Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

माया - Vrushali Jamdade

$
0
0

फार सुंदर व्यक्तिचित्रण...न बोलता..बरंच काही.

माया – वृषाली जामदाडे

“नाव काय रे तुझं?,” “जेवलास की नाही?,” “आई कुठाय तुझी?,” “काही खाणार का”, ने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यानं हूं कि चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता...पण मारल्याचे घाव नव्हते....

नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला. त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षाचं पोर त्या खांबा शेजारी बसलं होतं. गोबऱ्या गालाचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं.

पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं....दुपार झाली...ते तिथंच बसून होतं. त्याच्याकडं घागायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती. आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती मान वळवायची.

संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली. त्या पोराची आता तिला दया येऊ लागली. ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली. तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही. तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही....खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही. तिला काही सुचेना...त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना.

काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटलं; पण तिला धाडस झालं नाही. पोलीस येणार, त्याला घेऊन जाणार...पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार....ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती. पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच! तिला काही सुचेना. त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तीनं मनाशी पक्क केलं आणि ती घरात गेली.

देवापाशी दिवा लावला. थोडं कुंकू कपाळाला लावलं. सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं. तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला. एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली. पण मन रमेना. त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता. खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला, असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही....पण तिने खिडकी उघडली नाही. पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिने बाहेरचा दिवा लावला. रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली.

पहाटे जाग आल्यावर तिने पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं....रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल. कुठे गेलं असेल ते.... घरी सुखरूप पोहचले असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील? असे अनेक प्रश्नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली.... ! ते सुखरूप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं. दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं.... अगदी निरागस....त्याच्या मुठी वळल्या होत्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>