मेघाची ही कथा-आत्मकथन एक वेगळीच वाट शोधते.
खुडबुड – मेघा देशपांडे
आज ठरवलं उंदीर व्हायचं. झाले उंदीर. मनाच्या तळघरात पोहोचले. कुठे कुठे भुयारं खणता येऊ शकता येतील डोकं लावलं. बरीच नुसती लोटलेली दारं दिसली. काही दारांवर दगड वाटावेत असे काळाचे पडदे होते. काही नुसतेच उघडे. तर काही सील करून बंद केलेली दारं. काही दारातून प्रकाशाची बारीक रेष दिसेल न दिसेलशी मधूनच चमकत होती. गाण्यांच्या खोलीचं दार, फोटोंच्या खोलीचं, तर्कांच, शक्यतांचं, अर्ध्यावर सोडलेल्या प्रवसांचं , विचार , प्रश्न न झेपलेली उत्तरं, विस्मरणातल्या कथांचं, आठवणी, स्वप्न, आशा, अपेक्षा, अनुभव, पराभव, स्पर्धा, असमाधान खूप सारी दारंच दारं. अगदी मज्जा वाटली.
वाटलं किती वरवर कुरतडत राहतो आपण आणि शोधत रहातो खाद्य. भूक असली नसली तरी, 'हे का?', ' ते का नाही?' , किंवा ' असंच का ? ', 'कुठपर्यंत, किती, कुणासाठी, का का का हेच आणि एवढंच बसतो चावत. कुणाच्या ना कुणाच्या गजरावर ठरवतो भुकेच्या वेळा आणि प्रमाणही. वरती किती रंगीत तरी सपक पण मेदयुक्त चटक लावणारं खाद्य आयतं देऊन सुस्त आणि व्यस्त केलं जातं आपल्याला.
इथे आतमध्ये तर पूर्ण खजिना आहे. कुठलाच गजर नाही. लांबच लांब बिळंच बिळं. हजारो पळवाटा. कित्येक गुप्तमार्ग. खणू तिथे भुयारं. आणि हवा तिथे अस्सल खाऊ. सर्वांपासून लपवून ठेवलेला हा खाऊ वरती कधी दिसतच नाही.
आता तर अगदी ठरवलंच. इथेच ठिय्या देऊन राहायचं. लपवलेल्या सर्व जागांचा आणि राखून ठेवलेल्या गराचा, द्रव्याचा शोध लावायचा. भुकेसाठी आजवर जगलो. यापुढे शोधासाठी जगायचं. आता सुगंधाने हुरळून जात, भूक उद्दपित करून त्याने भारून जात तडफड करून करतो ती वणवण थांबवायची. त्या किंवा तसल्याच कसल्याशा भुकेने व्याकुळ बिकुळ होणं आणि एखाद्या व्यसनाधिनासारखं वेदना निर्माण करणं थांबवायचं. या वरच्या प्रकाशातला स्वतःचा ओंगळ, हपापलेला सुळसुळाट थांबवून आतल्या अंधारात जरा शांत मागोवा घ्यायचा. खुणावणारा प्रकाश आहे की भास .. आता मागोवा घ्यायचाच.
लागलीच वरच्या गलिच्छ चकचकाटाला रामराम केला. म्हंटलं, "तसाही रमला आहेस ना.. मी काही काळ नसलो तर कळणार सुद्धा नाही तुला .. इतका मशगुल आहेस. मी आलेच आतली उर्मी आणि कारणाची दारं खणून, त्यांच्यातून फुटलेल्या भुयाराच्या दुसऱ्या टोकाला हाताला जे लागेल ते घेऊन. "
आता माझ्या आतल्या तुरुतुरु चालण्यावर कसलेच लगाम नव्हते, की मानेवर नव्हती सवयीची आणि ओढीची गाडी. भावना, नाती, पीळ , मान, अहंकार यांचा नव्हता कुठलाच गाडीवान. महत्त्वाकांक्षेला नव्हता कुठसल्याच स्पर्धेचा , मोहाचा डंख. सुख सुख असं चित्कारणारी, आणि धावायला लावणारी, नव्हती तहान. एकटेपणाची, निराशेची असुरक्षिततेची नव्हती घशाला कोरड. अहाहा.. अगदी मोकळा, मुक्त फक्त प्रवास. आता फक्त बागडणं. कुणाच्याच तावडीत सापडणार नाही असं सुळकन इकडून तिकडे पसार होणं. एकेक करत तळघरातल्या प्रत्येक दारातून कुरतडून पार पलीकडे पोहोचणे. कधी पलीकडच्या भिंतीला भोज्जा करून येणं. कधी कुठल्याशा तिरिपेच्या दिशेने खणत जाणं. ऊर्जा घेऊन परतणं. कुठे शब्दांचे, कधी अर्थाचे पेटारे पाहून चकित होणं.. कुवतीत असतील तेवढे शब्द अर्थ कवेत घेऊन गाभाऱ्यात येणं, कुरुकुरु खात रहाणं. दिवस झाला म्हणून स्वप्न विसरायची गरज नाही की रात्र झाली म्हणून झोपायची. अमर्याद काळ आणि अमर्याद जमीन आणि ओझं नसल्याने फक्त ऊर्जा. एक मस्त तरतरी. सतत व्यग्र राहण्याची, शोधाशोध करण्याची, मिळेल त्या दारातून , जमिनीतून, फटीतून भुयार खोदण्याची अथक उर्मी. जणू शोधाचं इप्सित. आणि मग्न झालेला मी. एकेक करत दुःख, काळजी, अस्वस्थता, अपेक्षा, आशा, पराभव .. आज खूप साऱ्या दारांपलीकडे खणून परत आले.
इतक्यात अचानक स्थैर्याचं दार दिसतं. सुंदर नक्षीकामाची चौकट असलेलं दार. त्याला कडी कोयंडा नसलेला एक दरवाजा नुसता ओढून घेतलेला. आत अगदी शिरणारच.. तेवढयात गजर वाजतो. ' इथे कुठला गजर ? ' म्हणत नजर मागे जाते.
डोक्याशी साडेपाचचा गजर वाजत असतो. खिडकीतुन रोजची ओळखीच्या पाखराची शीळ ऐकू येते. गुड मॉर्निंग होते. कॉफीचा मग हाका मारू लागतो. मी घराची खिडक्या दारं उघडते. समोरच्या कडूनिंबावरचा चिवचिवाट हळूहळू मोठा होतो. काल थांबवलेल्या जागेवरून आवडती प्ले लिस्ट मी प्ले करते.
' गमऔर ख़ुशी में फर्क ना महसुस हो जहाँ .. गम और ख़ुशी में फर्क ना महसुस हो जहाँ ना महसुस हो जहाँ ना महसुस हो जहाँ मै दिल को उस मकाम पे लाता चला गया..
दिवसाची खुडबुड सुरु होते.
आज भाजी चविष्ट होणार असते.