नियतीचे वर्तुळ पूर्ण होतेच...
ताळेबंद – मोबा देशपांडे
यशवंतराव निवृत्त झाले तोवर कल्याणीनं आपलं स्वतःचं खाजगी सुसज्ज इस्पितळ थाटलं होतं. “पुन्हा जीवनाकडे“ असं सूचक आणि समर्पक बोधवाक्य तिनं आपल्या या मानसोपचार केंद्राला दिलं होतं. एकूणच दवाखान्याची सजावट, रंगसंगती, कारीडोर मधील फुलबाग, भित्तीचित्रे आदी सारंकाही योजक आणि जीवनाबद्दल आशा जागवाणारच होतं.
“बेटा कल्याणी, मी तसा मोकळाच आहे..आवडीने मदत करेन की तुझ्या कामात.” यशवंतराव एक दिवस म्हणाले.
“बाबा, माझ्याही मनात आलं होता...मीही इतक्यात म्हणणारच होते...तुम्ही दुपारी रुग्णांच्या केस फाईल्स, नोंदी, मुलाखत इ. महत्वाच कामे आवडीनं सांभाळू शकाल...छान वेळ जाईल की तुमचा......शिवाय तुम्हाला मानसशास्त्रात फार रुची होती न पूर्वी...आज पासूनच येत का...या”, असं म्हणून कपाळावरचा चष्मा डोळ्यावर करत ...डॉक्टर कल्याणी झार्र्र्कन कार वळवून क्लिनिक कडे रवाना झाली....तरी यशवंतराव अनिमेष नेत्रांनी ती वळणावर जाईस्तोवर एकटक बघत होते...भूतकाळ जणू आज त्यांच्या पापणीत गर्दी करू पाहत होता.
“हीच का ती चिमुकली कल्याणी? कमी वजनाचं बाळ...अंडरवेट... म्हणून तेव्हा डॉकटरांनी कित्ती घाबरवलं होतं! दोन्ही तळव्यांवर मावेल एवढासा वळवळता जीव ...धड दुधही पिता येत नाही अशी स्थिती ...नळीने दुध द्यावं लागे....त्यासाठी नाकावर ...गालावर चीकटपट्ट्या नुसत्या! पण मुलगी आय मीन फिमेल चाईल्ड ही जन्मतः चीवट जिद्दीची असते असं वैद्यकशास्त्र सांगते ....तिनं तग धरला ...हळूहळू छान बाळसंही धरलं!! “ येस्स..ट्रिंग...ट्रिंग..ट्रिंग ....नेक्स्ट प्लीज !! “
एक अदमासे सत्तरीची गौरवर्ण प्रौढा हळू हळूहळू पावलं घासत आंत आली. आर्थिक संपन्नतेच्या खुणा अवतीभोवती विलसत असल्या तरी डोळ्यातील निराशा लपत नव्हती. “डॉक्टर...माझी ओळख सांगते...मी गायनकोलोजीस्ट डॉ निशा कुळकर्णी....” असं नाव ऐकताच...शेजारच्या टेबलावरून यशवंतराव कान टवकारून ऐकू लागले ..खिशातला चष्मा डोळ्यावर चढवून खुर्चीत नीट बसते झाले...बघितल्यासारखा वाटतो हा चेहरा... कधीतरी... कुठेतरी..कुठे बरं ?
“ मी स्वतःच डॉक्टर...कायम हेल्दी आणि हायजेनिक जीवन जगले...पण उतरत्या आयुष्याच्या समस्या काही वेगळ्याच असतात..मला मनात भीती वाटते...इस्पितळ आता मुलगा आणि सून सांभाळतात...दोघेही डॉक्टर...कश्शाची म्हणून ददात नाहीये..पण उगाच दडपण जाणवत रहातय बघा सारखं... कारण काहीच नाही पण भीती वाटते खरी ...जीव व्याकूळ होतो...खूप्पच कासावीस व्हायला होतं...”, बोलता बोलता डॉ निशा डोळ्यातील पाणी नकळत टिपत होत्या.
“डोंट वरी..सारंकाही छान होईल बघा...इट्स टेंपोररी फेज यु नो....तुम्ही केसपेपर बनवून घ्या...काही जुजबी प्रश्न विचारू...बी होपफुल ...”
आता डॉ निशा यशवंतरावांसमोर बसल्या होत्य...केस पेपरवर क्रमवार नोंदी घेणं सुरु झालं, “कुठे आहे तुमचं इस्पितळ?”
“ जेडी रोड वर...भुलाबाई ज्वेलर्सच्या बाजूला ..पण मी मागील दोन वर्षापासून निवृत्ती घेतली व्यवसायातून ... बक्कळ पैसा कमावून झाला ...आता बंगाईवर डुलक्या घेत मनमुराद जगायचं ..छान हवं तस्सं राहायचं ...पण मध्येच हे मानसिक आजारपण उद्भवलाय की....!” “कुणी सोबत आलेलं दिसत नाहीये” यशवंतराव आजूबाजूला बघत उद्गारले.
“छे हो...तशी मी चांगली हिंडती फिरती आहे की....ड्रायवर बसलाय बाहे कारमध्ये...उगाच फार कुणाला न कळवता मी एकटीच निघून आलेय इकडे... “
“हे बघा...शरीराला त्रास होतो तसाच मनालाही त्रास होऊ शकतो ...त्यात लपवायचं काही कारण नाहीये “ आताशा यशवंतरावांना पुरती ओळख पटली होती ...थोडी गम्मतही वाटत होती ..डॉक्टरला काही त्रास झाला तर दुसऱ्या डॉक्टरकडे जाताना तो पेशंट होऊनच जातो ...तेव्हा पेशंटचं मन त्यांना कळात असेल का ?
डॉ निशा यांनी पर्स मधून छोटी पाण्याची बाटली काढून दोन घोट घेतले...जरा घसा लोला झाल्यावर किंचित हुशारी आली. “मला किनई, खूप निराश वाटतंय....कधीकधी तर आत्महत्या करावी की काय असे विचार मनात येताहेत हल्ली... ठाऊक आहे की, मनःस्थिती सांभाळणारी मेंदूतील रसायनं वयोमानाने कमीजास्त होतात. त्यामुळं असा त्रास होऊ शकतो...पण योग्य औषधोपचार आणि समुपदेशन यासाठी मी आलेय! सर्व सुखं हात जोडून उभी आहेत पण मला सुखाचं अजीर्ण झालाय.....” डॉ निशांना भडभडून आलं होतं.
अनेकदा कळत नकळत आपण केलेल्या चुका...कुणाचे घेतलेले तळतळाट यांची मेंदूतील सूक्ष्म स्पंदने छळत आहेत असं वाटतं का? यासोबत प्रश्नावलीतील इतर सारे प्रश्न विचारून झाल्यावर डॉ कल्याणीने त्यांना तपासले..केस स्टडी केली ...औषधं आणि काही टिप्स देऊन झाल्यावर डॉ निशा शांतपणे निघाल्या . त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून याश्वन्रावांच्या मनात भूतकाळ पिंगा घालू लागला.
होय तर, कल्याणीचा जन्म यांच्याच प्रसूतिगृहात झाला होता. काय पण तोर्रा होता तेव्हा या बाईसाहेबांचा ...खोऱ्यानं पैसा ओढून झाल्यावर येणारी बेपर्वाई त्यांच्या वागण्या बोलण्यात विलसत होती. कमी वजनाच्या कल्याणीला नाकानं दुध पाजायला नळी लावली होती. त्यावर लाव्लेलेई ती पट्टी किती खसकन ओढून काढली होती. लहानगा जीव कळवळला म्हणून मी सहजगत्या उद्गारलो , “डॉ. जरा हळू!”
तेव्हा प्रत्युत्तर मिळालं, “तुम्ही बस बघू आरामात...डॉ. तुम्ही आहात की मी ...आम्हाला आमचं काम करू द्या“, असं सुनावून पायातल्या स्लीपार्सचा फटक फटक आवाज करीत डॉ तोर्र्यात निघून गेल्या होत्या. अग्रिम शुल्क जमा केल्याबिगर नावनोंदणी न करण्याचा त्यांचा खाक्या परिचित होत...त्याचं रिटायर्ड गायनिक आता मनोरुग्ण झाल्या होत्या आणि ती चिमुकली कल्याणी मानसोपचारतज्ञ....नियतीची ही विलक्षण खेळी बघून यशवंतराव थक्क झाले होते.
डॉ निशा या डिप्रेशनच्या रुग्ण होत्या. वाढत्या वयाच्या मर्यादा आणि एकटेपणानं त्यात भर घातली होती. हा आजार एक्यूट डिप्रेशनच्या पातळीवर जाऊ नये याची काळजी घेणं फार गरजेचं होतं. म्हणून औषधांसोबातच मानसिक वळण आणि समुपदेशन इ. सुरु झालं. पण उभ्या आयुष्यात पैसा कामाव्ण्याशिवाय अन्य काही छंद, पुस्तकाचं वाचन, निर्भेळ मैत्री, पर्यटन आदी फार न केल्याने आता ते सारं अंगवळणी पडत नव्हतं. समुद्रावर जावून वाळूतले शंख शिंपले वेचण्यातच इतकं गर्क व्हावं की अंधार पडून जावा. मग उशिरा ध्यानात येतं की ...अरेच्चा समुद्रातल्या रुपेरी लाटा, क्षितीज आणि समुद्राची ती अथांगता सारच न्याहाळायचं राहून गेलय ...ही खेद्जन्य जाणीव विलक्षण विषाद निर्माण करते. डॉ निशा यांचेबाबत आणखी काय वेगळ झालं होतं? भौतिक सुखं जी रचून ठेवली होती आता त्त्यांचा उपभोग घेण्याचं वय सरलं होतं.
“हल्लीची पिढी कसलं जीवन जगतेय. मायबाप वृद्धाश्रमात ...लेकरू पाळणाघरात आणि घरदार नोकरांच्या ताब्यात आणि कमाईचे जू मानेवर घेऊन बेभान धावणाऱ्या बैलाचं आयुष्य पार पडल्यावर संध्याछाया भिवविती हृदया अशी स्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? नंतर स्नेह, वत्सलता, जिव्हाळा हुडकण्यासाठी जेथे केविलवाणी धडपड सुरु होते त्या डोहातील सारे पाणी आटून...पार कोरडे ठणठणीत झाल्यावर काय मिळवलं ?” डॉ निशा यांच्या मनातील दुखरी जखम भळभळत होती.
यशवंतराव कान देऊन ऐकत होते. विचारचक्र गरगरत होतं. ”खरच इस्पितळ, न्यायालय, पोलीसठाणे, कारागृह आणि स्मशान इ. ठिकाणी येणारे लोक अडचणीत आणि नाजूक मनस्थितीत असतात. तेव्हा त्यांचेकडून पैसे उकळणे अथवा निर्दय व्यवहार किती अमानवीय !
बघता बघता सहा महिने निघून गेले...डॉ. निशा उपचारांना छान प्रतिसाद देत होत्या...पण दरम्यान पतीच्या निधनाने पार कोसळल्या...डिप्रेशनने पुन्हा उचल खाल्ली. डॉ निशा यांना देखरेखीसाठी इस्पितळात भारती करण्यात आलं होतं. धकाधकीच्या जीवनशैलीत मनोकायिक आजारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालीय. पर्यायाने मानसोपचार घेणारे रुग्ण वाढले. सातत्याने बिछान्याशी खिळून असलेल्या रुग्णाला शाय्याव्रण येऊ लागतात. डॉ निशा यांचीही स्थिती काही फार वेगळी नव्हती. निराशेच्या त्रासासोबत आता बेड सोअर्सने हैराण केलं होतं. इस्पितळातील शोभा ही परिचारिका त्यांच्या सतत दिमतीला होती म्हणून निभावत होतं.
“शोभा, मला कड पलटायची आहे गं..... शोभा पाऊलांवर पांघरूण घाल की.....शोभा पावडरचा पफ लाव इ. सूचना सातत्यानं सुरु असायच्या. आणि सोबत चीडचीड सुद्धा !!
त्या दिवशी डॉ. कल्याणी राउंड वर आल्या...शोभाने डॉ. निशा यांना धरून उठवण्याचा प्रयत्न केला....व्रण जरा दुखावले असतील तोच त्या जोराने खेकसल्या, “शोभा, पेशंटशी कसं हळुवार वागायचं ते कळत कसं नाही ग तुला? बघ तरी किती दुखताहेत हे बेड सोअर्स....तुला कधी अनुभव येईल ना तेव्हा जाणीव होईल”, बाईसाहेबांच्या तोंडाचा पट्टा बराच वेळ सुरु राहिला..........यशवंतराव हे सगळं ऐकताना सहज पुटपुटले, “मेरा खून खून है और दुसरोंका खून पानी क्या?”
“डॉ. अहो तुम्ही सांगा की शोभला कसं हळुवार वागायचं ते!” असं निशा यांनी म्हणताच यशवंतरावांचा बांध फुटला. ”माफ करा...डॉ. निशा कुळकर्णी, आपण पूर्वी भेटलेलो आहे ...तुम्ही कदाचित विसरला असाल पण मी तुम्हाला विसरू शकत नाहीये.....”
“म्हणजे? मला नाही कळले!” निशा प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारात होत्या.
“कल्याणी माझी मुलगी...तिचा जन्म तुमच्याच सूतिकागृहात झालाय....तेव्हा ती अगदी कुकुलं बाळ असतानाचा एक प्रसंग...तिच्या नाकाची नळी काढताना त्यावरील बँडेज पट्टी तुम्ही खसकन ओढून काढली होती...तो प्रसंग अजून जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर आहे...तुम्ही सुद्धा त्यावेळी हळुवारपणे वागायला हवं होतं ना? पण नियती सगळी फिट्टमफाट करीत असते. आज तुम्ही तोंडाने सांगू शकता...ए हळू ..मला फार त्रास होतोय ...पण त्या वेळी ती चीमुकली पोर काही सांगू शकत नव्हती....बस ..फक्त रडली होती.”
यशवंतराव किंचित भावूक झाल्याचे बघून डॉ. निशा काहीशा अंतर्मुख झाल्या ...शोभा कावरीबावरी होऊन बघू लागली...मागे उभी डॉ. कल्याणी क्षणभर दिग्मूढ झाली, ”बाबा काय झालाय...एव्हरीथिंग इज ओके ना?”
“ओके...माफ करा डॉ. निशा ....मी याप्रसंगी अशी जुनी आठवण काढून तुम्हाला दुखवायला नको होतं....तसा विचारही मनात नव्हता....पण राहवलं नाही हे खरं....कारण अदृश्य नियतीच्या या खेळीने एक ताळेबंद जुळवलेला बघून चकित झालोय.....प्लीज टेक केअर“
यशवंतराव शांतदांत चित्ताने तेथून उठून जाऊ लागले. डॉ. निशा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिल्या.