एकांत असा हवा...आपले अस्तित्व शोधून देणारा.....
सारांश-गायत्री मुळे
एका विशीष्ठ वळणावर विचार करायची वेळ येतेच. आता तिच्या आयुष्यात ती आली होती. नेमके काय करावे? चार तुकड्यात विभागलेले आयुष्य. चार दिशाना जाणारे.
पहिली ती
दुसरा सार्थ
तिसरा नवरा
चौथा सारांश
ह्या चौकोनात भरडून निघायचे की एकच कोन स्विकारून आपल्याच आपल्यात मिसळून जावे हे तिला आजकाल समजत नव्हते.
सतत तुलना मनात. प्रेम कुणावर खरे हे कळत नव्हते. प्रेम हे खरे किंव्हा खोटे असू शकेल? प्रेम एकतर असेल किंव्हा नसेल. आज जिथे येवून थांबली होती तिथून दोन फाटे फुटत होते. एक भुतकाळात नेणारा आणि एक पुढे जाणारा. तिच्या सोबत तिचा आजचा काळ चालतच होता. धावत होता. नवऱ्याची गती तिला गाठता येत नव्हती. दमछाक होत होती. अपेक्षांचे ओझे कणाकणाने वाढतच चालले होते.
"तू अशी तू तशी" ह्या मधे तिला तिचा स्वत:चा विसर पडायला लागला होता. खरच मी कशी? माझी मला ओळख कुठे सापडणार? कुठे आहे अस्तित्व?
पण अस्तित्व होतेच कुठे? ते विरघळले होते आतल्या आत. सार्थ ने गिळंकृत केले होते. स्वप्नांच्या मखमली पायघड्यांवरून सार्थ सोबत चालता चालता कच्चकन पायात काही घुसले होते. आणि भळभळणारी जखम उरात घेऊन तिने नवऱ्या सोबत सप्तपदी पार केली होती. पावले कायमची जायबंदी झाले आता. जोडवी, बिरोद्या ,चाळ ह्या छूनछून वाजणाऱ्या शृंखला तिला हळूहळू आवडायला लागल्या. तिचे मन ती किणकिणाटात रमायला लागले.
आयुष्य एका क्षणी सार्थच्या हाती सोपवताना तिने होते नव्हते ते सगळे दान केले होते. जाणीवा, आपलेपण, प्रेम आणि स्वार्थ ह्या सगळ्याचे दान सार्थ कडे झाले होते. एक्दा दानात दिलेली चिजवस्तू आपण परत घेत नाही मग हे तर अवघे अस्तित्व होते. ती अस्तित्व हीन झाली आणि जखमी पावलानी विध्द मनानी संसारात प्रवेश केला.
देऊ काय आता ह्या माणसाला मी? उरले काय आहे आता जवळ? हे शरीर? ते ही पूर्ण पवित्र नाहीय. एक क्षण होती नव्हती ती सगळी हिम्मत तिने गोळा केली नवऱ्याला खरे काय ते सांगायला; पण शब्द तोकडे पडले. आणि एक सत्य कायमचे संपले. पडद्या आड गेले. एक सात्वीक मुखवटा तिने धारण केला. आदर्शवती. खूप आवडली ती सगळ्याना. तिला स्वत:ला सुध्दा तिचे ते रूप आवडत होते. पण आरश्या समोर उभी झाली की दचकायची. आरसा चार चारदा पुसायची. मग तिला तो शेर आठवायचा ...
"धूल चेहरे पर थी मै आईना साफ करता रहा"
असे मुर्दाड जगण्या पेक्षा तो बुरखा काढून टाकून एक दिवस एक मुक्त भरारी घ्यावे असे वाटायचे.
आणि एक दिवस सार्थ समोर आला. नावाप्रमाणे स्वत:चे आयुष्य त्याने सार्थ केले होते. हिने स्वत:च्या आयुष्यावर घेतलेला सूड हिचा हिला डाचायला लागला. तो खळखळून हसला की हिच्या ओठाची कड जेमतेम उलगडायची. तो घडाघडा बोलायला लागला की ही फक्त हुंकार द्यायची.
त्याच्याकडे तिने दानात दिलेले आता काहीही बाकी नव्हते किंव्हा त्या गोष्टी ज्यांच्या शिवाय तिचे आयुष्य अपूर्ण होते त्यांचे महत्व त्याच्या लेखी शून्य होते. तिला ते सगळ परत हवे होते कारण आजवर संसारात फक्त शरीर दिले होते. ते शरीर राबत होते, कष्टत होते, थकत होते, वापरू देत होते, प्रजनन करत होते. अस्तित्व नसलेल्या अस्तित्वातून नवनवे अस्तित्व जन्माला येत होते. जाणीवा, आपलेपण, प्रेम आणि स्वार्थ हे तिला सार्थकडून परत घ्यायचे होते.
"ते मला दिलेस न? आता जितकी उरली आहेस तितकी माझ्यात विरघळ आणि घेऊन जा आपले अस्तित्व परत"
सार्थच्या वाक्यांवर पावले अडखळली. थरकापत छूनछूनली. आणि तो नाद कायमचा संपेल असे तिला वाटायला लागले. नादाशिवाय आयुष्य कसे असेल? ते दान तिने परत घेतले नाही. भण्ण पोकळी सकट ते शरीर श्वासांचे ओझे ओढत ओढत चालत होते.
आणि एका क्षणी आयुष्यात 'सारांश' आला.
भेदरली, घाबरली, वेडावली आणि नादावली. ह्या आधी एकटेपणात ती स्वत:सोबत असायची. आता सारांश तिच्या विचारात वावरायला लागला आणि तिची स्वत:ची सोबत तुटली. ज्या वेळेस एकटी असायची त्या वेळेस आता ती एक भण्ण पोकळी असायची. अस्तित्वाची ओळख उगाच झाली असे वाटायला लागले. हळू हळू एकेक पाकळी उमलवत त्याने तिचे आयुष्य सुगंधी केले. आता नाद आणि सुगंध ह्यांचे जवळीकेचे नाते तिच्या रंध्रारंध्रात भिनले. वेल फक्त आसूसली होती विळखा घालायला. आणि दोन्ही बाहू पसरवून एका खुल्या आसमंतात तिला सारांशे ने नेले. जुन्या खुणा पुसत नवीन अस्तित्वाचे बिज रोवले. ती मोहोरली, घाबरली, बावरली. हळूहळू पाकळी पाकळीने तिचे निर्माल्य व्हायला लागले. आणि आता स्वत:सोबत स्वत:चे जगणे बंद झाले. एकटी आणि एकाकी. खरच कुणावर प्रेम आहे माझे?
निर्माल्याचा सुगंध विरत गेला. पण फुटका झाला तरी नाद मात्र कायम उरला होता. परत कच्चकन पायात काही रुतले आणि एक भळभळणारी जखम व्हायला लागली.. पण त्या पावलाना आता सप्तपदी चालायची नव्हती.
एकांतात सापडलेल्या अस्तित्वाचे बोट धरून ती निघाली होती आपल्या वाटेने. एक चौकोन मोडीत काढून फक्त आपल्या बिंदूपासून निघालेल्या वलयात विलीन व्हायला.