काही प्रश्नांची उत्तर आपल्या क्रियेतून द्यावीत...ह्या कथेच्या शेवटी तेच झालं आहे.
पंच – उमेश घेवरीकर
'काय र पोरा, डोळे लयीच लालेलाल? रातभर जागेच व्हता काय? जात पंचायतीच्या प्रमुखानं सत्याला इचारलं. त्यावर बाकीचे पंच एकमेकाला टाळ्या देत मोठ्यांनी हासले. सत्यानी भेदक नजरन त्या म्हाताऱ्या पंचाकड पाह्यल..त्यो पंचावर उपसणार तितक्यात तेच्या बापानी त्याचा हात दाबून 'शांत ऱ्हावा' अस खुनिवल. सत्याच परवाच लगीन झालेलं रुपीशी..ती आणि तिचा बाप बी पंचायती म्होर हात जोडून उभे व्ह्ते गुन्हेगारागत...रुपीच्या हातात पांढर कापड व्हत..पंचांनी पुराव्यासाठी दिल्याल ...
बर काय माल खरा नव्ह? म्हातारा पंचप्रमुख तात्या बारीक नजरन रुपीकड पाहत म्हणला, सत्याच्या डोस्क्यात तिडीकच गेली. रुपीचा बाप हात जोडून उभा तर रुपीला मेल्याऊन मेल्यागत झालं..दुसरा जवान पंच मिशीला पीळ देत रुपीकड निर्र्खून पाहत म्हणला,
“तात्या निस्त इचारता काय? पुरावाच तपासा ना? ए पोरी आन ते कापड इकड..रुपीन खाल मानेन पंचानी दिलेलं ते पांढर कापड मुख्य पंचाकड दिलं. कापड कसल तिच्या कुमारी असण्याचा पुरावाच त्यो...धपापत्या उरान ती खाल मानेन बापाजवळ येऊन उभी राह्यली..” तात्यान ते कापड समद्यांना दिसन अस उलगडून पाह्यलं आन एकाएकी त्यो खुर्चीतून उठून उभा राह्यला त्यान ते कापड रुपीच्या अंगावर फेकलं आन म्हणाला,
‘ हे तर कोरच हाय ..उल्साक बी डाग न्ह्याय याच्यावर...म्हणजी माल खोटा म्हणायचा”
रुपी काकुळतीन म्हणली,
'आओ माज एकूण तर घ्यावा माजा कायबी दोष न्हाई..म्या पोलीस भरतीला गेल्ते लग्नाआधी..आन दरोज २ मैल सायकल वरून कोलेजला जायची हे अस काय बी नसतंय..' .
तिचा बाप बी पंचाच्या पाया पडत म्हणला ,
'आओ ऐका देवा, पोरीचा काय बी दोष न्हाय.'. पर कोणीबी त्याच आयकंना रुपी धाय मोकलून रडत व्हती ह्या अपमानान..सत्याच्या मस्तकाची शीर तडतडत व्हती
तात्यांनी निर्णय दिला,
'कापड कोर निघालं म्हंजी ह्यो माल बाद्गड हाय, पोरांन पोरीला काडीमोड देयाचा आन पोरीच्या बापानं पंचायती कड एक लाख जमा करायचे दोन दिसात...फसवणूक केली म्हणून..सत्याचा बाप पंचाच्या पाया पडून 'मंजूर' म्हणला आन सत्याला घराकड नेयू लागला. पार सत्या जागीच उभा व्हता...रुपिचा बाप पंचाच्या पाया पडून रडत म्हणाला,, आता कस व्हयाचा पोरीचं? अन्याय नका करू लेकरावर..देवा औक्ष कस काढीन ती?”
तसा जवान पंच मग्रुरीन म्हनला,
'देखणी हाय कोणीबी ठेवीन तिला' ,,,”
सत्या उसळून थेट पारावर धावला..त्या पंचाची गचांडी धरून ओरडला,
'गप बसा.. नायतर.'.
समदे आवाक..पंच तात्याल्ला म्हणाला,
'लय माजलेत जाती भायेरच टाका..'
सत्याचा बाप गयावया करू लागला..सत्या म्हणला,
“काल राती जे झाल त्यात ह्या पोरीचा काय बी दोष न्हाय..दोष मजाच आह्य..मलाच काय जमल न्हाय ..”
जवान खुनशीन पंच म्हणला
'म्हणजी तू माणसात?'
सत्यान तेच्याकड रागान पाहतांच त्यो गपगार. रुपी म्हणली,
' न्ह्याय हे खोट हाय हे..आओ, अस काय करता .'.
तिला मधीच थांबत सत्या म्हनला,
“अग.. एका रातीची वळख आपली..आन मह्यासाठी तू का बदनाम व्ह्तीस याय्ह्नी तुह्या शीलावर शितीडे उडीवले घेतली तरी?”
रुपी डोळ्यात पाणी आणून म्हणली,
'लगीन झालाय आपलं, तुमचा अपमान कसा सहन करीन,,आपला एकजीव आता...'
सत्या समद्या पंचाला म्हणाला,
'पाह्य्लात हिच्या निम्मी बी अक्कल न्हाय तुमाला..तुमी देवाचे अवतार न मंग ऐका नवरा-बायकुच्या मधी बोलायचा अधिकार त देवांला बी नसतोय ना.. निघा तुम्ही...आम्ही आमच पाहून घेऊ...'
तसा तात्या नावाचा देव माणूस वरडला.
‘मायला तुमच्या, आताच्या आता जातीभायेर टाकतो मंग कळन आर जात पंचायत म्हणजी साक्षात देव आन पंच म्न्ह्जी देवाचे अवतार आमचा अपमान?'
एवढ्यात आक्रीत घडलं...रुपी तिच्या बापाचा हात सोडून पंचाच्या पारावर गेली समदे आवाक..आत्ता पहूत कवाच कोणच्या पोरीन अशी हिम्मत केली नवती जातीत...रुपी सत्याच्या बाजूला जाऊन उभी र्हायली त्याचा हात हातात घेऊन पंचाला म्हणली,
'जी जात माणसाला आन माणुसकीला मानत न्हायी, समजून घेत न्हायी ती जात आमालाच नकोय..तुमी कशाला जाती बाहेर काढताय आमला आम्हीच तुमच्या जातीतून भायेर पडतोय”
सत्या अभिमानानं तिच्याकड पहात रहायला. पंच आकांडतांडव करीत शिव्या शाप देत निघाले..दोघांचे बाप त्यांच्या माग माग धावले..पारावर सत्या आन रुपी दोघाच उरले..सत्या रुपीला म्हणला,
'काल रातच्याला जे झाल,,,’
तशी रुपी त्याला थांबवत म्हणली म्हणली,
“आपण शिकलेलो हाय, थकवा, दडपण,,यामूळ झाल असन...नवरा बायकुच्या नात्यात ईश्वास ह्योच देव..पंचायतीच्या इरोधात जाऊन चारचौघात माजी बाजू घेतलीत खर बोललात अजुक्च प्रेमात पडले मी तुमच्या..अजून काय पाहिजी मला..पर एक इचारू? जाती बिगर खरच जगता नाह्यी यायचं व्ह्य माणसाला?”
सत्याला तिला कायतरी सांगायचं व्हत अगदी मनातलं आन खर...लई दिसापासून त्याच्या मनात साचाल्या कोणीतरी बोलला व्हत..पर त्याला शब्दच सुचानात त्यांनी तिच्या डोळ्यात खोलवर पाहयल.. तिच्या तोंडावरून मायेन हात फिरवला तिचा हात हात घेतला आन. ती दोघ हातात हात घालून चालू लागली एका नव्या दिशेन....!!!!!