ह्या तालाच्या शोधात आयुष्य जाते...आणि जेंव्हा ताल जुळतो...तेंव्हा...
ताल – डॉ. स्वाती धर्माधिकारी
एकाच वेळी एकाच गतीनी जाणाऱ्या दोन कार्स सिग्नलपाशी थांबल्या, दोन डोळ्यांना पलीकडे काचेतून स्टीअरिन्गवर ताल धरलेला दिसला, नेमका असाच ताल तर धरलाय बाजूच्या कारमध्ये इकडच्या डोळ्यांनी टिपलं,सिग्नल लालचा हिरवा झालेला, दोन्हीही कार्स एकाच गतीनी पुढे समांतर जात राहिल्या, हातांच्या समान ठेक्यासकट; समोरच्या वळणावर एक गाडी वळली.
रोजचं झालंय हे १०.२५च्या आसपास एकाच सिग्नलवर, कधी आगेमागे, कधी आजूबाजूला सोबत असायच्याच या गाड्या एक पांढरी आणि एक हिरवी! कधी आरश्यातून, कधी साईड मिरर मधून, कधी सहज मान वळवली की दिसायची एकमेकांची बोटं स्टीअरिन्गवर एकाच तालावर ठेका धरलेली.
तिच्या हातातल्या नाजूक बांगड्या, अंगठ्यां, नेलपेंटवाली नाजूक बोटं यापेक्षाही लक्षात रहायचा तो नेमका धरलेला ताल...ठेका जुळलेला. इकडे ही आश्चर्यच वाटायचं, कफलिंक्स किंवा त्याच्या झोकदार शर्टापेक्षाही लक्ष नेमक्या म्याचिंग ठेक्यावर! ‘एकच गाणं ऐकत असू आपण’ दोघांनाही वाटायचं, कुठे माहित होतं की दोघंही विविधभारतीच ऐकायचे म्हणून! आता सवयीनी दोघंही सिग्नलच्या आसपास आले की दुसरी गाडी शोधायचे, इतकंच नाही तर काचा देखील खाली केल्या जायच्या. आधी चोरटे कटाक्ष असायचे, आता मात्र दिलखुलास स्मित हास्याची देवाण घेवाण होऊ लागलेली.
न जुळलेले ताल -- असंख्य ठिकाणचे त्याला अस्वस्थ करायचे, तरी ही त्या प्रत्येक लयीत स्वतःला ओढून ताणून बसवायचा आटोकाट प्रयत्न असायचा त्याचा.......हा सोबतचा ताल...अनासायास जुळलेला ताल, केवळ काही मिनिटांचा असला तरी ही त्याच्यासाठी खूप महत्वाचा होऊन बसलेला म्हणूनच!
तिच्यासाठी सारंच बेताल होतं एरवी. घरच्यांचं बेताल बेछूट वागणं भोवळ आणायचं तिला, त्या उद्दाम गतीशी, त्या बेभान तालांशी कधी मन जुळलंच नाही तिचं. घरातल्या, ऑफिसमधल्या उसंत न देणाऱ्या धावण्यात, मनाला विरांगुळाच नव्हता, मुळात मनाची आवड जुळलीच नव्हती, तिला विविध भारती तर त्यांना एफ.एम.वरचे पांचट जोक्स आणि नवनवीन गाणी हवी असायची. दुसऱ्या कुणी तिची गाडी चालवली की तिला ऑफिसला जाताना आधी रेडीओ स्टेशन्स बदलावी लागायची कारमधली.
काही वर्षांपूर्वी तिला टी.व्ही. हवा असायचा, मात्र ‘रिमोट युद्ध’ सुरु झाली आणि ती टी.व्ही.ला पार विसरली. असा ताल न जुळूनही चक्क पंधरा वर्ष काढलीच की सोबत, बाजूच्या गाडीतली व्यक्तीपण बहुदा अशाच वयोमानाची असावी.. तिचा अंदाज..त्या दोघांचे ठेके मात्र नेहमीच जुळत राहिले .
एकदा कुणी व्ही.व्ही.आय.पी. येणार होते त्याच रस्त्यानी, खूप पोलिसांचा ताफा, त्या दिवशी तब्बल १५ मिनिटं दोघांच्या गाड्या समांतर जात राहिल्या, मनातली गाणी, ठेके जुळले होतेच...काचेवर चक्क लिपस्टिकनी मोबाईल नंबर लिहावा असं तिला वाटून गेलं. त्यालाही निदान कार्डांची देवाण घेवाण व्हावी असं वाटलं होतंच, मात्र सारं फक्त आखोंआंखोंमेंच राहिलं होतं, दोघांनाही तो ट्राफिक ज्याम संपूच नये असंच वाटलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदा, सिग्नल मिळाल्यावर निघतांना चक्क त्यानी बायची खुण केली, तिने देखील एका हातानी व्हील सांभाळत प्रतिसाद दिलेला.
आताही ड्रायव्हिंग करताना आज सकाळी तिला आलेला मैत्रिणीचा मेसेज आठवत होता, ज्यात ती म्हणत होती,“अगं आजकाल कठीण होत चाललंय ग सगळं, कधी क्वचित विविधभारती वर पंचम, आशा आणि गुलजार यांच्या गप्पा, ‘मेरा कुछ सामान...’ वगैरे हळवं काही लागलेलं असावं, आपण जी जान से ते ऐकत असावं, त्याच वेळी नवऱ्याने धाडकन रेडीओ बंद करत टी.व्ही.वर फुल व्हॉल्यूम करत राम रहीम आणि हनीप्रीतची फडतूस लव्हष्टोरी रंगून ऐकावी, या परीस दुर्दैव कोणतं?” तेंव्हाही तिला वाटलं होतं की मैत्रिणीचाच मेसेज नाहीय तो, जणू काही तिच्या मनातली वाक्यच लिहिलीत सखीने! ते आठवून तिने एक उसासा सोडला, हे असं विसंवादी जगणं, खरं तर पदोपदी मरणं का येतं वाट्याला अपरिहार्यपणे कुणास ठावूक?
एक वळण घेत नेहमीचा सिग्नल आला...सवयीने तिने बाजूला बघीतलं..तर ...त्याचे ही हात “है अपना दिल तो आवरा”....च्या ठेक्यावर थिरकत होते, तिच्या बोटांनी पण तोच तर ठेका धरलेला आहे...तिच्या ओठांवर एक गोड हसू पसरलं ......ती त्याच धुंदीत भवतालचं सारंसारं विसरून घाईत पुढे जायला निघाली, एक कानठळ्या बसणारा आवाज...आणि सारं शांत.....गर्दी वाढत गेली, ट्रक ड्रायव्हरला घेराव वगैरे...तो गाडी साईडला लावून धावतच आला..तिचा हात पाणावलेल्या डोळ्यांनी हाती घेतला....तिच्या नाडीचा ताल थांबलेला....एकच स्पर्श मात्र तोही असा. कोण होती ती? कुठले ऋणानुबंध होते ते?...
आता परत रोज तोच रस्ता, तिच वळणं,१०.२५ ला तोच सिग्नल .........मात्र त्याचा रेडीओ नेहमी करता मूक झालेला !