सुंदर कथा -- जरूर वाचाच....शाब्बास सोनाली!
तिफन चालते – सोनाली ताम्हाणे
सुजाताचा नवरा गेला. अचानक. तिचा विश्वासच बसेना. सत्य समजते लवकर. स्वीकारायला वेळ लागतो. भेलाकांडलीच ती. कच्ची बच्ची भेदरली. काय झालं ते समजायचं वयच नव्हत. काहीतरी भयंकर, खुप वाईट घडलेय एवढच कळलं होतं. म्हातारे सासू सासरे मटकन खालीच बसले. त्यांचा श्रावण बाळ गेला.
निरोप गेले. नात्याचे आले. गणगोताचे आले. कोणी दु:खाचे. कोणी रीतीचे. सारेच आले. पिंडाला कावळा शिवण्या पूर्वीच टोचू लागले. आयाबायांची कुजबुज सुरु झाली.
“कशाने गेला म्हणे?”
“हार्ट फेल झाला म्हणे”
“वयच तरी काय...कशाने झाला असेल हो हार्ट फेल?”
“पैशाच्या मागे अती धावलं, की असंच होतं.”
“बायकांनाच हाव असते हो.”
“तिला पण तर आहे ना नोकरी.”
“पैसा कितीही असला तरी पुरला पाहिजे ना.”
“आपण निभावले हो आहे त्याच्यात ...पण आताची पिढी..”
कोणीतरी खाकरले तसं चिडीचूप झाले सगळे. उरकायच्या तयारीला लागले. सारं काही संपल्यावर आपापल्या वाटेने आले तसे गेले. थांबून कोणाचा काही उपयोगही नव्हता. जाणारा भूतकाळात जमा झाला. भविष्याशी दोन हात करणे भाग होते, आणि वर्तमान काळ दोन चिमण्या जीवांच्या रुपात समोर उभा होता. एकदा हिला वाटलं आपणही जावं. पण मरावेसे वाटले तरी जगायचं कारण पुढ्यात होते.
वडील म्हणजे आभाळ असते मुलांसाठी. सारे काही व्यापूनही उरणारे. आता तेच आभाळात गेले होते....कायमचे. सुजाताला त्यांचे आईपण निभावातांनाच वडीलही व्हावे लागणार होते. सासू सासऱ्यांचा एकुलता एक आधार गेला. त्यांचा मुलगाही व्हायचे होते. कळत होतं सगळं. पण वळून घ्यायला हिम्मत लागणार होती. ती कुठून आणायची? सारेच कोलमडले होते. कोणी कोणाला सावरायचे?
अगदी उद्याचीच चिंता होती अशातला भाग नव्हता. दोघांनी मिळून जमवले होते बरचसे. घागर ओसंडून वाहत होती, असे नाही, पण काठ रिता राहत नव्हता. शिवाय अडल्या नडलेल्याना पटकन ओंजळ भरून देण्याची वृत्ती. अगदी काल परवाच तो म्हणाला सुद्धा,
“सुजाता, या सुट्टीत आई बाबा आणि मुलांना घेऊन गावी जाऊ ग. बरीच वर्षे झालीत गावाकडचे घर बघून.”
“चल, नुसतं हे कारण नाहीये...काहीतरी शिजतेय तुझ्या डोक्यात”
तो हसला.
“कसे मनातले ओळखतेस ग तू! गावाकडे जी शाळा आहे ना, तिथे आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले शिकताहेत. यावेळी गेलो, की देणगी देऊ या.”
ती अचानक भानावर आली. काहीसा विचार करून उठली. सासू सासऱ्यांच्या जवळ गेली. काही बोलणे झाले. ती गंभीर पण खंबीर.
“हो बाळा, तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे.”
दोघेही एकमुखाने बोलले. तेरवीचा खर्च न करता त्यात थोडी भर घालून शाळेला पैसे दान करायचे असे सर्वानुमते ठरले. ठरल्या दिवशी गावी आले. दोन दिवस राहिले. दिवस सरतात तसा दु:खाचा आवेग कमी होतो. पण दु:ख कमी होत नाही. सारे सोपस्कार डोळ्यातले पाणी पुसतच पार पाडले तिने. जायचा दिवस उजाडला. सगळेजण निघाले. तिच्या डोळ्यासमोर जे गाव होतं ते चित्र आता पार बदललं होतं. छान रंगरंगोटी केलेली घरे आता नव्हती. त्यांची अवस्था बकाल झाली होती.
तिला वाटलं तिच्या सारखीच अवस्था आहे गावाची. डोळ्यासमोर कधीतरी पाहिलेली हिरवी लसलसती शेतं उभी राहिली. सवाष्णीच्या चुड्यासारखी. काळजात चर्र झालं. शेती कसणारा गेला आता स्त्रियां सारखीच जमीनही उजाड.
एवढ्यात ओळीने शेतं दिसू लागली. तिथे काही हालचालही जाणवली. तिने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. उतरली. बघते तर काय. गावातल्या बायकांनी शेतीची कामे स्वत:च करायला घेतली होती. सर्व जणींच्या कपाळाच कुंकू पुसलेले. तिला नवल वाटले.
“काय करणार वाहिनी, थांबून चालत व्हय?”
त्या बायकांची जिद्द बघून ती अंतर्मुख झाली. मनाशी काही एक विचार केला. गाडी घरापाशी थांबली. पण तिची खऱ्या अर्थाने सुरु झाली.