बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – १९
ऊर्जा – सुनीत काकडे
वाऱ्या वावधनानं थैमान घातलं होतं. पावसाच्या सरी पिसाटल्या सारख्या कोसळत होत्या. माळारानावरून गावात घुसनारा वारा भेसूर सुरात गात होता. खालच्या आळीत कोपीच्या ओल्या गच्च भिंतींना खेटून भेदरलेले जीव कापऱ्या नजरेने छताकडं बघत बसले होते. भुईनी ओल धरलेली. साऱ्या घरात कडबा पांघरून त्यावर गोधड्या पांघरलेल्या. दिड दोन हाताचा दरवाजा असलेली ती खोपटं भीतीने ढवळून निघाली होती. दोन दिवसापासुन नंदीचं पाणी पुलावरून वाहत होतं. बाहेर जायच्या सगळ्या वाटा पाण्यानं लिंपुन काढल्या होत्या.
जशी जशी रात जवळ यायला लागली तसं दिघु नानाचं काळीज धडधडायला लागलं. पोटुशी असलेल्या संगीकडं पाहुन पोटात तुटत होतं. पर हातात काही नव्हतं. पाहुण्याला सांगीटलं होतं 'माय मेली म्हनुन काय झालं, बाप जिंदा हाय तीचा, पोरगी बाळांत माहेरीच व्हणार. चांगलं खाजगी दवाखान्यात घेऊन जातो, घरीच एक शेळी आणुन बांधतो. बिनघोर ऱ्हावा, तुमचं लेकरू आणं बायली टापोटाप घेऊन येतो.' दोन महीन्यापासुन पोरीला तळहाताच्या फोडागत सांभाळत हुता पण ऐन वख्ताला पावसानं घात केला. पोरीला आता कधीबी कळा सुरू होणार होत्या.
आता जसं जमल तसं परिस्थीतीला तोंड द्यायचा विचार करून दिघु नाना ऊठला. पोरीला म्हणाला 'संगे शेरात जायला जमायचं नाही, पण तु बिनघोर ऱ्हा, मी केशरबाई कडं जातो आणि तिला लागोलाग घेऊन ईतो.'
भेदरलेल्या डोळ्यांनी संगीनं फक्त मान हलवली. पोरीच्या डोळ्यातलं पाणी बघुन दिघु नाना कावरा बावरा झाला, पण फक्त क्षणभर. पोरीचा हात हातात घेऊन बोलला 'पोरी, येडी का खुळी तु. अगं केशरबाई सारखी सुईण शोधून सापडायची न्हाय, मामलेदारा पासुन पाटला पर्यंत सम्दे तीलाच बोलवायची. दवाखाने नंतर आले. आणि तुझा बा जिंदा हाय, तुला आन तुझ्या पोटच्या गोळ्याला कायच व्हायचं न्हाई.'
दिघुनाना तडक केशरबाई कडं गेला, तिला सारी हकीकत सांगीतली. केशरबाई बोलली 'अरे नान्या मला म्हतारीला आता दिसत न्हाय, मनगटात जोर न्हाय कसं निभायचं'.
'म्हतारे पोरीला आता काय वढ्यात ढकलून देऊ, ऊठ भिगीनं, मी चार बाया गोळा करतो. आन् तुझ्यावर विश्वास हाय. पोरगी आन् लेकरू जगले पाहीजे. ऊठ आणि घराकडं निघ ह्या पक्याचा हात धरून. मी आलोच बाकीचा बंदोबस्त करून.'
दिघुनाना तडक पाटलाकडं गेला स्पिरीटचा दिवा मागुन घेतला, काही सरपन मेनकापाडात गुंडाळून डोक्यावर घेतलं. भावकीतल्या जाणत्या चार बाया सोबत घेतल्या आणि कोपीवर पोहचला.
संगीला कळा चालु झाल्या व्हत्या. बायांनी लुगड्याचा आडोसा केला. आराडा ओरड धावपळ चालु झाली. चुलीचा धुर दाटला.
थोड्या वेळातच तान्ह्या बाळाचा टाहो त्या गोंधळात मिसळला. मुलगा झाला. बाळ बाळांतीन दोन्ही सुखरूप होते. काहीवेळ हसण्या खिदळन्याचे आवाज आडोश्या आडुन येत राहीले. आता पर्यंत सगळ्यांना धीर देणारे नाना ओडोश्याला बसुन मुसमुसत होते.
केशरबाईनं पडदा सारला, बाळुत्यात गुंडाळलेला तीन किलोचा जीव दिघु नानाच्या हातात दिला. नाताला घेऊन नाना पोरी जवळ आला, संगीच्या डोळ्यातुन पाणी गालावर ओघळत होतं. गावभर साचलेल्या पाण्या पेक्षा हे पाणी जास्त तुफानी होतं. भावनांचा आवेग जास्त वादळी होता.
आज आमावश्या असल्याची बायकांत कुजबुज सुरू झाली. तसा दिघु नाना ऊठला आणि केशरबाईला म्हणाला 'आरं बायांनो खुळ्या का काय तुम्ही. गडद अंधारतच जास्त चमकत्या दिव्याची गरज पडती. आरं अंधाराला सारणारा प्रकाश जन्माला आलाय, ते बी परिस्थीतीशी लढतच. नशिब काढलंय लेकरानं, शोधून ईतका भारी मुहरत गावला नसतां.'
स्पिरीट कंदिलाच्या लख्ख प्रकाशात अखंड सकारात्मक ऊर्जेने तळपलेला बाप संगी भरल्या डोळ्यांनी पाहत होती........