बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – २०
इंगळ - डॉ. क्षमा संजय शेलार
दुपारची रुक्ष वेळ....ऊन मी म्हणत होतं. वाराही पडलेला. झाडाचं पानही हलत नव्हतं. सईचं मनसुद्धा तसंच मळभलेलं.....गढूळलेलं...सकाळपासून काय काय घडलं त्याचा विचार करुन तिचं डोकं आणि मन अक्षरशः थकलं होतं. उलटसुलट विचारांनी ती इतकी हैराण झाली होती की, जेवायचंही तिच्या लक्षात नव्हतं.
"शी!! मी पप्पांचं ऐकायला हवं होतं. चांगला एनआरआय मुलगा मिळत होता. पण माझाच हट्ट... प्रेम विवाहाचा. पण हा सागर इतका बदलेल असं खरंच वाटलं नव्हतं. माझ्यासाठी वेळ तर कधीच नसतो आणि म्हणतो कसा 'पिल्लु तुझ्यासाठीच तर राबतोय ना मी' आणि झालं मग पिल्लू विरघळणार. नेहमीचच झालंय त्याचं. यावेळी मी अजिबात बोलणार नाहीये त्याच्याशी. लव्ह यु पिल्लू , आय याम सॉरी काही काही ऐकणार नाहीये त्याचं. यावेळी मलेशिया ट्रिपला जायचं म्हणजे जायचंच. माझ्या सगळ्या फ्रेंड्स कुठे कुठे फिरायला जातात, आणि हा म्हणतो चल लोणावळ्याला जाऊया!!
“रबिश!! गेला तसाच, टिफीनही घेतला नाही, वर म्हणाला तू सेल्फिश आहेस सई..शी! मीच मूर्ख. ह्याच्या प्रेमात एवढी वेडी झाले की, पप्पांनाही हर्ट करुन बसले."
सावित्रा नुकतीच कामावर आली होती आणि अधुनमधून सईकडे पोक्त नजरेनं पहात होती. डोक्यावर आलेल्या चांदीच्या साक्षीनं आलेलं शहाणपण सांगत होतं की काहीतरी बिनसलय. दोन महिने झाले होते कुलकर्णी जोडपं या फ्लॅटमध्ये रहायला आलं होतं. त्यांच्या लग्नाला तर अवघे चार महिने झालेले. आताशा नव्या नवरीचं कवतिक सरून संसाराचं अस्सल रहाटगाडगं सुरु झालेलं दिसतंय. सावित्राने मनातल्या मनात ताडलं .
"इचारावं का मालकीनबाईला काय झालं म्हनुन? पन् त्यांना आवडल का असला भोचकपना? जाऊदे बया. काय करायचं मला. आपुन भलं नि आपलं काम भलं"
सावित्राने तिच्याही नकळत मान हलवली. सई आणि सागरचं जगच वेगळं होतं. सावित्राच्या आणि सईच्या जगात जमिन अस्मानाचा फरक. त्यात सईचं तासनतास इंग्रजी पुस्तकात डोकं घालुन बसणं, नाजूकसं बोलणं सावित्राला अजुनच परकं करायचं. तिच्यासाठी सई आणि सागर जणु परिकथेतली पात्रं होती. एकही ओरखडा नसलेल्या काचेपलीकडची अस्पर्श्य पात्रं . . . भांडी घासायची संपत आली तरी डोक्यात सईचाच विषय पिंगा घालत होता . "तसं पाह्यलं तर दोघं नवराबायकोच घरात. नवीन लगीन म्हनल्यावर समदंच कवतिक. दिसाडा दोन दिसाडा कुडंतरी फिरायला जात्यात. वाट्टल ते खानं वाट्टल ते लेनं. एवडी मज्जा असुनबी पोरीचं तोंड का सुकलं कोन जानं?" आणि 'खळ्ळकन्'!! आवाजाने सावित्राची तंद्री भंगली. सई हॉलमधुन धावत आली. "ओह नो!! किती रक्त येतय!!!"
सावित्रा गडबडली होती. तिच्या परीनं सुचेल ते बोलत होती,
"चुकलं माझं मालकीनबाई. माझ्या पगारातुन पैसं कापून घ्या कपाचं. आरं देवा!! लई महागाचा आसल ना? माझं बी पार ग्यान गेलंय. हातबी थरथरत्यात आन् डोस्कं तर कुडं नवरा करून गेलंय कोन जानं?"
"मावशीss रिलॅक्सss शांत बसा बरं. आधी हा बर्फ लावा बघु. मी बिटाडीन घेउन येते."
सावित्रा लहान मुलासारखी गुमान ऐकत राहीली आणि तिला सईविषयी एकदम मायाच दाटून आली. 'माझी शकू जगली असती तर अशीच दिसली असती. अशीच गोरीपान बाहुलीसारखी होती माझी शकू. माय म्हणायची भांगेच्या घरी कशी तुळस उगवली? "
सावित्रा कटू भूतकाळ आठवू लागली .
"मावशी! हे घ्या बिटाडीन" "व्हय व्हय"
सावित्रा पटकन भानावर येत म्हणाली .
"हं बसा इथे चेअरवर. ओह केवढा घाम आलाय तुम्हाला? चक्कर वगैरे येतेय का रक्त पाहून? थांबा हं फॅन लावते"
'रक्त पाहून चक्कर? मला? एका खुनी बाईला??' त्याही परिस्थितीत सावित्राला भेसूर हसु आलं.
सई मन लावुन ड्रेसिंग करत होती. अगदी हळुवार. तिच्याकडं बघता बघता शकूच्या आठवणीनं सावित्राचे गोठवून ठेवलेले अश्रू पापणीच्या सांदीत दाटून आले.
"शीट!!! आजचा दिवसच खराब आहे मावशी. मलासुद्धा जाम बोअर झालंय आज" सई कुरकुरली.
स्वतःचं पहाडाएवढं दुःख बाजुला ठेऊन अभावितपणे सावित्रा बोलुन गेली,
"काय झालं बयो?" काचेच्या पलीकडचं आणि अलीकडचं जग क्षणकाळ एक झालं. बाईपणाच्या धाग्यानं दोन जीव जोडले गेले. सई सांगु लागली ,
"बघा ना मावशी! सागर नुसताच काम काम करत असतो. पहाटेपर्यंत त्याच्या अमेरिकेतल्या क्लायंट्सशी बोलत असतो. मला वेळच देत नाही. मला खूप बोअर होतं मग. लग्नाच्या आधी नव्हता असं करत. आता माझी गरज नसल्यासारखंच वागतो. पप्पांकडे निघुन जावंसं वाटतं मला कधी कधी तर. किती हॅपी आणि हॅपनिंग लाईफ होतं माझं . . . मी . . . . मला . . ."
"मालकीनबाई राग नका मानू पन् . . . " सावित्रा सईचं बोलणं थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत म्हणू गेली . . .
"मावशी मला बयोच म्हणा ना, मघाशी म्हणालात तसं. माझी आजी पण मला बयोच म्हणायची."
स्टिकींग कापता कापता निरागसपणे सई किणकिणली . “माझ्या शकुलाबी लई आवडायचं बयो म्हनलेलं."
"शकू कोण? तुमची मुलगी का? काय करते ती? लग्न झालं असेल ना?"
"व्हय लगीन केलं ना मी तिचं.......मडक्यासंगं......"
सावित्रा पराभूत आवाजात म्हणाली .
"काsssय??"
"मेली गं पोर माझी. तशीच कशी पाठवायची? हळद लावली,कानात डूल घातलं, हातभर बांगड्या, डोईला गजरा...तिला समदं आवडायचं. आमच्या गावातल्या लगीन झालेल्या पोरींकडं टकामका बगत रहायची...खुळ्यावानी..."
"ओह! सॉरी मावशी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं ...."
भूतकाळात हरवलेल्या सावित्रापर्यंत सईचं सॉरी पोचलंच नाही. थिजलेल्या डोळ्यांनी अन् भिजलेल्या शब्दांनी सावित्रा बोलत राहिली...बोलतच राहिली....
"उभा जलम पोतिरा पोतिरा झाला बघ. पदरबी येत नव्हता तं बापानी उजवली मला. यकामागं यक लाह्या फुटल्यावानी सा-यासा-या लेकीच. तवापासून दारूची लत लागली त्याला. 'बैल मारावा ताशी आन् बायको मारावी तिसर्या दिशी’ एवढंच त्याला ठाव व्हतं. जल्माचा इस्कोट करुन बाप दारूपायी पोट फुगून मेला. घाटातल्या कोतूबाईला लहानपनीच नवस बोलले व्हते. 'आई कोतूबाई! तुला तुझ्या सत्वाची आन हाये. परत मला ह्यो दारूचा वास बी कदी दावू नको."
"......."
"पन् कोतूबाईनी माझं गा-हानं नाईच ऐकलं. पैल्या रातीच वळाखलं. नव-यालाबी दारूनी विळखा घातलाय. तवा पह्यलं येक काम केलं. कोतूबाईचा अंगारा घेतला आन् समदा शेजारच्या वढ्यात फेकला. आन् भोगवट्याचं जळतं इंगळ पदरात बांधुन घेतलं. . . . "
"बापरे!!! "
सई अविश्वनीय आवाजात उद्गारली.
"आन् मग आमच्या गावातच सुईन म्हनून काम करू लागले. कित्तीबी अडलेली बाई असुंदे, सावित्राला बोलीवलं का तिच्या घरचे बिनघोर झोपत होते. आन् येक दिवस....."
"काय झालं मावशी एक दिवस ?"
"आन् येक दिवस . . .
रातच्याला अडली बाई सोडवाया धावले. माझी हरनी, माझी नक्षत्रा, माझी शकू घरातच व्हती. तिचा बाप दारू पिऊन तर्राट झा ला व्हता . . . सगळं उरकुन परत आले तं पाह्यलं तिच्या सख्ख्या बापानी तिला नाशिवली व्हती . "
सावित्राने दीर्घ सुस्कारा टाकला अन् परत बोलती झाली ,
"माझं लगीन झालं तवा माझ्या मायनी मला सांगितलं व्हतं. बयो!! बाईचं आविष्य म्हंजे पत्रावळ! उष्टवली का संपली. बयो !! दिल्या दावनीला मुकी रहा आन् सुखी रहा''
त्या राती पैल्यांदाच माझ्या मायची सांगी म्या धुडकावली....माझा हात थराकला नाई का काळीज चराकलं नाई.. जित्ती कोंबडी कापावी तसा कापला त्याला....."
".............."
सई घाबरून मागे सरकली. सावित्राचं जिवंत प्रेत तिच्या भोगवट्याकडे निघून गेलं.....
दोन क्षण स्तब्ध गोठलेले गेल्यानंतर सई त्वरेने उठली. घाईने दरवाजा बंद करुन घेतला. घामाने डवरलेल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. थरथरत्या हाताने फोन लावला,
"....हॅलो....... सागर..........."
तिला तिच्या परिकथेतल्या जगात परतायचं होतं ना!!