एका वाद्यात जेंव्हा आयुष्य समर्पित असते तेंव्हा शोकांतिका अटळ असते...पण तो कलाकार असतो...न?
संबळ – गायत्री मुळे
रंगराव अनमनाने घराभायर निंगाला. त्याले लै वाईट वाटून र्हायल व्हत. पन घरात राहूनश्यान टकूर फिरवून घेन्यापरीस पारावर जाऊन बसाव असा इचार करत त्यान पायामंदी चपला घातल्या. त्याले ठाव न्होत की कुट जायाच. पारावर दोन चार म्हतारे कोतारे व्हते.
तमाकू चोयत साऱ्या गावाचा कारभार करून र्हायले व्हते. कोनाची सून कोनासंग कशी वागते, पाटलाचा इजू शेरात कोन्या नटमोगरी संग घुमत र्हायते. मागच्या आयीतल्या वच्छीले झपाटल हाये. निसता टाईमपास करत बसले व्हते. घरात जेवना बिगर जागा मियत नव्हती मंग ते आपापल दुक लपवून गावभराले शायनपाना शिकवत बसून र्हाये
रंगरावच मन तिथ बी लागना.
"काहून बाप्पा रंग्या? काहून इतक त्वांड उतरवून बसून र्हायला?"
"काई न्हाय बावाजी. जीव लै कातावून गेला माहा. पोट्ट म्हंते का काय उपेग न्हाय तुहा. आन पोट्टी म्हंते का शेरात चला तिथ काम धंदा मिलन. मले जाऊशी न्हाय वाटून र्हायल. पन म्हातारीले बी वाट्टे का मी काय कामधंदा गिंदा कराव. रोज भाकर खायच्या टायमाले कावकाव लाऊन देतेत दोघ माय आन पोट्ट मियून. मले लै वैताग आला."
"पन काम धंदा गिंदा त कराच लागन बापा. घरात र्हाऊश्यान कस निभन?"
"पन बावाजी मले जो धंदा जमते तो मी करूनच र्हायलो न? पोट्टी म्हन्ते का आता ते आऊट्डेटेड का काय झाल तेचा जमाना न्हाय र्हायला."
"हॉव त तुच इचार कर न. वर्सातून फकस्त धा दिस तू शेरात जाशीन. गोंधय घालाले. आनि जे काय किडूकमिडूक येते ते त म्हैनाभर बी पुरत नसन. मंग कायच्या भरोश्यावर तुह्या म्हतारीने ठसन दाखवायची. मंग तिले पोट्ट आन सुन बोलत असन. ते तुह डोस्क खाते."
"हॉव. पन पोट्टी म्हनते का हुनर हाये हातात त शेरात या आन ढोल वाजवाले शिका. जनम भर संबल वाजवली ह्या हातान. नवरात्रीच्या टायमाले धा दिस शेरात जाऊन दिस भर पायपिट करून शिध मिये. कपडा लत्ता मिये. वर्सभर म्हतारील लुगड आनि पोलक्याच्या कापड इकत घेन्याच्या जरूरत न्होती. लगीन गिगीन झाल कोनाकड का गोंधय घालाले जाव लागे. दिवटी पेटवो. हर सालातून कम से कम धा लगीन घरी गोंधय घालाले बोलावे. पन आता काय उरल न्हाय. आन कोनी बोलावत बी न्हाय."
रंगरावन उसासा सोडला.
"तुही पोट्टी शेरात काय काम कर म्हंते तुले?"
"ते म्हंते का लै ढोल ताश्याचा गुरुप मंदे जॉईन करा. कारन का मले नाद लय समजते त लौकर जमन. पन माह्याच्यान गाव सोडून कुट जान व्हत न्हाय. पन म्हतारी आनि पोट्ट्याच्या कटकटी पायी माहा जीव करवादला.
रंगरावले गेले दिस लै आठून र्हायले हुते. तो संबळीवर, गण्या तुनतुन घे. गन्याचा सासरा निसत ताय कुटे पन आवाज लै उच्चा जाये त्याचा. घराघरात जाऊन हे तिघ गोंधय घाले आरत्या म्हने. स्रावनातच रंगरावच्या पडवीवर बैठक जमे. मंग कोन्या गान्याच्या चालीवर कोंत भजन म्हनाचं, कोन्या घरी कोनची आरती, ह्या टायमाले नवीन काय ह्याची चर्चा करत. मंग यक दोन नव्या आरत्या तयार करत. आन सार्या संध्याकाय पासून पिरॅक्टीस करे.
गन्याचा सासरा म्हनाले सुरू करे आन मंग हे दोग त्याले साथ दे. यका वर्सी गन्याच्या सासर्याले लै खोकला झाला व्हता. त रंगराव न त्याले फकस्त टाय कुटाले नेल्त संग. आन सारे भजन आरत्या रंगराव आन गन्या न म्हनले व्हते.
पन गन्याचा सासरा उलथला आन सार इस्कटू इस्कटू जाऊ लागल. गन्या बी शेरात गेला. मांग उरला फकस्त रंगराव. म्हातारीच्या आन पोट्ट्याच्या गोस्टी ऐकत.
संबळ म्हन्जी त्याचा जीव का परान व्हता. आन ते सोडून निरा पैक्यासाठ शेरात जाऊन ढोल बडवन त्याले लै बेकार वाटून र्हायल व्हत.
रंगराव अनमनाने घराला आला.
संबळी वरचा कापड कहाडला. तिच्या काड्याई वरून पिरेमान हात फिरोला. आन ते गयात लटकवून भाईर निंगाला.
त्याच्य बायकोले वाटल रंगराव आनत काई रोजी रोटी साठी. तिन धावत जाऊनश्यान कुकाची डबी आनून संबळीवर वाह्यल. ऱंगराव ले काय वाटल त काय मालूम. त्यान त्या डब्बीत बोट घालून बायकोच्या कपायावर कुकू लावल. आन निंगाला
संबळ वाजवीतच तो घराभाईर पडला.. वाजवीत वाजवीत गावाच्या नदी जवय आला. बोटाले लागलेले कुकू खसखस आपल्या धोतराले पुसून कहाडल आनि येकेक पाय तो आता उतरत व्हता.
नदी उफानत व्हती आनि सार्या आसमंतात संबळीचा आवाज घुमत व्हता.