सुनीतने खूप बारकावे टिपले आहेत ह्या कथेत....
दुर्गा – सुनीत काकडे
काजळाचा टिपका कपाळाच्या ऊजव्या बाजुला देऊन तिने पावडर मधे बुडवलेलं बोट त्याच्यावर टेकवलं, एक अनामीक समाधान ओठांच्या कडातुन ओसंडलं.... कपाळाच्या दोन्ही बाजुला बोट रुतली आणि कडकड आवाज करत अलाबला दुर पळाली.
हिरव्या रंगाच्या परकरावर चोळी घालुन चार वर्षाची सई नवरात्रीच्या टिपऱ्या खेळायला सात वर्षाच्या भावाचा हात धरून निघाली. वस्ती समोरच्या सोसायटीतुन लाऊड स्पिकरचे सुर कपांऊंडच्या भिंतीला आणि भल्यामोठ्या गेटला ओलांडून वस्तीत शिरत होते, आरश्यांनी सजवलेल्या कपड्यांमधुन कित्येक रंग परावर्तित होत होते. दंगा करत दहाबारा जणांचा घोळका गेट समोर पोहचला. पावडर, लिप्स्टीक, गजरा, खड्यांच्या टिकल्या श्रुंगाराचा जो मिळेल तो ऐवज लेऊन नटलेली ती कोकरं हसत खिदळत आपल्या गोष्टी सवंगड्यांना दाखवत होती.
हळुहळु ताल धरलेल्या सुरांना पायांनी साथ द्यायला सुरवात केली, कोवळ्या कमरेच्या झटक्यांवर गजरा डुलायला लागला, फेर धरला गेला.
अचानक कोणीतरी किंचाळलं, डाव मोडला, सईच्या पायात काहीतरी खुडलं होतं.
बंद गेट समोर, अंधारात टिपऱ्या खेळायला आलेली ती पोरं स्वत:च्याच सावल्या तुडवत वस्तीच्या वाटेला लागली, दुर्गा बहुतेक झोपड्यात रहात नाही, नाहीतरी गरीबीचा महिशासुर इतका बोकाळला नसतां.....