पद्मालय आणखी एक चित्तथरारक भाग....
पद्मालय – आसावरी देशपांडे
भाग ४
काल रात्री मनवाने आवेगाच्या भरात 'तोच' शब्द उच्चारला, त्या क्षणापासून मिहीर अस्वस्थच होता, फिकट रंग मनवाच्या खास आवडते, गुलाबी, पिस्ता, अबोली, आकाशी पण काल रात्री भळभळीत लाल रंगाची साडी, बटबटीत मेकअप, पाहिल्यावरच मिहीरला चुकल्या सारखे वाटत होते, मनवाच्या या रूपाचे फारच आश्चर्य वाटले. आज लाल डायरीने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले, जे क्षण केवळ त्या दोघांचे होते, त्यावर आज एका तिसऱ्याच व्यक्तीचे आक्रमण झाले. काहीतरी अनर्थ होणार की काय या भीतीने मिहीर विचारात गढला. पण अस्वस्थता अधिकच वाढली, मनावरचे दडपण मनवा जवळ बोलू शकत नव्हता. विचित्र कोंडीत तो अडकला. त्या बिचारीला तर त्यांच्यात काही वावगं घडले याची पण कल्पना नव्हती.
डायरी मधला पहिल्या पानावरचा मजकूर ....
प्रिय कबीर
यास,
प्रेमळ भेट...
"तुझा मृत्यू मला तुझ्यापासून वेगळे नाही करू शकत, कारण तुझा आत्मा सदैव माझ्या सोबतच आहे, प्रत्येक डायरी गणिक एक नविन शरीर तुला मिळेल...
कधीही न संपणारी प्रेमकथा....(२२ जून १९७० पासून ....
अनेकदा नव्याने जन्म घेणारी तुझीच फक्त तुझीच नैना....
डायरीचे दुसरे पान....
"खूप वाट पाहायला लावलीस. आतापर्यंत दोन जोडपी येऊन गेली..सगळं कसं मी आखल्याप्रमाणेच पार पडलं...तुम्ही तिसरं जोडपं आहात दहा वर्षांनी इथे आलात.... अनेक रहस्य 'पद्मालयात' दडलेली आहेत,प्रत्येक रहस्यागणिक तुला किंमत मोजावी लागेल, खेळ तर सुरु झाला आहे पाहू आता 'तू स्वतःला हरवून जिंकणार,कि स्वतःला टिकवून हरणार,की तू देखील सर्वस्व हरवून, मोक्षासाठी वाट बघणार एका नव्या जोडप्याची...
मला वाटलंच तू आपणहून इथपर्यंत येशील, फार गोंधळ झाला असेल तुझ्या मनाचा...पण आता यापुढे जे जे होईल ते फक्त माझ्या मर्जीने, तुम्ही दोघे जण माझ्यासाठी कळसूत्री बाहुल्या आहात...आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाकडून मी माझ्या इच्छा पूर्ण करून घेते....आता यातून सुटका होणे नाही..... इथल्या प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व आहे."
मिहीर मनाशीच पुटपुटला 'कबीर'...हाच तो शब्द मनवाच्या तोंडून निघालेला ...म्हणजे देह मनवाचा आणि आत्मा 'नैना' चा....खरच असं घडू शकत का? कालचे मनवाचे वागणे अनैसर्गिकच होते. क्षणिक सुखासाठी नैनाने मनवाचा ताबा घेतला असावा, "अरे ,काय फालतुगिरी आहे ही" मिहीर चे एक मन यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण प्रत्येक उदाहरणाला, चमत्काराला विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेणारा मिहीर भूताखेतांवर विश्वास ठेवणे दूरच.... पण त्याचे दूसरे मन भीतीने करपून गेले... खोलीत त्याला कोणाचीतरी हालचाल जाणवत होती, काल रात्रीही ही जाणीव झाली .. यापुढे वर जायचेच नाही असा मनोमन निर्णय मिहीरने घेतला..
त्यादिवशी डॉक्टरांनी केलेला उपदेश मिहीर विसरला नव्हता. त्यांचे बोल त्याच्या कानात घुमू लागले,"मिस्टर मिहीर तुमच्या मिसेस ना या घराची 'ओढ' वाटण्या आधी या घरापासून दूर जा नाहीतर अनर्थ ओढवेल..."
सकाळी सकाळी मनवा गुणगुणत झाडांना पाणी टाकत होती, मिहीर बाहेर आलेला दिसताच लगबगीने त्याच्या जवळ गेली,
"मिहीर, इथून थोड्या अंतरावर एक तळं आहे, शारदा सांगत होती,खूप कमळं फुलली आहेत,जाऊ या का?"
(खूप विचार करून मिहीर म्हणाला)
" मनवा,ठीक आहे जाऊ या,पण एका अटीवर, त्या जिन्यावरच्या खोलीत जाण्याचा हट्ट तू सोडायचा,"
“बरं, सोडला हट्ट, झालं समाधान...” मनवा
'पदमालय' ची भव्यता प्रवेशद्वारावरुन झळकायची, चुम्बका सारखे ओढले गेले मी या घराकड़े. आज आठवडा झाला पण बंगल्यातील कितीतरी कोपरे माझ्यासाठी अज्ञातच आहेत. मागच्या बाजूला असलेले चिंचेचे झाड मुकाट उभे होते, त्याच्या बुंध्याशी पाण्याची तीन वेटोळी दिसली, नुकतेच शारदा ने पाणी टाकले असावे, असे वाटले,
"शारदा तू अशी झाडाला पाणी टाकताना खेळत बसलीस तर कामं कशी आवरतील तुझी?"
"न्हाय जी म्या न्हाय पानी घातलं, आन त्यात ह्यो चिचचं झाड, लय वंगाळ, तुमी सायबासनी सांगून त्यवढं उपटून टाका बरं!"
"शारदा काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस, अगं आज साहेब लवकर उठलेत, त्यांनीच टाकलं असेल पाणी,"
"काय बी म्हना तुमी मनवा ताय, आमी अडानी मानसं, तुम्हास्नी नाय कळायचं, या झाडावर भुतं रायतात."
शारदाला 'भूत' या विषयाबद्दल अगाध ज्ञान होतं, मधून मधून ती भुताच्या गोष्टी सांगायची, तिचा भाबडा विश्वास, देवावरची श्रद्धा, वागण्यातला खरेपणा खूप आवडायचा मला.
अचानक नजर अडगळीतल्या कोपऱ्याकडे गेली. कमळाच्या आकाराचे तुळशी वृंदावन एका बाजूला दिसले, तुळशीवृंदावन पाहताच मन भूतकाळाकडे धावू लागले, 'आई' ईश्वराची परमभक्त, अपार श्रद्धा असणारी त्याउलट वडील नास्तिक, देवघर आणि कमळाच्या आकाराचे तुळशीवृंदावन ही दोन्ही ठिकाणे आईसाठी 'काशी आणि प्रयाग'हून कमी नव्हती. कित्येकदा वृंदावनासमोर मी तिचे भरलेले डोळे पाहिलेत, त्या वयात याचा अर्थ कळायचा नाही, पण हळूहळू वाढत्या वयानुसार तिच्या पाणावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळू लागला, तिची भक्ती तिला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवायची, संकटाची भीती, खचणं, शोक, त्रागा या गोष्टी मी कधीच तिच्या ठायी पाहिल्या नाही. तिची श्रद्धा तिला खूप कणखर पणा द्यायची.
"इतक्या पवित्र वृंदावनाची जागा खरं तर घराच्या दर्शनी भागातच आहे" हा विचार मनाला शिवला.
शारदाच्या मदतीने ते वृंदावन घरासमोर अंगणात ठेवले, तुळशीचं नवीन छोटसं रोपटं त्यात लावलं, पाणी घातलं, दिवा लावला, नकळत हात जोडले गेले...
" शुभंकरोती कल्याणम,आरोग्यम धनसंपदा
शत्रूबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमोस्तुते"
आता या वृंदावनाजवळ आईचं 'अस्तित्व' जाणवू लागलं, मनाला खूप शांतता मिळाली,मनावरचं दडपण दूर झाल्यासारखे वाटत होतं,. या बंगल्याकडे खेचून आणणारा, जोडून ठेवणारा हाच दुवा असेल का?
उंबरठा ओलांडून घरात शिरताच सारे काही बदलले होते, खिडक्यांच्या काचा एकमेकांवर आदळत होत्या, वाऱ्याचे भेसूर रूप पाहून छातीतली धडधड अजूनच वाढली. सारं घर वाऱ्याने झोडपून निघालं होतं, घरात कोंदट आणि कुबट वासाने श्वास घेणे असह्य झाले, आता त्या वासाने रौद्र रूप धारण केले, नेमके लाईट पण गेले, दुष्काळात तेरावा महिना, मिट्ट काळोखात मी चाचपडत होते, शारदाला आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नाही आला, शेवटी न राहून मोबाईलच्या मिणमिणत्या उजेडात मी किचनच्या दिशेने जाऊ लागले... पाच पावलांवर असणारे किचन पाच...दहा....पंधरा... वीस...पन्नास .. पावले झाली तरीही काही येईना.. घामाच्या धारा वाहू लागल्या, कुबट वासाने डोळे चुरचुरले, मी थकून जमिनीवर अंग झोकून दिले, डोळे उघडून समोर पहाते तर काय चक्राकार जिना उजळून निघाला आणि बेडरूमच्या दाराची जोरजोरात उघडझाप सुरु होती, इतक्या भयाण शांततेत दाराच्या फाट फाट आवाजाने पोटात खोल खड्डा पडत असल्यासारखे जाणवले, ज्या दाराला मिहीरने कुलूप लावले तेच ते दार ....
तिचे काळीज धडधडायला लागलं, तिच्या श्वासाच्या आवाजाने देखील तिला भीती वाटू लागली.
सर्रकन वेगाने पायाला मुंग्या आल्या, अगतिकतेने ती जमिनीवरच आपला आधार शोधू लागली, त्यादिवशी जिन्यावर ती अशाच अनुभवाने पछाडली होती, आज त्याचीच पुनरावृत्ती अधिक ताकदीने झाली. पण फरक फक्त इतकाच होता आता तिला या वरच्या बेडरूमची ओढ वाटू लागली.. तिला कोणीतरी हाक मारत होतं "मनवा,अगं मनवा ये वर" आजपर्यंत इतका मंजूळ आवाज आणि आवाजातली मार्दवता तीने कधीच अनुभवली नव्हती. ती आवाजाच्या दिशेने पाहू लागली......आता दार शांत झालं..
कदाचित वादळापूर्वीची ती शांतता असेल का?