बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – १६
मशीन - नेहा लिमये
दुपारी दीडचा भोंगा झाला आणि इतका वेळ चालू असणारी मशीनची घरघर थांबली. शिवरामने मानेला गुंडाळलेला पंचा सोडला आणि घाम पुसत कॅन्टीनचा रस्ता धरला. डाव्या जबड्यात एका हाताने तंबाखूची गोळी भरत भरत दुसऱ्या हाताने त्याने कार्ड पंच केलं.... थोडा वेळ त्या स्क्रीनकडे बघत तो नुसताच उभा राहिला. आयला ,आपला टाईम या खोकड्यानेच गिळून टाकलाय जणू ... सारखं एन्ट्री करा ...कधी आलो, कधी गेलो......तेव्हा उपकार केल्यासारखे पैसे पडणार हातात. भिकाऱ्यात अन आपल्यात काय फरक आहे का नाही ?
तंबाखूने भूक मरायच्या ऐवजी डोक्यात आणि पोटात आता अजूनच डोंब उसळला !
बराच वेळ गेला .... "ए चल कि शिवा; काय ढोसून आलास काय रातच्याला कामावर?" मागून एक कामगार चिरकला.....
शिवरामने भानावर येऊन झपाझप चालायला सुरुवात केली. कॅन्टीनमधे सदा, किरण्या आणि म्हाद्या आधीच येऊन बसले होते. नेहेमीप्रमाणे थट्टा मस्करी चालू होती. आज शिवरामचं काही केल्या लक्ष लागेना तिकडे. समोर आलेलं अन्न चिवडत चिवडत त्याच्या डोक्यात चक्र सुरु होत ...
"आजची बॅच ५ पर्यंत डिस्पॅचला जायला पाहिजे ... नाहीतर फ्लोअर मॅनेजर उभा चिरेल. चार दिवस झाले, ओव्हरहाऊलींग करायला हवंय बोंबलतोय पण त्याला फक्त प्रोडकशन चार्टच दिसतोय समोर......... साला **** *** आज पण ओव्हरटाईम आहेच म्हणजे .... काय राव जिंदगी ! सकाळी उठा , न्याहारी करा आणि फॅक्टरीचा रस्ता धरा.... दिवसभर राबून त्या मॅनेजरचा सुतकी चेहेरा बघा, तेच ते अन्न चिवडा, घरी गेलं की बायको करवादायला लागते. तिचं तरी काय चूक म्हणा .. मशीन वर काम करता करता नवराच एक मशीन झालाय ...त्याच ओव्हर हाऊलींग करून पण काय फायदा नाही. डायरेक्ट स्क्रॅप करावं तरी सोय नाही. आहे तोवर चालवून घ्यायचं.
पण महिनाभर ओव्हरटाईम म्हणजे ७-८ हजार सुटतील ... शांतेची फी भरायचीये, घराचं छप्पर डागडुजीला द्यायचंय पावसाआधी. झालंच तर रंग पण लावून घेतो. शिवराम या विचारांनी जरा सुखावला. हाताखालच्या कामगारांना भराभरा सूचना देऊन तो बॅच मधली सॅम्पल्स बघायला लागला. ...पाच वाजले आणि परत एकदा भोंगा वाजला. फ्लोअर मॅनेजर अवतरलाच लगेच. शिवरामनं बॅच डिस्पॅचला तयार आहे सांगितलं तेव्हा मॅनेजरने ठेवणीतलं हसू फेकलं आणि निघून गेला......
आज ५ तारीख .......
पाच वर्ष उलटली ........
शिवरामच्या आयुष्यातली मशीनची घरघर कायमची थांबलीय पण सकाळी ८ चा आणि संध्याकाळचा ५ चा भोंगा त्याला अजून ऐकू येतो. तो रोज येतो, तंबाखू लावतो .......तासन तास शून्यात बघत गेटबाहेर बसून राहतो. कधी भेसूर हसतो स्वतःशीच .... कुणी म्हणतं , त्याला वेड लागलंय.
फॅक्टरी बंद पडल्यापासून गेट वर रोज नवीन बातम्या चघळतात सिक्युरिटीवाले ... मालकांनी बाहेरून पार्टी आणलीये , फॅक्टरी विकणारेत, सरकार फॅक्टरी कामगारांना नुकसान भरपाई देणारे.........काही नाही तर तीन महिन्यांचा पगार आणि बोनस तर मिळणारच.
त्यांना काय माहित.... गळक्या छपराखाली शिवराम नावाचं एक मशीन केव्हाच स्क्रॅप झालंय ....
ओव्हर-हाऊलींग राहिल्यामुळे !!....