त्या क्षणांशी प्रामाणिक रहाणे...
पहिला पाऊस – माणिक घारपुरे
मुग्धाने कॉफीचा शेवटचा घोट घेतला. पावसाकडे बघतांना तिला सारखा रघुनाथ आठवत होता. त्याच्याशी बोलावं, निदान मेसेज तरी करावा असं मनात आलेलं, तिने पाच मिनिटात निदान शंभरवेळा तरी निकराने परतवून लावलं होतं. म्हणजे संपर्कात राहायचं नाही असं काही ठरवलं नव्हतंच त्यांनी. पण दुखऱ्या जागांना कुणी आपणहून धक्का लावत नाही. हेही तसंच होतं काहीसं...पण सरावाचं झालेलं एकटे पण आज पावसाने धुडकावून लावलं होतं. मग जेव्हा अगदी राहवेचना. तिने फोन काढला आणि त्याला मेसेज टाईप करायला घेतला ,
रघुनाथा,
अखेरीस आलाच तो. अगदी राजरोस. शानदार पावलं टाकत आला. कुणाचीही तमा न बाळगता. अगदी सूर्याचीही नाही. आज ठरवलंच होतं त्याने की कशाचीही पर्वा करायची नाही. दीर्घ विरहानंतर सखीला जसं भेटतात तसंच भेटला. कडकडून.... झडझडून बरसला . आणि तो भेटलाही तसाच. त्याच्या वर्षावात ती गुदमरून गेली सुरवातीला. इतकं सुख कसं झेलावं, कुठे ठेवावं कळत नव्हतं तिला. पण मग हळूहळू तीही मोकळी झाली. त्याच्या गैरहजेरीतली प्रत्येक जखम तिने दाखवली त्याला. तोही हळुवारपणे तिच्या रोमारोमातून, जखमांतून रिसत गेला आत आत, खूप खोल. तिच्या आत्म्यापर्यंत. जेव्हा तिथे असलेली ओल त्याला भेटली तेव्हाच सखीला भेटल्याचं समाधान मिळालं त्याला. गेल्यावेळी तो परत निघाला तेव्हा हीच ओल त्याला तिच्या डोळ्यांत दिसली होती. दरम्यानच्या काळात तिने इतकं सोसलं होतं की ती ओल खूप आटून गेली होती. तिच्या सगळ्याच बाह्य जाणिवा शुष्क झाल्या होत्या. ... पण आता आला होता ना तो...आता पुन्हा तो तिला जुन्या दिवसांची आठवण करून देईलच . तिलाही कळलं होतंच ते. ती मृदगंधाचे सुगंधी उसासे टाकत प्रसन्न हसली. भविष्याच्या कल्पनेतला सृजनाचा हुंकार तिलाही खुणावत होता. तो नसतांना झालेली होरपळ मग ती विसरलीच जशी. तो देत गेला, तिच्यात रिता होत गेला. तीही घेत गेली, भरून, भारून जात राहीली. केवढं भव्य मिलन होतं ते.
' हा सोहोळा बघून मला तू आठवतो आहेस. आपल्या भेटीची वाट मीही बघतेय. भेटशील असाच कडकडून? '
आणि डोळे बंद करून साशंकतेने मेसेज पाठवून तर दिला. पण नंतर मन स्वीकार आणि अस्विकाराच्या हिंदोळ्यावर झुलत राहीलं. उत्तर आलं असतं तरी त्रास होता, आलं नसतं तरी त्रास होता आणि मुळात मेसेज केला नव्हता तेव्हाही आठवणींचा त्रास होताच की..जरा अधिकच. पण बाण तर आता सुटला होता. तिने मान झटकली आणि येणाऱ्या प्रतिक्रियेसाठी सज्ज झाली...पण दुसऱ्या क्षणाला त्याच उत्तर आलं, ‘ इथंही भेट झालीये त्यांची. जाणवतोय तिचा तो श्वास..तिचा गंध येतोय ..ती चिंब भिजलीय हळवी होत. तो आता नाहीये..तिच्यातच सामावून गेलाय...तूच आठवली होतीस .... घेशील तू असंच कवेत? '
मुग्धा खूप थरथरली. दुराव्यातल्या विरहाने रघुसुद्धा तिच्या इतका हळवा झाला होता. तिने उत्तर टाईप करायला घेतलं, ती तर किती समर्पित होती. स्वतःला विसरून त्याला स्वतःमध्ये सामावत राहीली. तूही येऊन तर बघ एकदा. तसा आता तो थांबलाय. तीही झालीये श्रांत, क्लान्त. त्याच्या आवेगाने! हवासा असला तरी त्याचा तो धसमुसळा उन्मादच होता. सोसलाच होता तिने. पण आता तृप्त होऊन वाहातेय. मला हेवा वाटतोय ह्याक्षणी तिचा खूप. तिच्या सख्याने किती श्रीमंत केलंय तिला. अंगप्रत्यंग निथळतेय तिचं. आणि मी मात्र धुमसतेच आहे अजून. नकोसं वाटतंय आता बाहेर बघायला. आणि तुला काहीच नाही त्याचं. येऊन तरी बघ एकदा तीच उसासणं आणि माझं धुमसणं. ठरव एकदाचं माझं काय करणारेस ते.'
तिचं उत्तर वाचून रघु आणखी व्याकुळ झाला. त्याची बोटं हळवेपणानी लिहू लागली,' माहीत आहे ग मला तिथे काय झालं असणार ते. येणार तर होताच तो. नक्की वादळानं साथ दिली असणार त्याला. कुणीतरी देणारच होतं. मग खाडकन दरवाजा उघडला असेल . तूही धावतच बाहेर.....तो अमर्याद वेगाने जाडजाड संततधारेत कोसळला असेल. एवढ्यात आकाशात जोरदार चमकलेली वीज अगदी जवळच कुठेतरी कडाडकड आवाज करीत कोसळली असेल. जर पाहीलं असतंस त्या प्रकाशात तर दिसलंच असतं; हातचं काहीच न राखता तो कोसळत होता ते. सगळीकडून उंचावरुन डोंगर द-यातून खूप काही वाहून जात असणार..तो असा रिकामा रिकामा होत असताना ती ही भरुन वहात असणार. खरंतर आता त्याचीच पाळी होती. ती तर केव्हाच बरसू लागली होती.'
वाचून मुग्धालाही भरून आलं. खरंच इतक्या दिवसांचं साचलेलं बरंच काही वाहून जात होतं. खरंतर सारंच...अहंकार, दुरावा, अबोला...सारं सारं. तिचं खायला उठणारं एकाकीपण हळूच कोपऱ्यात जाऊन बसलं होतं. तिनेही तितक्याच हळुवार उत्तर दिलं, 'अगदी असंच झालंय बाहेर. खूप प्रतीक्षा केली होती तिने. त्या प्रतिक्षेचा असाच अंत तिला अपेक्षित होता. तिनेही त्याला पाहताच सारं झुगारून दिलंच होतं. देहभान विसरली होती ती. नजरेचे पहारे, माघारी होणारी कुजबुज कशा कश्शाकडे तिने लक्ष दिलं नव्हतं. देहाचं हरवलेलं भान नुकतंच परत आलंय आता . आवेग सोसल्याच्या तृप्त खुणा इथेतिथे दिसताहेत. इथे थोड्या वेळापूर्वी नक्की काय झालं? कुणी कुणाला समर्पण केलं? काय दिलं, किती काय काय मिळालं? याचा हिशोब कसा मांडायचा? एकटीनं करणं शक्यच नाहीये. येशील? आत्ता लगेच?? '
त्या क्षणाच्या मागणीशी, त्या भावनांशी अत्यंत प्रामाणिक राहत रघू भरधाव पावसात निघाला. धावतच. मोबाईल तसाच घरीच ठेवून. पहिल्या पावसाच्या मृदगंधात आता एक नवाच गंध मिसळत जात होता. अंतर कमी कमी होत होतं. तो आवेग पाहून पाउस हळू हळू त्याच्यात मिसळून गेला. अनावर उत्सुकतेने मुग्धा उत्तराची वाट पहात होती. खूप वेळ उत्तर आलंच नाही म्हणून हिरमुसली. रिकामा कॉफीचा एकटाच मग डोळयांना सलायला लागला होता. घरातही पाऊस येण्याची चिन्ह दिसायला लागली होती आणि तशात बेल वाजली.....पहील्या पावसाने यावर्षीही पुन्हा एकदा जादू केली होती.