Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Tolkaathi - Varsha Chobe

$
0
0

वर्षांची कथेवर किती छान पक्कड बसते आहे ह्याचे आणखी एक उदाहरण.....

तोलकाठी - वर्षा विद्याधर चोबे

मुन्नीने चॉकलेटी-पिंक चेक्सचा युनिफॉर्म नव्या को-या नवलाईसह अंगावर चढवला. स्वतःचे नाव असलेला बॅच पिनअप करुन डार्क पिंक टाय गळ्यात अडकवला. नव्या को-या पुस्तकांचा गंध मनात भरुन घेत तिने लगबगीने नव्याच दप्तरात कंपॉस सहीत सारे सामान भरुन पाठीवर अडकवले. चकचकीत ब्लॅक शुज मधे पिंक सॉक्स चढवलेले इवलेसे कोमल पाय घातले. बॉबकटवर हेअर बँड लाऊन मुन्नी शाळेत जायला तयार झाली. आपले प्रतिबिंब बघायला ती उत्सुकतेने तिच्या पिंक सायकलचे हॅन्डल फिरवत आरसा शोधू लागली...

"अरी ओ म्हारानीऽऽ मर गई कै? अभीतक सो रही है उठ! सारा खेल सपनेमेही करेगी कै?"

डोंबा-याने खसकन मुन्नीला हलवले. तिने हडबडून डोळे उघडले वास्तविकतेचा आरसा फुटपाथवर उभा होता.

"इतने देरसे आवाज लगा रहा हुं, जुं तक नही रेंग रही कानमे...उठ, जा नलकेसे पानी ला...."

मुन्नीने लगेच घागर हाती घेतली. भराभर सारे आवरायला घेतले. हळुहळु बाजार गजबजू लागला.

डोंबा-याने शिट्टी वाजवून रामशरणला इशारा केला तसा तो टूणकन उडी मारुन त्याच्या ठिगळलेल्या पायजाम्याचा आधार घेत जागोजागी विरलेल्या सद-याला धरत खांद्यावर जाऊन बसला. रस्त्याच्या बाजुला रंगीत बांबूच्या कैच्या समोरासमोर उभारलेल्या होत्या. डमरु वाजायला सुरुवात झाली. मळकी पोरं, बिल्लू आणि मुन्नी सराईतपणे कोलांट्या घेऊ लागली.

"ओ चचा ओ भाई खेल देखो खेल डुगऽडुगऽडुगऽऽ करामाती खेल रस्सी पें चलेंगी लडकी जान मुठ्ठी में रख के चलेंगी...ओ बहनजी आओ मॅडमजी डुगऽडुगऽडुगऽऽ टिवी पिच्चर बहोत देखे होंगे पर यहाँ सचमुचकी लडकी...डुगऽडुगऽडुगऽऽ पापी पेट का सवाल है बाबूजी..बिन माँ के बच्चे है आप सबकी दुवाओपे जान पर खेलेगे..डुगऽडुगऽडुगऽ..."

बेंबीच्या देठापासून गळ्याच्या शिरा ताणत लागेल त्या आवाजात तो ओरडत होता

"खेल देखो खेल रस्सीपर चलेंगी लडकी डमरू के ताल पे पंछी जैसी लेहराएगी डुगऽडुगऽडुगऽऽ आओ बच्चालोग कभी न देखा ऐसा खेल बजाओ ताली तो होगा मेल...एक सचमुच की लडकी...खेल देखो खेल...सभी बच्चालोग सामने आके बैठ जाओ बजाओ ताली..और..और जोर से.."

काही पोरं दप्तरं सांभाळत खाली बसली काही पोरं मन ओढत असूनही शाळेत पळाली...कसरती करतानाही मुन्नीची आसावलेली नजर पोरांकडे अन् त्यांच्या दप्तरांकडे जात होती.

भर बाजारात रस्त्याच्या कडेला

मातीत एका समोर एक विशिष्ट अंतरावर क्रॉस मधे बांधलेल्या दोन जोडी रंगीत बांबूच्या काठ्यांना उंचावर सरळ रेषेत एक मजबूत दोर बांधून तो पलीकडे जमिनीत मोठ्या लोखंडी खिळ्यानी घट्ट आवळला होता. त्याच्या हातातले डमरू एका विशिष्ट तालात वाजत होते. डोक्यावरचे माकडाचे पिलू मर्कटलीलांनी शाळेत जाणा-या येणा-या पोरांना खेचत होते. काही मुले रेंगाळली होती. तुरळक लोक जमू लागले तसा हळुहळु खेळ सुरु झाला. ढोलकी वाजू लागली. सोबतीला मेणचट ओंगळ शर्टाच्या खालीवर बटन लावलेला, केसांपासून धुळीने माखलेला छोटा बिल्लू जर्मनची चेपलेली जेवणथाळी मोठ्या चमच्याने बडवत नाकातून खाली येणारी शेंबडाची लोळी सारखी वर ओढत साथ देऊ लागला...

त्याने मधोमध फडके अंथरले. लहानखु-या चणीची मुन्नी, रस्त्यावरच्या धुळीच्या पोते-याने मुळ रंग घालवलेली, गोल चेह-याची, अप-या नाकाची बारकी पोर, गाठोड्यातल्या कुटुंबाच्या पोटांसाठी, रंग उडालेल्या मळकट सलवार कुर्त्यातला काटक बांधा सांभाळत फडक्यावर एकापाठोपाठ एक कोलांट उड्या घेत लोकांना आकर्षित करु लागली.

एखाद्या ऑलिंपीक खेळाडूशी स्पर्धा करेल अशा तिच्या कसरती लोकांची मने मोहुन घेत होत्या...थाळी आणि ढोलकी तिच्या सर्वांगाला रिकाम्या पोटांची जाणीव देत आर्ततेनं वाजत होत्या. जमिनीवर तिची पावले सफाईदार चपळाईने पडत होती. वितभर रींगमधून तिचे शरीर बाहेर पडले तेव्हा तिच्या लवचिक शरीरात हाडे नाहीत की काय असा भास क्षणोक्षणी होत होता. अवयवांना हवे तसे नाचवणे तिच्या अंगवळणी पडले होते. प्रत्येक कसरतीला भरपूर टाळ्या आणि थोडी चिल्लर जमत होती. अधेमधे लोकांसमोर थाळी फिरतच होती...खेळाच्या शेवटी तिने दोन्ही पाय गळ्यात घेऊन लोकांना नमस्कार केला. घामाघुम झालेल्या गर्दीला आता पुढच्या खेळाचे वेध लागले...

डोंबा-याने डमरु हाती घेतले.

"अरे ओ रामशरण तेरे उदासी का क्या है कारण?" त्याने दोरीला हिसका देत दात विचकून तोंड वळवले." गुस्सा कायको करता है भाई? तेरी हिरोईनी मिलेगी जरूर मिलेगी, इसी गांव मे मिलेगी" डमरुचा ताल सुरु झाला...

"बच्चालोग बजाओ ताली...हमारा रामशरण मुन्नी की नकल मारता है देखना है?तो जोरसे बजाओ ताली"...

डमरुच्या तालावर रामशरणचे पडणे झडणे गोंधळणे सारेच पोरांना खळखळून हसवत होते...

आता मुन्नी ढोलकी वाजवू लागली. अंथरलेल्या फडक्यावर बिल्लू आणि बापाच्या विशिष्ट प्रकारे कोलांट उड्या आणि कसरती लोकांची मने वेधू लागल्या.

बापाबरोबर रबरासारखा उसळणारा बिल्लू नाकातला शेंबूड अन् घसरणारी चड्डी सावरत लोकांच्या डोळ्यांना घाईस आणीत होता.

पुढच्या खास खेळासाठी मुन्नीने स्वतःला चाचपले बारक्या दोन वेण्या तिने दोरीसारख्या वठलेल्या रिबीनीत गोवून गोलाकारात कानामागे आधीच घट्ट बांधल्या होत्या.डाव्या खांद्यावरुन येणारी चार ठिकाणी खोचे लागलेली दोन चार टिकल्या मिरवणारी जुनेर ओढणी कमरेला चांगली गुंडाळत तिची गाठ आणखी पक्की केली.

मातीला नमस्कार करत ती खेळासाठी तयार झाली...डोंबा-याने ढोलकीचा ताल वाढवला..."चल मुन्नीऽ आजा भगवान का नाम ले...ऐऽऽ शाब्बास..." धुळ माखलेली काळसर भेगाळ पाऊले लिलया सरसर बांबूवर चढली तिथून ती हळूच बांबूच्या दुपेडीवर बसली खाली टेकवलेली रंगीत तोलकाठी तिने हाती घेतली.हळूच दोरीवर काठीने तोल सांभाळत ती उभी झाली...लोकांचे श्वास रोखलेले... ढोलकीचा ताल वाढलेला...भर बाजार रस्त्यावर खेळ चाललेला...लोकांच्या स्तब्धतेचे डोळे मिटायला तयार नाहीत तिच्या चेहऱ्यावर मात्र निर्विकार एकाग्रता...

तिच्या पावलांना त्या दोरीचा प्रत्येक वळ जणु पाठ झालाय...गर्दी जमतेय पोरीसाठी करुणा दाटून येतेय...आता फक्त तिच्या पावलांकडेच सा-यांचे लक्ष...हळुहळु अर्धी दोरी पार...दोरीवरुनच डोंबा-याच्या उद्गगारांनाही ती त्याच निर्विकारतेने साद देते..."पापी पेट का सवाल है मुन्नी" "हौ" "ये खतरनाक खेल तु तेरी जान पे खेल रही है" "हौ" "अरे अरे डोरी हीला रही है" "हौ" "लोगोंका दिल धडका रही है" "हौ" तोलकाठीने तोल सांभाळत मुन्नी दोरावर भराभर झुलत होती...थांबली..पुढे चालून टोकाला आली.पुढचा राउंड तिने दोरीवर रिंगमधे पावलं ठेऊन रिंग पुढे नेत अगदी आरामात पुर्ण केला दोरावर मागेपुढेही ती सहज चालली. त्या दरम्यान बिल्लूने शर्टाला मनसोक्त शेंबूड पुसुन घेतला अन् पाय उंचाऊन एका हाताने जर्मनची थाळी मुन्नीला दिली. तिने ती एका पायाखाली घेतली. डोक्यावर बापाने दिलेली घागर घेऊन तोलकाठी तोलत ती निघाली...तिच्यासह सर्वांनाच दुस-या टोकाचा ध्यास...आता एकच फुट राहिलंय...तेवढ्यात...ती गर्दीपलीकडे बघत विचलीत...काठीचा तोल जातोय..जातोय... तिचाही...डोंबा-याने वरचेवर मुन्नीला झेलून लगेच रबरी बाहुलीसारखी मातीत उभी केली...गर्दीचे काळीज हलले...क्षणभर डोळ्यांची उघडझाप...गर्दीला ती पायांवर उभी राहील्याचे समाधान पण खेळ पुर्ण न झाल्याने त्याला सल्ले द्यायला तयार..."जब पुरी तैय्यारी करो तभी लडकी को रस्सी पे चढाओ"

"भैय्या लडकी हाथसे जाएगी,क्युं करते हो ये खतरनाक खेल"त्याने पसरलेल्या सद-याच्या झोळीत चिल्लर टाकता न टाकता गर्दी पांगली...त्याला सनक आली त्याने चिल्लर तशीच फडक्यात बांधली. काही अंतरावर मागेच फुटपाथवर असलेल्या पालाकडे मुन्नीचा हात धरुन तावातावानेच बडबडत तो निघाला.

"मुन्नीऽऽ फिरसे तुने वहीच तमासा किया,सारी मेहनत मिट्टी में मिला दी कुछ दिनसे मै देख रहा, आजतक तो कभी नई गिरी बिचमेंच क्या होजाता तेरेकू...?"

त्याच्या हातातून हात सोडवून घेत ती फणकारली "मै नई करती खेल..." तिच्या अनपेक्षित वाक्याने तो चमकला मघा दाटून आलेली चिड थोडी नरमली. न सुचून तो हसू लागला

"कै??कै बोली तू?नही करेगी खेल!तो कै करेगी?भूखी मरेगी?पगली,हमारे बापदादाका खेल है ये,कोई ना कर सकै....हुनर है हुनर ! तेरा जनम भी इसीलीए हुआ है याद रख!...ये गांव बडा है पैसा मिलेगा...तु रस्सी पे चढेंगी तोही पेट भरेगा...अच्छेसे समझ ले...चल जितने है उतने चावल बनाके रख...मै कल के लिये जगेह देखता हुं"

"मै नई करती खेल...!" मुन्नी जोरात ओरडली.

"......."

बापाने डोळे वटारले,त्याचा राग मस्तकात गेला.तिच्या केसांना मुठीत पकडून त्याने तिच्या गालावर एक सणसणीत रैपट दिली."फिरसे वहीच..."त्याने हाती सापडलेल्या थाळीने तिला बडवून काढली.तिने ओरडून किंचाळून हातपाय घासत गळा काढला."नखरे करती है साली...." एक शिवी हासडून थाळी तिच्या अंगावर फेकून तो निघून गेला.गालावर हात चोळत,उसासत ती चुलीकडे वळली...बिल्लू आणि रामशरण नुसतेच बघत राहिले.

दुपार कलती झाली.नेहमीप्रमाणे मुन्नीचे मन ओढू लागले,त्यासोबत तीही धावू लागली.जवळच्याच शाळेजवळ जाऊन उभी राहिली.तिथे शिकवणा-या शिक्षकांचे,पुस्तकांच्या फडफडणा-या पानांचे,शिस्तीत बसलेल्या विद्यार्थ्यांचे आवाज तिला भिडू लागले.वर्गाच्या खिडकीतून दिसणा-या रोजच्याच दृष्यात काहीतरी बदल असायचा कधी सर कधी मॅडम,कधी कविता कधी धडा,कधी शांतपणे पोरं लिहिताना तर कधी धिंगामस्ती करताना...मुन्नी तिच्या मनाला मागच्या धुळभरल्या बेंचवर ठेवून यात सामिल व्हायची...

शाळा संपल्याची घंटा वाजली तशी ती धावतच निघाली.

खेळाच्या जागेपलीकडे असलेल्या बंगल्याला दुरुनच कुतुहलाने न्याहाळणे तिला आवडू लागले होते.बंगल्यात तुरळक येणारे जाणारे,लोखंडी गेटचा उघड बंद आवाज...मुन्नीची नजर ताटकळली. इतक्यात पोरांचा गिल्ला सामावत शाळेचे चार पाच अॉटो बंगल्यासमोरुन कलकलत निघुन गेले.अनिमिष नजरेने ती कलकल तिच्या मनात उतरली.तिने अॉटोमधे स्वतःला शोधले पण....!खिन्नतेने गालावर ओघळलेली आसवे तिने ओढणीने पुसली.जरावेळाने अॉटो मागोमागच एक लाँग व्हाईट कार हळुच बंगल्यामधे जाऊन थांबली.

त्यामागोमाग तिची सायकल.किंचीत मळलेला पिंक चेक्सचा युनिफॉर्म,

ब्लॅक शुज,दप्तर,वॉटरबॅग असा जामानिमा सावरत तीच गोरीपान मुलगी सायकलवरुन उतरली.ड्रायव्हर अंकलला हसतच टाटा करत बंगल्यात शिरली.रोजचेच ते दृश्य मुन्नीने अधाशीपणे साठवून घेतले.काही दिवसांपूर्वीचे

तिला आठवले, 'उस दिन वो डराईवर अंकलके साथ साईकील सिखते-सिखते मेरे सामनेच गिर पडी थी,तब वो देखी मैको..चिल्लाई,मै झट से भग गई...'

आताही कुणाची हाक येण्याआधी मुन्नी तिथून पळाली...सांजेला त्याच जर्मनच्या थाळीत रांधलेला भात मिर्च्या अन् मीठ घेऊन त्यांनी पोटभरी केली. नेहमी प्रमाणे डमरुने ताल धरला गर्दीची उत्सुकता ताणली कुतुहल जमू लागले. धडधडणारे रोखणारे श्वास थ्रीलच्या आनंदासाठी गोळा झाले... पहिल्या मैदानी कसरती आटोपून सरावाने मुन्नी दोरीवर तोलकाठी तोलत चालू लागली...ढोलकीने ताल वाढवला..दोरी..पाव..अर्धी..पाऊण..

रोजच्या प्रमाणे रस्त्या पलीकडच्या बंगल्यातून शाळेचा चॉकलेटी-पिंक चेक्सचा युनिफॉर्म घातलेली पाठीवर शाळेची बॅग अडकवलेली गोरीपान लेक आपल्या आईला टाटा करुन त्याच पिंक सायकलवर बसुन शाळेत जायला निघाली...मुन्नीची नजर व्याकुळली...हलली...हलली...

तोलकाठी डगमगली...


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>