काहीतरी वेगळं बरका.......
गजराज – अदिती पावगी काळे
आमचं घर तेव्हा छान जुन्या पद्धतीचं होतं. पडवी, माझघर, माडी आणि ऐसपैस मस्त हवेशीर तीन तीन अंगणं. मागच्या अंगणात विहीर आणि आम्हा छोट्या मंडळींसाठी छोटी विहीर म्हणजे दगडी टाकी. बाजूलाच गुरांचा गोठा. त्यात मन रमवायला खूप सारे निर्मळ मनाचे भाबडे सवंगडी. काही गरजच नव्हती बाहेरच्या जगाची. आमचं विश्व तेवढ्यापुरतं सिमित असायचं.
तर त्यादिवशी कशाला तरी माझघरात गेले तर पंख्याच्या खाली खेळणं पडलेलं दिसलं. जवळ जाऊन बघितलं तर हत्ती. दिवाळीत किल्ला केल्यावर त्यात ठेवायला आणलेल्या प्राण्यांमधला. गुलाबी रंगाचा. पण म्हंटल अरेच्या, दिवाळी झाल्यावर सगळे प्राणी रोळीत भरून जागेवर ठेवले होते. मग हा कसा राहिला? पण राहिलाय तर आता जागेवर टाकूया म्हणून जवळ गेले त्याला उचलायला तर हललाच की तो. आणि हाताला गुळगुळीत पण लागला. दचकून मागे झाले.
जाम tension आलं. कित्ती पुढचे विचार येऊन गेले मनात. म्हंटल बाई आता याला ठेवायचं कुठे? आणि खायला काय द्यायचं? आत्ता पिल्लू आहे तोपर्यंत ठीक आहे पण मोठं झाल्यावर काय? केवढा होईल तो त्याचा देह. गोठ्यात बांधायचं म्हंटल तरी problem. बाकी आमच्या गाई वासरांना जागा कशी पुरणार मग?? बापरे बाप. विचार करून दमले, म्हंटल जाऊदे उगाच आपल्यावर नको जबाबदारी याची. उद्या काही केलंन यानी तर सगळे आपल्यालाच ओरडणार. नकोच त्यापेक्षा. वेळीच मोठ्यांच्या कानावर घातलेलं बरं. आणि नाही म्हंटल तरी जरा वेगळा प्राणी ना, त्यामुळे अंगभूत भीती पण बाहेर डोकवायला लागली होती. मागच्या अंगणात आप्पा (म्हणजे मोठे काका) बसले होते, गेले धावत धावत त्यांच्याकडे. म्हंटल आप्पा माझघरात हत्तीच पिल्लू पडलंय. (प्रचंड मोठ्ठा सुटकेचा निःश्वास, हो म्हणजे काही झालंच तरी आता मला नाही ओरडणार कोणी) त्यांनी कमालीच्या शांतपणे माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, मग काय उचल आणि दे टाकून. मी म्हंटल छे ते हलतंय, मला भीती वाटत्ये. बरं म्हणाले चक्क. आणि आले माझ्या मागुन. माझघरात गेल्यावर जरा वाकून बघितलं आणि तितक्याच शांतपणे म्हणाले जा झाडू आणि सूप घेऊन ये. मी घेऊन आले त्यांनी ते भरलं आणि अंगणात जाऊन टाकून दिलं.
खरंतर मला वाईट वाटलं पण म्हंटल पुढचं सगळं टळल ना मग जाऊदे. पण राहवेनाच. शेवटी धीर करून त्यांना विचारायला जाणार तेवढ्यात मगासपासूनचं दाबून ठेवलेलं हसू सहन न होऊन ते खो खो हसायला लागले. प्रचंड किवयुक्त नजरेने बघायला लागले माझ्याकडे. मला काही समजेचना, मग मीही तितकाच केविलवाणा चेहरा करून त्यांच्याकडे बघायला लागले. तर मला म्हणाले अगं वेडी का खुळी तू. उंदराचं पिल्लू होतं ते. माझ्या कल्पना विलासाचा फुगा अस्सा जोरदार फूटला म्हणून सांगू.. मी तर त्याला गोठ्यात बांधून मोकळी झाले होते शिवाय मोठा झाल्यावर त्याच्या सोंडेला लोम्बकाळायची वगरे स्वप्न बघत होते. पण उंदीर??? एवढा मोठ्ठा हत्ती आपलं डोंगर पोखरून शेवटी उंदीरच निघावा. मग ते मला समजावून सांगायला लागले, माझघराच्या वरती माडी आहे तिथे उंदरानी त्याच्या नवजात बालकाला जन्म दिला होता. पण वरती भालांना असलेल्या भोकातून ते बिचारं खाली माझघरात पडलं. आता ते इतकं लहान असताना गुलाबीसर दिसतं हे मला बापडीला काय माहित, मग काय माझ्या बालबुद्धीने करून टाकला त्याचा गजराज...