बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक - ४
नवे बूट, नवी सिंड्रेला – शिवकन्या देशपांडे
पायात फिट्ट बसणारा बूट घालून सिंड्रेला राजकुमारा बरोबर निघून गेली.
त्यांनी सुखाने संसार केला. राज्य पण केले.
परवा ती जपानी बाजारात दिसली.
विचारले तर म्हणाली, बूट फारच फिट्ट बसलेत, काचताहेत !
कुणी काढून देईल का म्हणून शोधत शोधत इथपर्यंत आलेय.
म्हटले, बाई बूट घालायला सगळे तयार आहेत, काढून मात्र कोssssणी देणार नाही!
मग तिने मोठ्या कष्टाने स्वतःच ते बूट काढले. तिथेच टाकले अन निघून गेली.
पुढे जपानी बाजारात एका नव्या लेडीज बुटाची धूम निघाली .
लाकडी बूट आणि त्यावर काचेचे तुकडे.
लहानपणापासून मुलीनी ते पायात घालायचे. आपले पाय छोटेसेच ठेवायचे!
पाय जितके छोटे, तितकी मुलगी सुंदर.