नियतीचे वर्तुल नेहमीच पूर्ण होते....
"किंमत" –अमेय पंडित
20 जून 1985
अनुराधाने पर्स घेतली, दरवाज्याला कुलूप लावले आणि इमारतीच्या खाली येऊन ती शाळेत नेणाऱ्या रिक्षाची वाट पाहू लागली. तिच्याच शाळेत जाणारी आजूबाजूची पाच मुले आणि ती यांसाठी ठरवलेली कायमची रिक्षा, मासिक भाडे आणि वेळ दोन्हीसाठी अत्यंत सोयीची होती. वयस्कर रिक्षामालक-चालक मायेचा होता. तिच्या वेळा, शाळेतील अधूनमधून उद्भवणारी जादाची कामे, जादा तास यांचे गणित बसवण्यात त्याची मोलाची मदत होत होती. असा आधार नसता तर पोटाला चिमटा घेऊन तिला झकत दुचाकी घ्यावी लागली असती पण सध्यातरी गरज नव्हती. तसाही संदीपच्या नव्या बाईकचे हप्ते संपायला थोडा वेळ होता, त्यानंतर विचार केला असता.
तीन वर्षांपूर्वी तिचे संदीपशी लग्न झाले होते. खरेतर संदीपचा छोटासा कारखाना तेव्हा नुकताच सुरू झाला होता. त्याचा जम बसायचाच होता पण घरचे बरे दिसले आणि माणसे भली वाटली म्हणून तिने आईबाबांचे म्हणणे फारशी किरकिर न करता ऐकून टाकले होते. सुदैवाने संदीपचा उमदा स्वभाव, गावाकडून कधीमधी शहरात येणारे आणि तिचे कौतुक करणारे सासू सासरे यामुळे तिला लवकर करायला लागलेल्या लग्नाबद्दल पश्चात्ताप करायची वेळ आली नव्हती. नात्यात प्रेम कधी निर्माण झाले कळले नव्हते. कारखान्याचे आर्थिक ताण सोडले तर बाकी तशी काही विवंचना नव्हती. गेले काही महिने संदीप कारखान्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठीची जमीन, सरकारी मंजुऱ्या, बांधकाम यांतच तो अष्टौप्रहर गुंतलेला असे. मात्र क्षमता वाढल्यावर अनेक चांगल्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता होती, किंबहुना एका दोन ठिकाणी भविष्यकालीन चाचपणी करूनच त्याने हे धाडसी पाऊल उचलले होते.
तिची नोकरीही अतिशय आवडती होती. शाळा नवीन आणि अजून चौथीपर्यँतच असली तरी संस्था भक्कम होती. एका जुन्या संस्थानिकाच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील सुनेने सुरु केलेली शाळा शिक्षणाच्या दर्जामुळे अल्पावधीत नावाला आली होती. तिच्यापेक्षा पाच सहाच वर्षे मोठी असलेल्या त्या संस्थाचालक बाईंचा झपाटा पाहून अनुराधा दिपून जाई. म्हणूनच उत्तम प्रकारे शिकवून शाळेच्या उभारणीत हातभार लावण्याचे काम ती निष्ठेने करत होती. या वर्षीपासून तिला चौथीच्या वर्गाची जबाबदारी दिलेली होती आणि तिची जास्तीची शैक्षणिक पात्रता पाहून पुढच्या वर्षी चालू होणाऱ्या पाचवीचाही भार तिच्याच खांद्यावर येणार आहे असे सूतोवाच वरिष्ठांनी मागच्या बैठकीत केले होते.
अशा विचारातच ती शाळेत येऊन पोचली आणि नेहमीच्या कामात गढून गेली. आज दुपारनंतर पालकसभा होती, त्याचीही तयारी करायची होती. बहुतेक पालकमंडळी म्हणजे शहरातील बडी धेंडे होती. नवीन इमारतीसाठी देणगीचे आवाहन, सरकारी मंजुरी लवकर मिळावी म्हणून काही उच्चपदस्थांना विनंती असा आराखडा करून तो संस्थाप्रमुखांना दाखवायची ती तयारी करू लागली.
दुपारचा डबा घाईने खाऊन ती सभेच्या जागी पोचली आणि बैठकीची व्यवस्था, ध्वनिसंयोजन वगैरेची आस्थेने पाहणी करू लागली. सर्व काही नीट जमले आहे हे पाहून थोडावेळ तिथेच एका खुर्चीवर विसावली असताना तिला सभागृहाच्या दारातून एका चौथीच्या मुलाचे पालक महादेव मिसाळ आत येताना दिसले.
महादेव मिसाळ म्हणजे मोठी असामी होती. पंचेचाळीशीत असलेल्या मिसाळांचे अनेक उद्योग होते. दोन कारखाने, पेट्रोल व्यवसाय, सहकारी क्षेत्र अशा अनेकविध जागी सहभाग असल्याने जनसंपर्क दांडगा होता. राजकारणात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अनेक नेत्यांशी उठबस होती. शहराबाहेर हिरव्यागर्द बागेत असणारा त्यांचा बंगला हा अनेक गुप्त मसलतींची जागा आहे असा प्रवाद होता.
चौथीतला संदेश हा मिसाळांचा सर्वात लहान अपत्य. तीन मुलींनंतर झालेला आणि अर्थातच लाडात वाढलेला, पण मजा म्हणजे संदेश मिसाळांच्या अगदी उलट एकदम सौम्य आणि काहीशा बुजऱ्या स्वभावाचा होता. अभ्यासात हुशार होता त्यामुळे अनुराधाचा आवडता होता. यावर्षी स्कॉलरशिप मिळवू शकणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांत संदेशचे नाव अग्रभागी होते.
अधूनमधून संदेशसोबत शाळेत किंवा वर्गात येणाऱ्या मिसाळांशी बोलताना मात्र अनुराधाला अनामिक दडपण येत असे. मिसाळांची नजर आपला आरपार वेध घेत आहे अशी विचित्र भावना तिच्या मनी येत असे. तसे काही वावगे कधीच वागले नव्हते तरीही ते आपल्याला सदैव जोखत आहेत असेच तिला वाटत असे. संदेशचा अभ्यास, शाळेतील उपक्रम याबाबतीत त्यांच्याशी जुजबी बोलताना देखील तिला सूक्ष्म कंप फुटून जाई.
आजही सर्वात आधी मिसाळ आलेले पाहून तिची धडधड वाढली.
"नमस्ते बाई! काय म्हनालाय आमचा संदेश आणि त्याचा अब्यास?", मिसाळांनी मंद हसत तिला प्रश्न केला.
"उत्तम, स्कॉलरशिपची तयारी सुरू केलेली माहीतच असेल तुम्हाला" तिने आवाज शक्य तितका स्थिर ठेवत उत्तर दिले.
"व्हय, त्ये ठाऊक हाय पन खरं सांगू का बाई, आमाला ह्ये अब्यासातलं काय सुदीक कळत न्हाय बगा. पोरगं काय बाय सांगत असतंय आनी आमी हो ला हो करतोय. त्ये डिपार्मेन्ट आमी होम मिनिष्टरिकडं सोपिवलंय, हा हा हा!", स्वतःच्याच विनोदावर खूष होत मिसाळ हसले. तिनेही कसनुसे हसू आणण्याचा प्रयत्न केला. तितक्यात मिसाळांना दुसऱ्या एका पालकाने रामराम घातला आणि ते तिकडे वळले. जाताना पुन्हा थांबून ते वळले आणि तिच्याकडे रोखून बघत म्हणाले, "पन एक गोस्ट खरी बाई. आमाला साळंत संदेशवानी बाई असत्या तर आमीबी चार बुकं जास्त शिकलो असतो. संदेश आनी त्याची आई लय खूष हाय तुमच्यावर. पोरगं तुमाला लई मानतंय, लक्ष ठ्येवा बरं!".
अचानक केलेल्या या थेट स्तुतीने तिला काहीसे बरे वाटले पण करणारे मिसाळ आहेत म्हणून ती गांगरूनही गेली. पुढची काही मिनिटे ती बाकी पालकांशी बोलण्यात मग्न झाली पण मिसाळ आपल्यावर नजर रोखून आहेत असा भास तिला कायम होत राहिला.
सभेला सुरुवात करणार इतक्यात दरवाज्यातून क्लार्कबाई चव्हाण तिला पळत येताना दिसल्या. त्या तडक तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या," अनुराधा मॅडम, अहो ऑफिसात आताच साई हॉस्पिटलमधून फोन आला. तुमच्या मिस्टरांना अपघात झाला आणि तिथे भरती केले आहे असे ती फोनवरची बाई सांगत होती. तुम्हाला लवकर बोलावले आहे."
या श्रमानेही चव्हाणबाईंना धाप लागली आणि त्यांचा चेहरा लालबुंद झाला.
अनुराधा मटकन खाली बसली. आजूबाजूची माणसे तिच्याजवळ आली आणि तिच्याशी, चव्हाणांशी काही बाही बोलू लागली. तिला काही सुधरत नव्हते. गलका ऐकून संस्थाप्रमुख तिच्याजवळ आल्या. पालकांना शांत करत त्यांनी इतर शिक्षकांना सूचना दिल्या आणि त्या अनुराधाला सभागृहाबाहेर काढून ऑफिसकडे घेऊन गेल्या.
ऑफिसमध्ये जाऊन सहायकाद्वारे त्यांनी हॉस्पिटलला फोन करवत बातमी खरी असल्याची खात्री केली. समोर बसून घळाघळा रडणाऱ्या अनुराधाजवळ येत आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या," अनुराधा, बातमी दुर्दैवाने खरी आहे. शाळेची गाडी येतेय, लगेच हॉस्पिटलकडे निघ. शेळकेबाई आणि कुंभारसर तुझ्याबरोबर येतील. तुझे मिस्टर गंभीर आहेत पण स्टेबल आहेत. रडे आवर, तुला स्थिर राहावे लागेल आता. काही लागले-सवरले तर कुंभारांना लगेच फोन करायला सांग. बी स्ट्रॉंग."
हॉस्पिटलपर्यंतचा वीसेक मिनिटांचा प्रवास असह्य होता. धक्का बसलेले मन सतत हे खरे नाही असा आक्रोश करत होते तर बुद्धी पुढचा विचार करत होती. अनुराधाला भयंकर शिणून गेल्यासारखे झाले. आवरायचा प्रयत्न करूनही तिला राहून राहून हुंदके फुटत होते.
हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर कुंभारांनी योग्य चौकशी करून माहिती मिळवली आणि तिला आय सी यू कडे नेले. दरवाजाबाहेर तिच्याच इमारतीत राहणारे निवृत्त शिक्षक प्रधान आणि त्यांच्या पत्नी पाहून तिला आणखी एक धक्का बसला.
"अनुराधा, बरे झाले तू आलीस. अगं देवाची कृपा म्हणून ह्यांनी अपघात बघितला. पुढची धावपळ त्यांनीच केलीय. वेगात चौक पार करत असताना चिखलावर गाडी घसरली बघ संदीपची. पाठीला मार लागलाय बराच. अगं अर्धा पाऊणतास प्रयत्न केल्यावर तुझ्या शाळेचा फोन लागला", प्रधानांची पत्नी तिला घाबऱ्या घाबऱ्या सांगू लागली. ती आणखी पुढे बोलणार इतक्यात प्रधानांनी तिला थोपवले आणि ते अनुराधाला घेऊन आय सी यूच्या दाराजवळ आले. तेथील नर्सशी बोलत त्यांनी तिला खोलीत नेले.
समोर बेडवर निश्चल पडलेला देह म्हणजेच संदीप हे समजून घ्यायला तिला त्रास झाला. सकाळी हसत निरोप घेऊन गडबडीत गेलेला संदीप आणि हा अचल, असहाय्य वाटणारा संदीप यात काहीच साम्य नव्हते. तिला चक्कर आल्यासारखे वाटून तिने प्रधानांचा आधार घेतला. तिला रडण्याचा जोरदार उमाळा येणार आहे हे ओळखून प्रधानांनी तिला खोलीबाहेर काढून लांबच्या एका बाकावर बसवले. शेळकेबाई आणि प्रधानांच्या पत्नी तिच्या आजूबाजूला बसल्या.
किती वेळ झाला कोण जाणे पण कढ थांबवत ती थोडी शांत झाली तेव्हा कुंभार घाईत तिच्याकडेच येत होते. "अनुराधा मॅडम, डॉक्टर येत आहेत पाच मिनिटांत. तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या शेजाऱ्यांनी गावी फोन केलाय आणि तुमचे सासू सासरे लगेच निघतो म्हणालेत. चार पाच तासात पोचतील. बाकी आपल्या संस्थाप्रमुख बाईंनी त्यांच्या ओळखीने पोलीस आणि बाकीच्या प्रशासकीय बाबी मॅनेज केल्यात फक्त तुम्हाला काही कागदपत्रे भरून द्यावी लागतील थोड्या वेळाने."
तिने ते सर्व ऐकले पण त्यातले किती आत गेले कोण जाणे. सासू सासरे निघालेत हे कळून मात्र तिला जरा आधार वाटला.
काही वेळाने डॉक्टर आणि दोन नर्स कॉरिडॉरमधून येताना दिसले. डॉक्टरांनी नर्सला काही सूचना दिल्या आणि ते अनुराधाकडे आले.
" मिसेस धाक्रस? नमस्कार मी डॉ. कोठारी. तुमच्या पतीवर सध्या मी उपचार करतो आहे. आपली हरकत नसेल तर केबिनमध्ये जाऊन बोलता येईल." डॉक्टरांना कडू वाईट बातम्या सौम्य पण रोखठोकपणे लोकांना सांगायची सवय असावी असा त्यांचा आवाज होता.
केबिनमध्ये आल्यावर डॉक्टरांनी तिला खुर्चीवर बसवले आणि स्वतःचे हात जुळवत पुढे बोलायला सुरुवात केली, "वी आर लकी, पेशंटच्या मणक्याला चांगलीच दुखापत झालीय पण सुदैवाने नेक इंजुरी इज नॉट सिरीयस. उचलून बाजूला ठेवणाऱ्या लोकांनी नीट इमोबिलायझेशन न करूनही फारसे नुकसान झालेले नाही, बट आयाम अफ्रेड बेसिक इंजुरी इज सिरीयस अँड वी हॅव टू ऑपरेट विदीन नेक्स्ट 8-12 आवर्स. सूनर द बेटर! काहीकाळ पेशंट स्पायनल शॉकमध्ये राहील पण रिकव्हरी होईल अशी माझी प्राथमिक रिपोर्ट्स पाहून खात्री आहे. इट कुड हॅव बीन वर्स.
अर्थातच खर्च आहे पण सुदैवाने आमच्या हॉस्पिटलचे टॉप सर्जन डॉ तळवलकर दोन दिवसांपूर्वीच यु एसहून परत आलेत आणि ही इज अव्हेलेबल.
खर्चाची तजवीज लौकर करा, इतकेच मी सांगेन. आगाऊ रक्कम आणि बाकी कागदपत्रे लवकर जमा करा तोवर मी बाकी तयारीच्या सूचना देतो".
संभाव्य खर्चाचा आकडा ऐकून तिला धास्तीच वाटली. खायप्यायची ददात नसली तरी संदीपचा वैयक्तिक बँक बॅलन्स किरकोळच होता. आर्थिक व्यवहारांची सखोल जाण नसली तरी खेळते भांडवल आणि कारखानावाढीमुळे सध्यातरी खात्यावर रोख रक्कम फारशी नाही इतके ज्ञान तिला नक्कीच होते. तिच्या वैयक्तिक खात्यात जपलेली काही शिल्लक होती पण ती फार तर आगाऊ रक्कम म्हणून पुरेशी पडली असती.
सासू सासरे पोचेपर्यंत आपल्याला निर्णय टाळता येणार नाही हे तिला उमगले. तशी त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. निवृत्त जीवन जगणारे सासरे सामान्य पेन्शनरच होते.
पैशासाठी कोणाकडे जावे तिला सुचत नव्हते. संध्याकाळ होत होती. यावेळी बँका वगैरे उघड्या मिळणे मुश्किल झाले असते. संदीपच्या दोन तीन मित्रांचे नंबर्सही घरी डायरीत होते. त्यांच्याशी बोलायचे तर घरी जाणे भाग होते.
बराच उलटसुलट विचार करून तिने संस्थाप्रमुख बाईंनाच फोन करण्याचा निर्णय घेतला. शेळकेबाईंना सोबत घेत ती फोन करण्यासाठी रिसेप्शनकडे निघाली.
जिना उतरणार तेवढ्यात तिला स्वतः मिसाळ जिना चढताना दिसले. त्यांच्यासोबत एक नाजूक खानदानी बाई होती आणि थोडा मागे एक सांवळा तरतरीत तरुणही होता.
अचानक मिसाळ कसे समोर आले तिला काही कळेना पण मग तिला काही तासांपूर्वीचे बोलणे, पालकसभा वगैरे आठवले. इथे मिसाळ कशाला आले ह्याचा मात्र काही अंदाज लागेना.
पुन्हा जिना चढून ती वर आली. बाकाजवळ तिला आणि मागे मिसाळांना पाहून कुंभार आणि प्रधान उभे राहिले. मिसाळांनी त्यांना काही खूण केली. ते तिथून निघून दुसरीकडे गेले. जवळ कोणी नाही हे पाहून मिसाळांनी तिला बसण्याचा निर्देश केला. सोबतच्या बाई तिच्याजवळ बसल्या. मिसाळ समोरच्या बाकावर बसले आणि तो तरुण थोडा लांब पण संभाषणाच्या अंतरावर असा उभा राहिला.
"मॅडम या रजनी, आमच्या होम मिनिष्टर म्हणजेच संदेशच्या मातोश्री. आमी सबेला आल्तो तेव्हा या सुदीक होत्या गाडीत बाहेर. बातमी कळल्यावर जिवाला थार लागून दिईनात म्हून घ्युन आलूया."
अनुराधाने रजनीकडे नीट पाहिले. खरेच की! संदेश अगदी आईच्या तोंडवळ्याचा होता. एरवी ती सैरभैर नसती तर ओळख करूनच द्यावी लागली नसती, इतके साम्य होते. रजनीने किंचित हसून अनुराधाचा हात हाती घेऊन थोपटला पण काही बोलली नाही.
"बरं ते असो", घसा साफ करत मिसाळ पुढे बोलू लागले,
"बाई , चांगल्या हॉस्पिटलात भरती झालेत तुमचे यजमान. तशी वळख हाय आमची, तुमास्नी खबर आसंल नसंल. नव्या यमायडीशीत आमच्या साडूभावाचाबी प्लान्ट हाय. तिथेच भेट्लोय आमी दोन तीनदा बिजनेससाठी" ही माहिती अनुराधाला सर्वस्वी नवी होती. "संदीप या मिसाळांना ओळखतो? त्यांच्याशी बिझनेस मिटींग चालू होत्या?", तिला कशी प्रतिक्रिया द्यावी समजेना.
"मॅडम, हॉस्पिटलचे ट्रस्टी आमच्या बैठकीतले हैत. त्यांना मी डॉक्टरांशी बोलाय लावलंय मघाशी. तुमी खर्चाची, याडमिशन नायतर पोलीस कशाची चिंता करू नका. हा आमचा सदाशिव तुमच्यासंगट राहील. तुमी बिनघोर ऱ्हावा. काय रजनीदेवी, तुमी काय म्हनताय, तुमी सांगितलासा तसंच हुतंय ना समदं?"
रजनीने स्थिर नजरेने तिच्याकडे पाहिले. बोलायची, विशेषतः पतीपुढे बोलायची फारशी सवय नसल्यासारखा नाजूक आवाज काढत ती म्हणाली," मॅडम, खरंय. चिंता करू नका. आमच्या संदेशचे दैवत आहात तुम्ही. मी बऱ्याचदा शाळेत येते पण उतरत नाही. तुम्हाला मुलांशी, पालकांशी बोलताना पाहिलंय. फार प्रसन्न वावर आहे तुमचा. सगळे नीट होईल, आम्ही आहोत." रजनीचा स्वर नाजूक असला तरी आवाज ठाम होता. बोलीत अजिबात हेल नव्हता. व्यक्तित्वातून एक खानदानी आब जाणवत होता. मिसाळ निघून गेल्यावरही बराच वेळ अनुराधा रजनीचा, मिसाळांचा आणि ते करत असलेल्या डोंगराएवढ्या उपकारांचा सुन्न होऊन विचार करत बसली होती.
02 जून 1993 (आठ वर्षांनंतर)
अनुराधाने बंगल्याबाहेर येत ड्रायव्हरला बोलावले आणि दार उघडत ती गाडीत बसली. गाडी शाळेच्या दिशेने धावू लागली आणि तिने सीटवर क्षणभर मान टेकली. मागची काही वर्षे कशी गेली कळले नव्हते. संदीप अपघातातून पूर्णतः बरा झाला होता. कारखान्याची उत्तरोत्तर भरभराट होत होती. तिचीही शाळेची मुख्याध्यापिका होण्यापर्यंत प्रगती झाली होती. मागील वर्षी पहिल्यांदाच दहावीची बॅच बाहेर पडून संदेशसकट तीन आणखी विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने तिच्या आणि शाळेच्या लौकिकात भर पडली होती.
मुख्य म्हणजे हॉस्पिटलमधील प्रसंगानंतर मिसाळ कधीही भेटले नव्हते. त्यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग वाढल्याने ते आता शाळेत अजिबात येत नव्हते. कधीमधी वर्तमानपत्रांत त्यांचे नाव वाचायला मिळत होते तेवढेच. संदेशच्या पारितोषिक वितरणासही ते उपस्थित नव्हते.
गाडी थांबल्यावर तिला शाळेत पोचल्याची जाणीव झाली. शाळा सुरू व्हायला आठवडाभर होता पण कार्यालयीन कामे चालू झाली होती. पर्यवेक्षकांना वार्षिक वेळापत्रक करायच्या दृष्टीने सूचना देऊन ती पत्रव्यवहार तपासण्यासाठी ऑफिसात आली. ग्लासभर पाणी पीत ती थोडावेळ काम करू लागली इतक्यात दारात शिपाई घोटाळत असलेला दिसला.
"निकम, काय झाले? काही काम आहे का?"
"मॅडम तुम्हाला संदेशबाबा भेटायला आल्यात, आत यू का विचारायलेत".
शिपाई बाजूला होताच तिला दारात संदेशचा हसरा चेहरा दिसला. मागील वर्षीच्या पारितोषिक वितरणानंतर ती संदेशला प्रथमच भेटत होती. संदेश आता चांगला उंचापुरा झाला होता. हलके मिसरुड फुटत होते, खांदे रुंद होत होते. हसू मात्र तसेच निर्व्याज होते.
"अरे संदेश, ये ये. ज्युनियर कॉलेजात जाऊन शाळेला विसरलास हं, नवीन मित्र-मैत्रिणी मिळालेल्या दिसतात", मैत्रिणी शब्दावर जोर देत ती लटक्या रागाने म्हणाली. लाजत संदेश आत आला. टेबलाच्या बाजूने येत तिच्या पायाला हात लावून नमस्कार करून तो समोर उभा राहिला.
"अरे असू दे. मोठा झालास रे तू, आता असा नमस्कार नाही केला तरी चालेल बरे! बस ना, आज कशी आठवण आली या गरीब बाईची?"
संदेश थोडा चाचरत म्हणाला," बाई, पपांनी नवी गाडी घेतलीय मला. मेरीटमध्ये आलो म्हणून. इंपोर्टेड आहे, कस्टममधून सोडवायला थोडा वेळ लागला. बाई, कॉलेजमध्ये आय आय टीचे कोचिंग सुरू झाले आहे. घरून दोन तीनदा यावे जावे लागते. ड्रायव्हरशी टायमिंग जुळवताना कंटाळा येतो, म्हणून माझीच गाडी हवी होती मला. लायसन्स काढायचे आहे, पण एक वर्ष कमी पडतंय. पपा म्हणत होते तुम्ही शाळेतून दाखला दिला असता तर....", पुढे बोलायची संदेशला लाज वाटली कदाचित. तो वाक्य अर्ध्यावर तोडत तिच्याकडे बघत बसला.
तिला त्याची मागणी कळली. विचित्र मामला होता. मुख्याध्यापक म्हणून तिच्या सहीचा शाळेचा जन्मदाखला चालला असता खरे पण सरळ खोटे कागद द्यायचे कसे? बरं नकारही देण्यासारखा नव्हता. समोरचा विद्यार्थी तिचा आवडता तसेच मिसाळांचा मुलगा होता. नाही म्हणले तर मिसाळ कदाचित फोन करतील, भेटतीलसुद्धा आणि त्यांनी जुन्या उपकाराची आठवण करून दिली असती तर? संदीपने मिसाळ नको म्हणत असतानाही नंतर उपचारावर खर्च झालेले पैसे परत केले होतेच पण म्हणून काय मदतीचे महत्त्व संपत नव्हते. मोठ्या पेचात सापडल्यासारखे होऊन तिला घुसमट वाटू लागली.
"हे बघ संदेश, असा खोटा दाखला द्यायचा म्हणजे जरा अवघड वाटते आहे", ती थोड्या ठाम स्वरात म्हणाली.
"बाई फक्त एखाद्या वर्षाचाच प्रश्न आहे. मला नीट गाडी चालवता येते. मी तुम्हाला चालवून दाखवू का? बाहेरच आहे गाडी. आता ड्रायव्हर आहे सोबत, आणि हो तुम्हाला एक मजा दाखवायची आहे. बाहेर या ना प्लीज"
संदेशने आर्जवाने तिला बाहेर मैदानात नेले. गाडी छोटीशी पण ऐटबाज होती. संदेश तिला गाडीच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. कोऱ्या नंबरप्लेटवर अजून नंबर नव्हता पण Carpe diem अशी अक्षरे रेखीवपणे कोरली होती.
"आठवतंय का बाई? रॉबिन विल्यम्सचा डेड पोएट्स सोसायटी सिनेमा! दहावीची पूर्वपरीक्षा झाल्यावर तुम्ही दाखवला होतात शाळेतच, आणि समजावूनही सांगितला होतात. मी तेव्हापासून ठरवलं होतं, गाडी घेईन तेव्हा नंबरप्लेटवर हेच लिहिणार. स्पेशल नंबरसाठीही अर्ज केलाय आर टी ओ मध्ये, काही दिवसांत मिळेल. तुम्ही नसता तर असा काही सिनेमा आहे हे कळलं पण नसतं. इंग्रजी सिनेमांची भीती गेली तेव्हापासून."
आपण शिकवलेले त्याने किती लक्षात ठेवले आहे ते पाहून तिला त्याचे अपार कौतुक दाटून आले. विद्यार्थी असावा तर असा! हीच तर शिक्षकाची खरी मिळकत. काही विचार करत ती म्हणाली," संदेश तू चांगला मुलगा आहेस आणि दुरुपयोग करणार नाहीस हे ठाऊक असल्याने मी नियम मोडून तुला दाखला देतेय. तोंडघशी पाडू नकोस बाबा. ऑफिसात चल, मी चव्हाणबाईंना दाखला बनवायला सांगते." संदेशच्या ओठांवर फुललेले हसू बघून तिला आणखी प्रसन्न वाटले.
20 जून 1993 (अठरा दिवसांनंतर)
पडदा किलकिला होऊन कोवळ्या प्रकाशाची तिरीप आत आली आणि अनुराधाला जाग आली. रविवार...आह्ह....संपूर्ण दिवस सुट्टी. तिला सुट्टीची सकाळ खूप आवडायची. संदीप थोडा उशीराच उठणारा पण तिला हा तासभर एकटीसाठी हवासा वाटे. एरवीसारखी घाई नाही, रमतगमत आवरून कपभर स्ट्रॉंग चहा घेत बागेतील झोपाळ्यावर बसायला मजा यायची.
आज पावसाने उघडीप दिली होती. गार वारे वाहत होते. तिची बाग टवटवीत दिसत होती. वाफाळता चहाचा कप हातात खेळवत तिने दरवाजा उघडला. दारात वर्तमानपत्राच्या रविवार आवृत्त्या येऊन पडल्या होत्या.
जामानिमा करत झोपाळ्यावर बसून तिने स्थानिक वृत्तपत्राचे पान उघडले. चहाचे घुटके घेत आतल्या पानावर नजर टाकताना तिला ती बातमी दिसली.
" भर पावसात जकात नाक्याजवळ गाडीने सायकलस्वाराला उडवले. चालक गाडीसह फरार. घटनास्थळी केवळ कोरी नंबरप्लेट सापडली. Carpe diem अशी अक्षरे कोरलेल्या नंबरप्लेटबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. कोणाला अपघाताविषयी माहिती असल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन." बातमीसोबत सायकलस्वाराच्या विच्छिन्न मृतदेहाचे छायाचित्रही होते.
तिला भडभडून आले. बाथरूममध्ये धावून स्वतःला साफ करतानाही तिच्या डोळ्यासमोर ते छायाचित्र नाचत होते. आपल्यामुळेच हा अपघात-नव्हे ही हत्या-घडून आली आहे ही बोच तिला टोचू लागली. संदीप अजून झोपलेलाच होता. तिला भयंकर एकाकी वाटू लागले. मेलेल्या माणसाचा भेसूर चेहरा तिला वाकुल्या दाखवू लागला.
ताठर शरीराने ती विचार करू लागली. आपल्याला याबद्दल पोलिसांना कळवले पाहिजे, ते आपले कर्तव्यच आहे. अन्यथा आपल्याला कोणाही विद्यार्थ्याला नीति शिकवण्याचा अधिकार उरणार नाही. एक जीव बळी गेलाय, त्यापुढे कसलीच किंमत नाही. संदेश असो, मिसाळ असो वा इतर काही, आत्ताच्या आत्ता संदीपला उठवून सगळा प्रकार सांगायचा आणि तडक पोलिसांत जायचे,बस्स! तावातावाने ती बेडरूममध्ये आली. संदीप चेहऱ्यावर लहान मुलाचे निरागस भाव लेऊन झोपला होता. बेडशेजारील घड्याळात तिला तारीख दिसली, 20 जून.
मन सर्रकन आठ वर्षे मागे गेले. हॉस्पिटलमधील बेडवर विकलांगावस्थेत झुंजणाऱ्या संदीपची प्रतिमा मोठी मोठी होत दृष्टीभर व्यापून उरली. त्या वेळेची घालमेल, जीवन-मरणाच्या उलाघालीत भाजून निघताना आलेली हताश असहाय्यता.... सगळे सगळे ती क्षणभर पुन्हा जगली.
मिसाळांमुळे संदीप वाचला. त्याच्या जिवाचे मोल कसे करायचे? तिने सभोवती बघितले. हे घर, बहरत चाललेले ऐश्वर्य, समाधानी आयुष्य...सर्वच दुखण्यातून उठलेल्या संदीपने आणि तिने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. दुखण्यातून उठलेल्या...मिसाळांच्या मदतीने....मिसाळ मिसाळ मिसाळ!
विचारांचा कल्लोळ असह्य होऊन तिने अभावितपणे कान झाकून घेतले. चारही भिंतींवरून मिसाळांची ती भेदक नजर आपल्या आरपार जात आहे आणि यापुढे सतत घरात, शाळेत, उठता, बसता परिस्थितीमुळे स्वीकारलेल्या उपकारांचे ओझे आणि एका जिवाच्या हत्येचे पाप डोक्यावर वागवत आपल्याला जगावे लागणार आहे या जाणिवेने ती गलितगात्र होऊन गेली.
तिचा श्वास कोंडून घशाला कोरड पडली. पाण्याच्या शोषाने ती फ्रीजकडे धावली. फ्रीज उघडणार इतक्यात हॉलमधील फोन कर्कश्श वाजू लागला आणि तो मिसाळांचाच असणार या जीवघेण्या खात्रीने तिच्या आत आत एक काटेरी शहारा तिला ओरबाडत उमटत खोलवर दुखावत गेला.