बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक - २
विठ्ठू – रश्मी नगरकर
सिग्नलला उभी होते. सिग्नल सुटला अन एका छोट्या मुलाने मोठयाने आवाज दिला
“दिदी लिफ्ट..”
तस मी सहसा कोणालाच माझ्या गाडीवर बसवत नाही पण आज काय वाटल कोण जाणे, थोड पुढे जाउन मी थांबले, आणि त्याला चल ये म्हणून हात केला. तो धावत आला, मस्त स्माईल दिली आणि बसला गाडीवर. आता मला फार बडबड लागते...मी काय गप्प बसणार होय...आमचा संवाद सुरू झाला.
कुठे जायचय? कुठे राहातो? कितवीत शिकतो असे बरेच काही मी त्याला विचारून झाले...इकडे कुठे चाललास म्हटल तर म्हणे ईद की तैयारी करने.
मी: नाम क्या है तुम्हारा?
तो: मुबारक
मी: बहूत प्यारा नाम है तुम्हारा
तो: अब्बू ने रखा है
मी: फिर अब्बू को बोलना घर जाओगे तो
तो: पर अब्बू तो गुजर गये
काही वेळ मी सुन्न झाले...त्याला सॉरी म्हणावंव ही भावना नाही झाली...स्वता:चच बालपण दिसल दोन मिनिट समोर...मग मी थोड सावरल.
मी: कोई बात नही मेरे भी अब्बू नही है लेकीन तुम्हे पता है जिनके अब्बू नही होते वो बचे खुदा के खास होते है..बहुत ख्याल रखता है उनका खुदा...
तो: मुझे पता है दिदी. आप मेरा दिल रखने के लिए कह रही हो...पर जिंदगी कहा दिल रखने के लिए थोडी तसल्ली देती है?...अभी देखो कोई लिफ्ट नही दे रहा था और मेरे पास पैसे भी नही थे...
मी काही पुढे बोलू नाही शकले...त्याच्या घरात आई, तीन बहीणी आणि हा सर्वात छोटा मुबारक ...माझे बालपण...ती फरपट, मला फ्लॅशबॅक होत होती...त्याने रोको रोको म्हटल्यावर मी गाडी थांबवली...त्याने जाउ का विचारल किती निरागस आणि निखळ हास्य होत त्याच! मी त्याला थोडे पैसे दिले...
मी: दिदी की तरफ से इदी तेरे लिए...
तो खुश झाला पण पुढच्याच क्षणाला थोड नाराज होउन ,
तो: लेकीन मै आपको क्या दू?
मी: बस दुआ करना दोस्त
तो: कैसे करू...फरिश्तों के लिए खुदा से और क्या दुआ करु?
मी निशब्द झाले...नीट जा बोलले का ते देव जाणे...तो म्हणे आप जाओ फिर मै जाता हू ...बंध आपल्या आयुष्यात जन्माने नाही तर नात्याने सांधले जातात पण काही धागे मात्र नियतीने मोकळेच सोडलेले असतात आपल्यासाठी कदाचित अस कोणी भेटलं की जुळून येण्यासाठी...तेव्हा जात, धर्म, पंथ त्याच्या आड येत नाहीत... मी गाडी सुरु केली...तो तिथेच उभा होता अगदी मी त्याला अन तो मला दिसेनासा होई पर्यंत....मी त्याला आरश्यात पाहात होते...तो कटेवर हात ठेवून गोड हासत होता आणि त्याच्या मागेच विठ्ठलाच सुंदर फ्लेक्स ज्यावर लिहिलेल होत...पाउले चालती पंढरीची वाट...
मुबारक तेव्हा मला अगदी विठ्ठलच वाटला... कोण म्हणत पंढरीला गेल्यावर विठ्ठू भेटतो...कौन कहता है रोजा रखने से खुदा की इबादत होती है...मला तर माझी माउली, माझा खुदा त्या सावळ्या, हसऱ्या मुलातच दिसला. माणसातलं माणूसपण जेव्हा जागं असतं तेव्हा देवपणाची अनुभूती आपोआप येते आणि देव आपल्याला अशा अनेक रुपात भेटतो हेच खर असेल....