Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

गोष्ट - Gautam Pangu

$
0
0

बालविश्व निरागस असते....

गोष्ट – गौतम पंगु

रात्री साडेआठचा सुमार असतो. जेवणं झालेली असतात. मी भांडी डिशवॉशरला लावत असतो. बायको दुसऱ्यादिवशीच्या डब्यांची तयारी करत असते. आमची २री मधली मुलगी टीचर बनून तिच्या मिकी, मिनी, पिगी, पांडा, डॉगी वगैरे विद्यार्थीगणाला समोर बसवून हॉलमध्ये कुठलासा खेळ शिकवत असते. त्यातच पिगी तिचं ऐकत नाही म्हणून त्याला मध्येच ‘दॅट वॉज नॉट नाईस, पिगी’ असं दटावणं चालू असतं. अचानक खेळता खेळता तिला दोनतीन जांभया येतात. चाणाक्ष का काय म्हणतात तशा नजरेनं बायको किचनमधून तिच्या जांभया हेरते आणि तिला विचारते, “ काय झालं बाळा, तुला झोप येते आहे का?” आणि आमची मुलगी चक्क मान डोलावून ‘हो’ म्हणते. आम्ही दोघे हातातली कामं थांबवून आश्चर्यानं एकमेकांकडं बघतो. साडेआठ वाजता या बयेला झोप येते आहे? म्हणजे दररोज काही झालं तरी दहा-साडेदहाशिवाय न झोपणारी ही पोरगी आज चक्क लवकर झोपणार की काय? म्हणजे आम्हालाही आज चांगली आणि पुरेशी झोप मिळू शकणार? म्हणजे उद्या ऑफिसमध्ये सकाळी आठ वाजताच्या मीटिंगला तोंड फक्त जांभया देण्यासाठी न उघडता एखादा चांगला पॉईंट मांडण्यासाठी उघडून बॉसला सरप्राईज देता येणार? झोपायच्या आधीच अशी स्वप्नं माझ्या डोळ्यासमोर नाचू लागतात.

आम्ही हातातली कामं झपाझप उरकायला लागतो. ही अभूतपूर्व घटना कशी घडली असावी याचा विचार करतबायको म्हणते,

“अरे सध्या डे केअर मध्ये यांच्याकडून भरपूर अॅक्टिव्हिटीज् करवून घेतात, त्यामुळं दमत असतीलही मुलं!”

मनातल्या मनात मी डे केअरमधल्या मिस सारा, मिस क्रिस्टी वगैरे (साधारणतः पु. लं. च्या ‘आपली सरोज खऱे’ च्या साच्यातल्या!) मास्तरणींचे आभार मानतो आणि आम्ही बेडरूमच्या दिशेला कूच करतो. फास्ट फॉरवर्ड टू रात्रीचे दहा: आमची मुलगी अजूनही टक्क जागी असते. बेडवर तिच्या दोन्ही बाजूंना आम्ही दोघे हताश होऊन बसलेले असतो. आजूबाजूला सहासात पुस्तकांचा ढीग पडलेला असतो. ‘वन मोअर, वन मोअर’ करत तिनं ही सगळी पुस्तकं दोघांकडून वाचून घेतलेली असतात आणि आता तिची झोप एकदम पळालेली असते. त्यातही एकच पुस्तक आळीपाळीनं ‘आई तू वाच, बाबा तू वाच’ करत दोघांकडून वाचून घेण्यात तिला कसला आसुरी आनंद मिळतो काय ठाऊक! मोठी होऊन ‘कंपॅरिटिव्ह रिसर्च’ वगैरे क्षेत्रात जाईल बहुतेक! त्यातही एखादा शब्द जरासा इकडचा तिकडे झाला की कार्टी लगेच ‘ नो बाबा, गोल्डीलॉक डिडन्ट इट सिरिअल, शी एट पॉरीज’ असं म्हणून चूक दाखवून देते!

“बाळा, झोपा आता, उशीर झाला खूप”,

तिच्या आईच्या आवाजात आता हळूहळू दटावणीचा सूर येऊ लागलेला असतो.

“पण मला स्टोरी पाहिजे”,

मुलगी तक्रारीच्या सुरात म्हणते.

“स्टोरी आपण खूप वाचल्या. आता लाईट्स ऑफ करा, मग बाबा तुला स्टोरी सांगतो ओके?” असं म्हणून तिची आई लाईट्स बंद करून पांघरुण वगैरे घेऊन एकदम झोपायच्याच तयारीला लागते.

“अगं एकदम झोपतेस काय? मी कुठली गोष्ट सांगू?”, ध्यानीमनी नसताना ही जबाबदारी अंगावर पडल्यामुळं दचकून मी म्हणतो.

“त्यात काय एवढं? एक साधी गोष्ट सांगता येत नाही तुला? तू सांगायला लाग म्हणजे ती झोपेल बघ लगेच. तुझ्या पीएचडी डिफेन्स मध्ये कसं तुझं प्रेझेंटेशन रटाळ होतं, त्यामुळं तुझे कमिटी मेम्बर्स झोपले आणि त्यामुळं त्यांनी तुला फारसे प्रश्न न विचारता सोडून दिलं हे तूच मला सांगितलं होतंस ना? तेच स्किल वापर इथे!”, असं म्हणून तिची आई चक्क कूस बदलून निद्रादेवीची आराधना करायला लागते (खूप दिवसांनी हा वाक्प्रचार वापरायला मिळाला!)

मुलगी जवळ येऊन म्हणते, “बाबा, स्टोरी सांग ना!”

“चला झोपा, मग मी सांगतो,” आम्ही दोघे झोपतो. तिला तिच्या वयासाठी असलेली बरीच पुस्तकं आत्तापर्यंत वाचून दाखवलेली असतात, पण स्टोरी अशी अजून सांगितलेली नसते. थोडा विचार करून मी एक साधीसोपी पंचतंत्रातली गोष्ट सांगायला सुरु करतो.

“एकदा काय झालं, एक मोठं जंगल होतं, आणि त्यात खूप खूप अॅनिमल्स होते, आणि ते सगळे तिथं खूप मजेत राहात होते… ”

“बिग जंगल! लॉट्स ऑफ अॅनिमल्स!” मुलगी उत्साहानं म्हणते.

चला, पहिल्याच वाक्याला दाद मिळाली! मला बरं वाटतं.

“कोण कोण अॅनिमल्स होते बाबा?”

“टायगर, चीता, डिअर, बेअर, एलिफन्ट…”

“अजून?”

“अं...जिराफ, झेब्रा, फॉक्सी, पिगी…”

“अजून?”

‘खूप खूप अॅनिमल्स’ हे माझे शब्द मला अडचणीत आणणार हे दिसायला लागतं. श्रोता तपशिलावर एवढा भर देईल असं आधी वाटलेलं नसतं. डोळ्यावर येणारी झोप आणि प्राणीजगताचं मर्यादित ज्ञान याचा एकत्रित परिणाम होऊन मी आता तोंडाला येईल ती नावं घेऊ लागतो, “ मगर, गवा, अं...अं , तरस…अं… ”

शेवटी माझ्यावर तरस खाऊन माझी मुलगीच अजून नावं सुचवते, “अॅलीगेटर, इग्वाना, गोरिला, क्रोकोडाईल, हिप्पो, ब्लूफिश, पेंग्विन…” ,आफ्रिकेपासून अंटार्क्टिकापर्यंत आढळणारे सगळे प्राणीमात्र तिच्या कल्पनेतल्या जंगलातएकत्र रहात असतात.

“बरोब्बर! गुड जॉब!” असं मी म्हटल्यावर ती खूष होते आणि आईकडं वळून म्हणते, “ मी बाबाला अॅनिमल्स सांगितले आई, बाबा डझन्ट नो मेनी अॅनिमल्स!”

“हो ना? बाबा डझन्ट नो एनिथिंग! आपण त्याला शिकवू हां? ” त्या पेंगुळलेल्या अवस्थेतही आयत्या समोर आलेल्या हाफव्हॉलीवर सिक्सर मारण्याची संधी सोडेल ती बायको कसली!

आम्ही पुन्हा आमच्या गोष्टीकडे वळतो. आता त्या आनंदी जंगलात खलनायकाची एंट्री व्हायला हवी. दुष्ट, क्रूर, अक्राळविक्राळ खलनायक. तो येताच सगळ्यांचा थरकाप उडाला पाहिजे.

“त्या जंगलात एके दिवशी एक लायन आला. बिग, स्केरी लायन, आणि तो जंगलाच्या मध्यभागी जाऊन मोठ्यानं ओरडला, “ व्हॉssssव, सगळ्या अॅनिमल्सनी इकडे या. मला तुमच्याशी बोलायचं आहे. “ त्याचा आवाज ऐकून जंगलातले सगळे अॅनिमल्स घाबरले आणि थरथर कापत तिथं आले.”

“बट लायन इज नॉट स्केरी बाबा, लायन इज फनी!” श्रोत्याची एकदम अनपेक्षित प्रतिक्रिया येते.

मला प्रॉब्लेम लक्षात येतो. खलनायकाच्या खलप्रवृत्तीशी अजून तिचा परिचयच झालेला नाही. तिच्या खेळण्यातल्या लॅपटॉपमध्ये एक लायन आहे, पण तो नुसताच मजेत डरकाळी फोडून मान हलवतो आणि ते बघून ती खदाखदा हसते. त्यामुळं लायन भीतीदायक असू शकतो हे तिच्या गावीच नाही. पण मी सिंहाची व्यक्तिरेखा (की प्राणिरेखा?)

श्रोत्याला पटेल अशी रंगवण्याच्या भानगडीत वगैरे न पडता अनेक हिंदी चित्रपटाच्या कथालेखकांना स्मरून कथातशीच पुढं रेटतो.

“हो बाळा, पण हा लायन होता ना, तो खूप खूप स्केरी होता. त्यानं सगळ्यांना सांगितलं, ‘ आय अॅम युवर किंग. आणि उद्यापासून मी दररोज एका अॅनिमलला खाणार. तेव्हा दररोज एकानं माझ्या घरी यायचं. आणि जर माझं तुम्ही नाही ऐकलं, तर मी एकदम तुम्हा सगळ्यांनाच खाणार! व्हॉssssव…”,आणि तो लायन तिथून निघून गेला.

मग सगळे अॅनिमल्स म्हणाले, “काय करायचं? आपल्याला लायनचं ऐकलं पाहिजे. ही इज टू स्ट्रॉंग. त्याचं नाही ऐकलं तर तो आपल्या सगळ्यांनाच खाऊन टाकेल.”

“मग अॅनिमल्सनी काय केलं?” श्रोता आता गोष्टीत गुंतलेला असतो.

“सांगतो. त्या अॅनिमल्समध्ये एक रॅबिट होता. पांढरा-पांढरा, छोटा-छोटा. तो म्हणाला, “ आय हॅव अॅन आयडिया! उद्या लायनकडे मी जातो.”

“मग दुसऱ्या दिवशी रॅबिट काय करतो, तो लायनच्या घरी मुद्दाम खूप लेट जातो. लायन त्याची वाट बघत असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. ही इज व्हेरी अँग्री!”

“आई सारखा?” तिच्या आईला भूक अजिबात सहन होत नाही असं मी नेहमी चिडवत असतो, ते तिला आठवतं.

मघाचा वचपा काढायची मला माफक संधी मिळते म्हणून मी लगेच ‘हो अगदी आईसारखा!’ असं म्हणतो. पलीकडं झोपलेली आई सोयीस्कररीत्या आमच्याकडं दुर्लक्ष करते.

“रॅबिट म्हणतो, ‘आय अॅम सॉरी लायन. पण मी तुमच्याकडे यायला निघालो आणि मला वाटेत दुसरा लायन भेटला’.

तो म्हणाला, ‘आय अॅम युवर किंग आणि मी तुला खाणार’. मी म्हणालो, ‘आमचा किंग तर वेगळा आहे’. मग तो लायन खूप चिडला आणि म्हणाला, ‘घेऊन ये त्याला माझ्याकडं!’”

“हे ऐकून हा लायन अजून चिडतो आणि रॅबिटला म्हणतो, ‘दाखव मला कुठं आहे तो!’ मग रॅबिट त्याला घेऊन जातो एका मोठ्या वेलकडं. त्या वेलच्या काठाशी उभा राहून रॅबिट म्हणतो, ‘मिस्टर लायन, दुसरा लायन या वेलमध्ये आहे. तुम्ही इकडं येऊन बघा!’. लायन येऊन बघतो तर त्याला पाण्यात कोण दिसतं?”

“लायन!”

“बरोब्बर! पण त्याला वाटतं की हा दुसराच लायन आहे. म्हणून तो जोरानं ओरडतो, “व्हॉssssव…” तर पाण्यातला लायन पण ओरडतो. मग हा लायन खूप रागावतो आणि वेलमध्ये जंप करतो.”

ती अचानक माझ्या जवळ येऊन माझा हात घट्ट पकडते आणि रडवेल्या आवाजात म्हणते, “ इज लायन ओके? वेलमध्ये जंप केल्यावर त्याला बू बू होतो?”

अरेच्या! पुन्हा प्रॉब्लेम झाला. सिंहाची कॅरॅक्टर सिम्पथी खाऊन जायला लागली. तो या गोष्टीतला व्हिलन आहे हे आपण श्रोत्याच्या मनावर ठसवूच शकलो नाही. मूळ गोष्टीमध्ये सिंह विहिरीत पडून मेला असणार, पण आता इथं सिंहाला मारून उपयोग नाही. नाहीतर श्रोता रडून गोंधळ घालेल.

“वेलमध्ये पडल्यावर लायन जोरात ओरडतो, ‘हेल्प, हेल्प!’, कारण त्याला त्याच्या आईनं शिकवलेलं असतं, ‘इफ यू आर इन ट्रबल, कॉल फॉर हेल्प’. मग रॅबिट एक मोठा रोप खाली फेकतो, आणि लायन त्या रोपला धरून हळूहळू वर येतो!”

“डझ ही फील कोल्ड? रॅबिट त्याला टॉवेल देतो?” तिला स्वतःची आंघोळ आठवते.

“हो. आणि मग लायन म्हणतो, ‘आय अॅम सॉरी, रॅबिट. मी इथून पुढं कुठल्याच अॅनिमलला त्रास देणार नाही. मी कुणाला खाणार नाही. ‘ आणि मग लायन आणि रॅबिट एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होतात. “

काही क्षण शांततेत जातात. मला वाटतं, ‘चला, गोष्ट संपली.’ पण मग अंधारातून प्रश्न येतो, “ मग लायन काय खातो?”

प्रश्न तर बरोबर आहे. सिंहाला भूक लागली होती, मग त्यानं काय खाल्लं? कुठल्या अॅनिमलला खाणार नाही असंवेड्यासारखं सांगून बसला तो, आता त्याला काय खायला द्यायचं? मी विचारात पडतो.

पण तीच प्रश्न सोडवते. “रॅबिट आणि लायन बेस्ट फ्रेंड्स झाले ना? मग रॅबिट त्याच्याकडचं कॅरट आणि डिप लायन बरोबर शेअर करतो. “

गुड! हे सोल्यूशन प्राणीशास्त्राच्या दृष्टीनं चुकीचं असलं तरी आत्ता गोष्ट संपवण्यापुरतं चांगलं आहे!

मी म्हणतो, “ बरोब्बर! कारण रॅबिटला माहीत असतं- शेअरिंग इज….?”

“केअरिंग!” ती म्हणते.

असं एक अनपेक्षित समतावादी वळण घेऊन आमची गोष्ट संपते. माझी मुलगी तिच्या ब्लँकेटमध्ये शिरते. तिच्या निरागस जगातले सगळे प्रश्न आता सुटलेले असतात.

मी झोपायच्या आधी सहज सेलफोनवर एक न्यूज अॅप उघडतो. त्यात आमच्या जगातल्या बातम्या असतात. हे जग आम्हाला कधी ना कधी तिच्याच हवाली करायचं असतं. पण एखाद्या मिनिटाच्या पुढं मला त्या बातम्या वाचाव्याशा वाटत नाहीत. मी सेलफोन बाजूला ठेवून देतो. शेजारी ती आईबाबांच्या मध्ये निर्धास्तपणे झोपलेली असते.

मी मात्र नंतर बराच वेळ जागा असतो.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>