Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

वादळ-Manik Gharpure

$
0
0

बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – १४

वादळ – माणिक घारपुरे

सोनचाफ्याला वादळाची चाहूल लागली आणि तो उत्सुकतेने वाट पाहू लागला. खरंतर तीन आठवड्यपूर्वीच्या वादळाने त्याचं सर्वस्व हिरावून नेलं होतं. आणि तरीही आज तो वादळाचीच वाट बघत होता...त्याच्या चमेलीकडे जाण्याचा तोच एकमेव मार्ग त्याला दिसत होता.

हळूहळू वादळ जवळ येऊ लागलं. सोनचाफा गदागदा हलायला लागला. पण आज त्याने मूळं घट्ट रोवली नव्हती. त्या वादळी सायंकाळी कदाचित तेच चुकलं होतं त्याचं. पण 'चुकलं होतं' असं तरी कसं म्हणायचं? ती प्रतिक्षिप्त क्रिया होती त्याची..आणि त्या क्षणाची गरजही. चमेली इतकी थरथरत होती की तिला आधार द्यायला त्याला मूळं रोवूनच उभं रहावं लागलं होतं.

त्या आधी मात्र कधीपासून कुणास ठाऊक, अनेक पावसाळे त्यांनी बिलगून एकत्र घालवले होतें. सगळेच ऋतू किती सुंदर वाटायचे तेव्हा..चमेलीचा बहर संपता संपत त्याला बहर यायचा.. सुरेख दृश्य असायचं ते. दोघांचा मिळून एक वेगळाच सुंदर परिमळ बनायचा. कुणीही कधीही न कल्पिलेला...वारासुद्धा त्यांच्याभोवती घुटमळत त्यांचा दरवळ चोरून घ्यायचा. त्यांना कळायचं ते, पण अशावेळी एकमेकांकडे बघून दोघे नुसतंच हसायचे. त्यांचा कोपरा म्हणजे बागेचं आकर्षण होतं. आला गेला प्रत्येकजण त्या अनोख्या दरवळाचं कौतुक करायचा. अशावेळी आणखी फुलून यावंसं वाटायचं दोघांना. चमेली सोनचाफ्या भोवतालची मिठी आणखी घट्ट करायची आणि सोनचाफाही अभिमानाने शेंडा वर करून डुलायचा. किती हवेसे, देखणे, सुगंधी दिवस होते ते!

तीन आठवड्यापूर्वी ते वादळ आलं आणि सगळं चित्र बदललं. त्याने चमेलीला सावरायचा खूप प्रयत्न केला होता. पण वारा इतका वेगाने वाहत होता की तिला सावरताच आलं नाही स्वतःला...सैल होत गेली तिची मिठी...ते अनुभवणं किती क्लेशकारक होतं! तो तेव्हा खूप हतबल झाला होता...वाऱ्याच्या एका निष्ठूर तडाख्यात उन्मळून पडली ती....मुळासकट. सगळ्या फांद्या, सगळी पानं खाली वाकवून त्याने आधार द्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण नाही थांबवता आलं त्याला तिचं कोसळणं. तेंव्हापासून एकाकी तो नव्या वादळाची वाट बघत होता.

आज त्याची प्रतीक्षा पूर्ण झाली होती. पण इच्छा होईल पूर्ण? तो सगळ्या जाणीवा एकवटून सज्ज झाला होता. वाऱ्याचा जोर आजमावत होता. आज त्याने सगळी इच्छाशक्ती पणाला लावली होती. ढगांचा गडगडाट सुरु झाला. एका अनपेक्षित क्षणी आसमंत उजळून निघालं आणि ढगांतून वीज निघाली. सोनचाफा सावध होताच. त्याने डोळे मिटले. चमेलीचा बहर आणि गंध आठवला आणि मग सगळ्या फांद्या, सगळी पानं वर करून येणाऱ्या विजेचं स्वागत केलं..अगदी मुळांपासून..संपूर्ण समर्पण!

एकच कडकडाट आणि त्याची ईच्छा पूर्ण झाली!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>