ही कथा तर लेखन कार्यशाळेत घडली होती...रश्मी...तुला आठवते न?
श्रध्दा - रश्मी नगरकर
तिने चहाच आधण ठेवलं..उकळणाऱ्या गवती चहाचा घमघमाट आणि तिने नुकत्याच आरतीला लावलेल्या मोगऱ्याच्या सुंगधी धूपाच्या वासाने आख्खं घर संमोहीत झाल होतं.
आज नवरात्रीची चौथी माळ. नवऱ्याने चहाचा घोट घेता-घेता विचारलं, "देवीला जाऊया?" ती हसून म्हणाली, "मंदिरातच कशांला जायला हवं रे? देवी तर चराचरात आहे. आपल्या घरात पण आहे. आताच तर मी पूजा केली ना"
"अग त्यातही वेगळच समाधान असत."
"कसलं रे समाधान? चार-चार तास रांगेत उभं राहायच काहीतरी मागणं, गाऱ्हाण सांगायसाठी जे तिला आधीच माहीत असतं."
"इतकी वैतागतेस तर मग तू कशाला नऊ दिवस उपास-तापास करतेस ग?"
"माझी श्रध्दा आहे म्हणून करते मी उपवास, काही मागणं नाही मागत हं.. तिने लढण्याच बळ द्यावं इतकचं असत. कारण ती शक्तीचं रूप आहे.. आदिशक्ति.."
असा बराचं वेळ संवाद चालल्यानंतर ती नवऱ्याच्या इच्छेसाठी आवरून तयार झाली..उन्हं तापली होती. पोहोचता-पोहोचता दुपारचे १२ वाजत आले होते..देवीच्या मंदिराबाहेर भली मोठी भक्तांची रांग लागली होती. ते दोघेंही उभे राहीले. बराचं वेळ झाला तरी रांग काही पुढे सरकली नव्हती..ती थोडी वैतागली होती..तहानेने घसा कोरडा झाला होता. तिने त्याला सांगितल तर तो म्हणे, "आता कुठे गं मिळेल पाणी.. थांब थोडावेळ.." ती अजूनचं वैतागली..
इतक्याचं एका छोट्या मुलाचे शब्द तिच्या कानावर पडले,"बाबा, चला ना बंदूक घेउन द्या"
४-५ वर्षाचा मुलगा.डेनिम जीन्स..त्यावर लाल निळ्या रंगाचा शर्ट, कुरळे केस आणि घारे डोळे, घामाने डबडबला होता...त्याचे वडील त्याला म्हणे,"अरे, आपण देवीच्या दर्शनासाठी आलोय ना आता कुठे तुझी बंदूक मध्येच..देवीच दर्शन महत्वाच आहे..तुला काही कळत की नाही? गप्प बस जरा" त्यावर त्या मुलाने प्रश्न केला, " देवी देईल का बाबा बंदूक मी डोकं टेकल्यावर?" तिने त्याच्याकडे पाहीलं. तिच्या नवऱ्याकडे पाहीलं आणि मनातचं बोलली, "बाळा, तुला जे कळतं ते इथे कोणालाच नाही कळलं रे आजवर"