असतं. पण एका बाईची प्रतिष्ठा दुसऱ्या बाईंनीच सांभाळायची असते. पुस्तकात हे कुठे लिवलं नसणार तुझ्या पण मी सांगते तुला !... माझ्या सासूने माझ्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून बघितलं आणि त्याहूनही जास्त माणूस म्हणून बघितलं! नाहीतर कित्येक बालविधवांना कुठे चुकलं होतं डोक्याचं मुंडन? आणि कुठे चुकलं होतं आलवण?” तिचे डोळे भरून यायचे. तशी विचारांनी आधुनिक होती ती! समंजस होती, धीराची होती, प्रेमळ होती. माझी आजीही अशीच असणार !

बालविधवा होती पण तिच्याही पोटी एक लहानसं मुल जन्माला घालून तिचा नवरा गेला होता. दिराशी तडजोड होती ना! हिच्या पोरीला वाढवताना दिराचा हातभार लागला होता आणि त्याच्या मुलांना ही मायेची पाखर घालत होती ती त्यांची वैनी होऊन. हिची मुलगी म्हणजे माझी आजी आपल्या चुलत्याच्या मुलांच्या गोतावळ्यात वाढली योग्य वेळ आल्यावर साऱ्यांचीच लग्नंकार्ये झाली. चुलत्याची पाच मुले आणि हीची मुलगी साऱ्यांनाच त्यांचे त्यांचे जोडीदार गवसले. पण हिच्या मुलीने कित्ता मात्र गिरवला आपल्या आईचाच ओटीत परत एकदा आपल्या काकुसारखीच चार मुले घालून तीही देवाघरी चल धरली. एका संकटाची झकपक करून जरा सुस्कारा सोडवा तर दुसरे संकट उभे! तिच्या जावयाने म्हणजे हिच्या आजोबांनी सन्यासच घेतला जणू. मग सगळ्या आत्या पुढे झाल्या मुलांच्या संगोपनासाठी आणि एकेक आत्याने एकेक मुल वाटून घेतले. त्यांचीही लग्नेबिग्ने झाली साऱ्यांचे संसार बहरले. ‘नोनू’ला आता नातवंडे झाली. ‘नोनू’चे हात कधी स्वयंपाकघरातून बाहेर आले नाहीत आणि मांडी तान्हुल्याला झोपवण्यासाठी हलली नाही असे कधी झाले नाही. ही तिच्या नोनूच्याच सहवासात वाढली. तिच्यासाठी तीच तिची आजी होती. तिचे पणजीपण नावाला होते तिच्यासाठी. आणि आजी, पणजी या नात्यांचे खोलवर जाऊन अर्थ शोधण्याचे तिचे वयही नव्हतेच ना ! नोनू कडून घास भरवताना, तिच्या कडून डोक्यावर तेल थापून घेताना, तिच्याकडून न्हायला घालून घेताना तिला तिच्या हातातली, स्पर्शातली माया, ओढ जाणवल्याशिवाय राहत नसे. पण मैत्रिणींचे प्रश्न नंतर मनात घुसू लागले. “ ए! ही तुझी पणजी ना गं? आजी नाही ना गं?” ती हिरमुसली होऊन म्हणे, “नाही माझी आजी नाही ती! पण ती माझी ‘पणजी आजी’ आहे.” पण ही पळवाट होती उत्तर शोधण्यासाठी. ‘पणजी आजी’ म्हणूनही आजीची ओढ, तिला जाणून घेण्याची, पाहण्याची जिज्ञासा कणभरही कमी होत नव्हती. तिला हळूहळू आजी, पणजी या नात्या विषयी जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली. एकदा तिचे केस विंचरताना तिने विचारले ‘नोनू’ला. “नोनू, तू माझी पणजी ना? मग माझी आजी म्हणजे?” नोनू हसली म्हणाली, “अगं ! ती तुझ्या आईची आई ! आईची आई म्हणजे आजी तिची आई म्हणजे मी ! मी तुझी पणजी !” चला एकतरी कोडं सुटलं म्हणायचं मग माझा प्रतिप्रश्न, “मग माझी आजी?” तिचे डोळे पाणावले, “छान होती गं ती ! खूप लाडकी होती माझी. दिसायला छान, बोलायला मधाळ, कामसू, प्रेमळ. सगळ्यांना आवडायची” माझा प्रश्न “म्हणून नेलं तिला देवाने? जो सगळ्यांना आवडतो त्यालाच देव नेतो ना? पणजी ! पणजी ! तू पण खूप चांगल वागू नको हं !” आजीला नेलं तसं आपल्या पणजीलाही देव घेऊन टर जाणार नाही ना ! या कल्पनेनीच तिचं मन कावरं बावरं झालं होतं. तिचे हे अचानक आलेले भाबडे बोल ऐकून ‘नोनू’ हसली. तिच्या डोळ्यातून कधी नव्हत ते पाणी दिसलं हिला. त्या तिच्या डोळ्यातल्या तुंबलेल्या सरोवरात ती आपल्या आजीची छबी शोधायला लागली.

मग ती आपल्या आजीचा फोटो कुठे आहे का म्हणून शोध घेऊ लागली. सगळीकडे तिला तिच्या आजोबांचेच फोटो सापडत होते. तिला क्षणभर रागच आला आपल्या घराचा. आजी कुठेच सापडत नव्हती तिला मग याला आजी बद्दल विचार, त्याला आजी बद्दल विचार अशी शोधयात्रा सुरु झाली तिची. तिच्या नशिबाने तिला तिच्या दोन्ही आज्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. फक्त त्यांचे दिसणे वागणे या विषयी कानावर काही गोष्टी येत होत्या. आजीचा रंग गोरा होता, केस मोठे होते, चणीने लहान, नाजूक, गौरवर्णाची आजी, ती तिच्या मनात एक चित्र रेखाटत होती तिच्या नं पाहिलेल्या आजीचं! प्रत्येकाला आपलं मूळ जाणून घ्यायची जबरदस्त इच्छा असते ती अशी.

पण सगळे प्रश्न मनातल्या मनातच सफळ होत होते. आजीचं प्रत्यक्ष दर्शन टर सोडाच पण फोटोतलं दर्शनही नव्हतं होत तिला. तिला वाटायचं देवाने सारी सुखं दिली आयुष्यात पण हे साधं सुख दिलं नाही. दुधाची तहान ताकावर भागवता येत नाही म्हणतात ना? तसंच तिची आजीच्या दर्शनाची, निदान फोटोत तरी तिची छबी दिसण्याची तिची तहान दिवसेंदिवस वाढतच गेली. काय म्हणावं या घराला? या घरानं सध्या माझ्या आजीचा एकही फोटो जपून ठेवू नये? मला माझी आजी फोटोतही दिसू नये? उत्तर मिळायचं नोनू कडूनच “आग ! कुठे होतं तेव्हा हे सगळयाचं भान? आत्ता बरीक तुमचं हे फोटोचं प्रस्थ फारच वाढलंय हो! तेव्हा नव्हतं गं काही असं. जगण्यातलेच प्रश्न गिळंकृत करायला उठले होते आम्हाला. मिरवायचं मनातही यायचं नाही आमच्या! इतकी आणि अशी हौसमौज? नावच काढू नकोस. अगं ! तुझ्या आजीचा सोडा तिच्या वडिलांचा तरी फोटो कुठे आहे माझ्याजवळ?” पटत होतं तिचं म्हणणं पण वळत नव्हतं मनाला. आजीला निदान फोटोत तरी बघायची ओढ विझलेल्या निखाऱ्यासारखी मनात जपतच ती ही मोठी झाली.

आता बघता बघता सत्तरी गाठली होती तिने. बहुतेक या जन्मात आपली आजीची गाठ नं पडताच आपणही चल धरणार या जगातून अशी पक्की खुणगाठ मनाशी बांधूनच टाकली तिनं. अशीच एका प्रसंगाच्या निमित्ताने ती आपल्या आईच्या चुलत भावाकडे गेली. तो ही आता ऐशी वर्षांचा झाला होता. थकला होता. त्याची बायको तिला त्यांच्या घरातून कधीच मोकळ्या हातांनी जाऊ देत नसे त्यांचा निरोप घ्यायला ती उठली. आणि मामी उठली तिला हळदी कुंकू लावलंन आणि तिच्या हातावर एक अगदी जुना फोटो ठेवलान तिने! म्हणाली, “चाललीस? ये! अगं! खूप अनमोल गोष्ट तुला आज भेट म्हणून देणार आहे मी! हा बघ तुझ्या आजीचा फोटो. जुना आहे. पण हल्ली काय साफ करून मिळतो ना म्हणे बाजारातून! घे! खास तुझ्यासाठी!”

तिने तो फोटो श्रद्धेने हातात घेतला,“अगं बाई! आजी! शेवटी एकदा भेटलीस बघ गं मला! किती आसुसले होते गं तुला भेटायला! तिचे डोळे पाणावले डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा पुसत पुसत ती फोटोवरून मायेने हात फिरवत राहिली. हात फिरवतच राहिली.

________________________________

फोटोवरची धूळ बाजूला होत होती. आजीचं सोज्वळ, नाजूक देखणं रूप दिसू लागलं होतं. हिच्या मनात आलं, ‘आजी ! तू ती... मीच ग ! मीच की गं !’


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>