आशुतोष बरोब्रार कार्यशाळेत ह्या कथेवर चर्चा झाली आहे...त्यमुळे आता इथे काही लिहित नाही.
*वरळी आगार’ – आशुतोष पुरोहित
तो बसमध्ये चढला. खिडकीतली रिकामी सिट बघून चटकन तिथे जाऊन बसला. बराच वेळ झाला, त्याच्या शेजारी कुणीच बसायला येत नव्हतं. बस मधेमधे स्टॉप्स घेत होती, माणसं चढत होती. पण त्याच्या शेजारी कुणीच येत नव्हतं. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण
"बरंय ना, आयती रिकामी सीट मिळाल्ये, जरा पसरून बसू"
असं म्हणत त्याने डोकं निवांत खिडकीला टेकवलं. डोळे आपोपाप मिटले गेले.
आज ती खूपच अस्वस्थ होती. तिला 28 व्यांदा नकार आला होता. गेले दोन महिने वधुपरीक्षा देत होती ती.
"इतकी टाकाऊ आहे का मी? एकालाही मला निवडावं असं वाटू नये??"
या वाक्यानंतर तिच्या विचार खुंटले आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. भरल्या डोळ्यांनीच तिने येणाऱ्या बस कडे पाहिलं.. 64 नं. वरळी. ती चटकन बस मध्ये चढली. सगळ्या सीट्स फुल्ल होत्या. 4 थ्या सीटवर खिडकीच्या शेजारची जागा रिकामी होती. तिने पटकन बसून घेतलं. बस एक धक्का देऊन सुरू झाली आणि तिच्या डोळ्यांच्या कडांवरचे काही अश्रू गालावर हेंदकाळले. तिने लगबगीने ते पुसले.
"आपल्या दुःखाचं जाहीरप्रदर्शन कशाला?"
"शी: काय धक्का दिलाय बसने"
त्याची समाधी भंग पावली. शेजारी एक मुलगी येऊन बसल्ये हे कळल्यावर तो जरा सावरून बसला आणि पुन्हा खिडकीवर डोकं टेकलं. पण बसवाला एवढे धक्के मारत होता की त्याची निद्रेची आराधना काही सफल होईना. मग सहज इकडे तिकडे बघताना त्याच्या लक्षात आलं.. आपल्या शेजारी बसलेली मुलगी रडत्ये..जेव्हा जेव्हा तो तिच्याकडे बघायचा, ती झटकन मान वळवून उजवीकडे बघायची.
"अं.. काय करावं बरं.. ? विचारुया का तिला? नको नको.. ओळख ना पाळख..तिला वेगळंच वाटायचं काहीतरी.."
"शीट शीट शीट शीट... त्याला कळलंय मी रडत्ये ते..नाही ना यार.. मला नाही सांगायचंय आत्ता कोणाला काहीच. आत्ता मला फक्त मी हवीये.. देवा प्लीज याने मला नको विचारू देत.."
तिची प्रार्थना देवाने ऐकली. प्रवास संपेपर्यंत तो तिला काहीच बोलला नाही. वरळीला बस खाली झाली. आता मात्र त्याला राहवलं नाही. त्याने खाली उतरल्यावर तिला थांबवलं..
"मला माहित नाही तुम्ही का रडताय. आणि मी तुम्हाला सहानुभूती पण देणार नाहीये. पण तुम्हाला मला एकच सांगावसं वाटतंय, आपल्या स्वतःपेक्षा या जगात दुसरं काहीच महत्वाचं नसतं. त्यामुळे स्वतःला सांभाळा. तुम्ही शांत आणि आनंदी असाल, तरच तुम्ही चांगलं काम करू शकाल. चांगलं आयुष्य घालवू शकाल. आणि खरं सांगू का, आपला आनंद खरंतर दुसऱ्या कशावरतीच अवलंबून नसतो.. आपण उगाचच...."
"ओ हॅलो...तुम्ही मला लेक्चर देणार आहात का आता..?? प्लीज नका देऊ..."
हातावर हात आपटून नमस्कार करत ती म्हटली आणि पुढे चालू लागली. त्याला आता अपमानित वाटायला लागलं.. आणि थोडं अपराधी सुद्धा.. तो धावत धावत तिच्या मागे मागे गेला. तिला पुन्हा थांबवलं आणि सॉरी म्हणाला.
त्या दिवशी रात्री त्याला झोपच लागली नाही.
"काय गरज होती अपमान ओढवून घेण्याची..? तेही एका मुलीकडून..?"
तिने चिडून इयरफोन्स बेड वर फेकले आणि होती तशीच आडवी झाली. तिला रडूही फुटेना आता..
"कसं बोललो आपण त्या मुलाला...शीट..चांगल्याच हेतूने आला होता नं आपल्याला समजवायला. आपल्या अशा स्वभावामुळेच नाकारत असतील का मुलं आपल्याला?"
अधिक विचार करण्याचे त्राणही तिच्यात नव्हते. तशाच अवस्थेत तिचा डोळा लागला. सकाळी ती उठली, तरी तो काही तिच्या मनातून जात नव्हता.
"आपण सॉरी म्हटलं पाहिजे त्याला.."
तिला मनापासून वाटलं. पण आता काय उपयोग होता..? कोण कुठला तो! ओळख ना पाळख..पुन्हा कधी दिसेल तरी का? माहिती नाही.. फोन नंबर पण नाही.. जाऊ दे...
सुस्काऱ्या सोबत तो विषयही तिथेच सोडून देऊन, ती झपाट्याने आवरायला लागली. आईने टेबलवर ठेवलेला डबा तिने पर्स मध्ये कोंबला आणि ती स्टेशनच्या दिशेला निघाली..
"भर्गोदेवस्य धीमहि धियो योनः प्रचोदयात। ११व्यादा गायत्री मंत्र म्हणून त्याने शेवटचा तांब्या डोक्यावर घेतला. त्या मंत्राने आणि पवित्र पाण्याने तो जरा शहारला..अंग स्वच्छ पुसून त्याने कपडे घातले. आईने टेबलवर त्याचा डबा ठेवला.
"आई, किती दमतेस गं काम करून करून.." तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत तो म्हणाला..
"माझे म्हातारीचे कष्ट संपावे असं वाटत असेल, तर तुलाच काहीतरी करायला पाहिजे बघ..तुझे एकदा का दोनाचे चार हात झाले, म्हणजे मग मी सुटेन."
तो तिच्याकडे बघून फक्त हसला आणि ब्याग घेऊन बाहेर पडला.. त्याच्या डोक्यातलं विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं..आत कुठेतरी खूप प्रश्न गर्दी करून उभे होते त्याच्या..
'आपण नसतो गेलो त्या मुलीला सांगायला तर काय बिघडलं असतं?'
'इतकं काय सोनं लागून गेलं होतं तिला की आपण काहीतरी सांगायला जावं..'
'शीट.. इथून पुढे कानाला खडा.. कुठल्याही मुलीशी बोलायला जायचं नाही असं.. ह्यांना कधी काय वाटेल !'
एकामागून एक विचारांची आगगाडी नुसती...
"I am sorry.." त्याच्या कानांवर शब्द पडले. त्यानं त्या दिशेला वळून बघितलं. तीच मुलगी होती. पण तिच्या चालण्यामुळे धक्का लागून रस्त्यावरच्या माणसाच्या हातातली फाईल पडली होती, त्याला ती म्हणत होती. ते दोघे (तो माणूस आणि ती) फाईल मधले कागद उचलत होते..
"अहो थांबा काका, मी उचलतो.."त्या माणसाचं वय लक्षात घेऊन तो पुढे सरसावला.. त्याच गडबडीत दोघांची नजरानजर झाली.
"तू.. इथे कसा काय..?" तिच्याच नकळत तोंडून शब्द बाहेर पडले.
"ऑफिसला चाललो होतो..इथूनच बस पकडतो मी..."
"अरे बरं झालं तू भेटलास.. मला तुला सॉरी म्हणायचं होतं..काल मी कसं फटकन बोलून गेले तुला..."
"अगं नाही, इट्स ओके.. म्हणजे माझंच.." इतक्यात त्याचा फोन वाजतो.
" हा बोल आई.. ओके.. मग?...काय? मी ऑफिसला दांडी मारू? नाही नाही आई, ते शक्य नाही..मुळात हे असले दाखवण्याचे वगैरे प्रकार मला आवडत नाहीत, तुला माहित्ये..ए नाही हा आई..मी काही घरी वगैरे येणार नाही परत.. पोहोचलोय मी बस स्टॉपवर.." फोन ठेवतो.
"ह्या आया पण ना कमाल असतात. ती कोणीतरी डोंबिवलीची मुलगी..तिला दाखवायला आणणारेत म्हणे घरी.. आणि हे तिला त्यांनी आत्ता फोन करून विचारलं..म्हणून काय तर म्हणे, तू तुझ्या ऑफिसला दांडी मार..! म्हणजे, काही तर्कच नाही ना!" तो हसायला लागतो..तीही हसते..
"म्हणजे तुझ्याही घरी दाखवायचे कार्यक्रम चाललेत वाटतं" ती
"हो! म्हणजे, तुझ्याही घरी हेच चालूए..? "
"हो..आई फार आग्रह करते रे.. मग जावं लागतं"
"का? तुला नसेल जायचं, तर 'नाही' म्हणून सांगायचं ना..मी तर बाबा असंच करतो. आता कालचंच उदाहरण घे ना..ती कोणीतरी एक मुलगी येणार होती दाखवायला. मी सरळ म्हटलं, 'मी मुलगी बघणार नाही! तुम्ही भेटा!"
"मग??"
"मग काय! बघितलं माझ्या घरच्यांनी मुलीला..पण तिला स्वयंपाक येत नव्हता.. तिथेच आमच्या आईसाहेबांच्या मनातून ती उतरली.."
"बाप रे! इतकं कडक आहे तुझ्या घरी? तुला स्वयंपाक येत असणारीच मुलगी हवीये??"
"कोणाला मला?? छे छे! अजिबात नाही! माझं असं काहीच म्हणणं नाही..घरच्यांचं मत आहे हे..मी तर ह्यात पडतच नाही..कारण माझी मतच पूर्ण वेगळी आहेत. आता 'स्वयंपाक' येत नाही हा काही नाकारायचा मुद्दा असू शकत नाही. हे मलाही पटतंय. दोघांची मनं जुळली पाहिजेत. त्यांनी एकमेकांबरोबर कम्फर्ट फील करायला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे, 'एकमेकांचं' व्हावं असं..हे मी सगळं आईला खूप वेळा सांगून झालं.. तरीही तिचं म्हणणं, 'नाही! ते काहीही असो! पोरगी संसाराला चोख हवीच!"
(हसत हसत) "अरे! मग काय चुकलं त्यांचं..?"
"नाही चुकलं काहीच नाही..पण फक्त याच निकषांवर तुम्ही मुलगी नाकारता, याला काय अर्थ आहे..? "
"मग तू का नाही भेटत तिला एकदा..?" त्यानं सुचवलेल्या निळ्या कानातल्यांकडे निरखून पाहत ती म्हणाली....
"अगं आता कुठे भेटणारे ती मला..? एकदा नकार कळल्यावर त्याच मुलाकडे परत कोणती मुलगी येईल..?"
"तेही आहेच..ए पण हे चूके हा..काल तू मुलगी बघायला हवा होतास तिथे..तुलाही कळलं असतं ना मुलगी कशी आहे ते..तू बघणार नाही आणि वर आईबाबांना नावं ठेवणार याला काय अर्थ आहे..?"
"तेही आहेच...पण तुला खरं सांगू का? मुळात ना मला ही 'दाखवण्याची' वगैरे पद्धतच पटत नाही. म्हणजे मुलगी अशी घरी येणार, मग आपण तिला प्रश्न विचारायचे, तिची परीक्षा घ्यायची..तिच्या हातचे पदार्थ खायचे आणि पुन्हा त्याच्यात चुका काढायच्या..आणि मग आपण पसंत किंवा नापसंत करायची...अरे???? आपण कोण एवढे ग्रेट लागून गेलोय की आपण तिचं परीक्षण करू..? आणि मग मुलीची परीक्षा घ्यायची, तशी मग मुलाची का नाही घ्यायची? त्याला का म्हणून सूट? त्यालाही करा पिंजऱ्यात उभं आणि विचारा प्रश्न..तो बसणार ढुंगण वर करून तिनं केलेले पोहे खात आणि ही बिचारी भेदरलेली..का असं? छे!! होपलेसपणा आहे..आणि मुळात, असं दोन मिनिटाच्या दाखवण्याच्या कार्यक्रमात माणूस कळतो थोडीच! काहीतरी उगाच आपलं..."
"खूपच डयाशिंग विचार आहेत तुझे..पण हे आपल्या घरी नाही पटणार.. (हसते) बाय द वे, तू राहतोस कुठे म्हणालास..?"
"नाना चौकात..मकरंद बिल्डिंग."
तिने घड्याळात पाहिलं..8:56 !
"शीट..नेहमीची 8:30 ची गाडी गेली माझी... आता 9 वाजताची स्लो गाडी मिळणार... मला पळायला हवं."
ती भरभर जाऊ लागते. इतक्यात मागे वळून परत त्याच्याकडे येते.
"ऐक ना, तुझ्या घरच्यांना फक्त सांग..काल तुम्ही ज्या मुलीला नकार दिलात, तिला आज मी भेटलो म्हणून.. हा? चल बाय.. आधीच खूप उशीर झालाय, निघते मी, बाय.." त्या घाईतही एक फुलपाखरू अलगद ती त्याच्या खांद्यावर सोडून गेली..
"आणि ऐक.." तिनं लांबूनच पुन्हा त्याला हाक मारली..
"तुला मला काही सांगायचं असेल तर आईबाबांकडे निरोप ठेव. मी फोन करीन तुला..चल बाय!!!" लांबूनच हात उंचावत तिने टाटा केला आणि झपाट्याने स्टेशन मध्ये शिरली. गर्दीचा एक भाग बनली.
तो थक्क..समोरून त्याची नेहमीची बस दिमाखात येत होती...