मंजुषा अनिल...खूप थांबली ह्या कथेसाठी. हे थांबणे किती महत्वाचे असते...हे तिला आता कळलंय!
जुनं मॉडेल – मंजुषा अनिल
तो तिच्यासोबत होता...त्याच्या बाईक वर. खरंतर त्याच्याकडे लक्ष जायचं काही कारण नव्हतंच. पण मंजिरीचं त्याच्याकडे लक्ष गेलं ते त्याच्या जुन्या बाईकमुळे. स्प्लेंडरचं जुनं मॉडेल होतं ते.
गाडी चालवता चालवता एक हसू तिच्या ओठांतून अलगद सुटलं.
अचानक पाऊस आला. झाडाखाली आसरा घ्यावा लागला त्यांना. न राहवून मंजिरीने विचारलंच त्याला.
"इतकं जुनं मॉडेल कसं काय रे?"
"काकांची आहे. आज गरज होती ना.."
"माझ्या बॉयफ्रेंडजवळ पण हेच मॉडेल होतं."
"मग...?"
पाऊस थांबला. गाडी सुरु करत तिने उत्तर दिलं..
"बॉयफ्रेंड नवरा झाला मग माझा."
हसू उमटलंच पुन्हा. पण आता ते अलगद नव्हतं.