अलीकडे वाचलेल्या कथांमधील खूप उजवी कथा....अक्षय....कथा लेखनावर लक्ष केंद्रित कर...
कुकारा – अक्षय प्रभाकर वाटवे
लवंगी फटाक्यांची माळ तडतडावी तसा खळ्यातल्या पत्र्यावर भर दुपारी पाऊस अचानक तडतडायचा. अचानक पुढच्या पडवी पासून माजघर, कोठीची खोली, स्वयंपाकघर ते पार न्हाणीघर ओलांडून मागच्या पडवी पर्यंत धावपळ सुरू व्हायची. सोल, गरे, तिरफळं, काजी, उकडे तांदूळ, कांडायला द्यायचं पोह्यांच भात, तेलाची घुडघुडी असे एक ना अनेक पदार्थ; वाळूत उन खात पडलेल्या गोऱ्या साहेबीणी सारखे खळ्यात वाळत पडलेले असायचे.. त्या शिवाय वाळत घातलेली धुणी,शेणी लाकडं असं बरंच काय काय...
अचानक अश्या सरींचा हमला झाला की समस्त महिला मंडळाची दाणादाण उडायची मात्र या सेनेची कप्तान म्हणजे काष्टी पातळ नेसणारी, गोरी-गोमटी, कापूस पिंजरून ठेवावा तश्या केसांची, रेखीव गोल कुंकू लावणारी, जादुई स्पर्श असलेल्या मऊसूत हातांची आज्जी मात्र शांत असायची आपल्या घाऱ्या डोळ्यांनी अचानक आक्रमण केलेल्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी ती ओसरीच्या पायऱ्यांवर यायची. तोपर्यंत आई, मोठी, मधली, धाकटी अश्या तीन काकी, सुलू, बेबी आत्या, अण्णा, दादा, भाऊ हे तिन्ही काका, बाबा, गोरवं बघणारे ब्रह्महचारी न्हानू आजोबा, ह्या घरच्या सर्वांनी आपापल्या आघाड्या सांभाळत जेजे घराबाहेर असेल तेते माजघरात आणून पसरलेलं असायचं तो पर्यंत आजीच्या नेतृत्वाखाली वीणा, रेखा, आशा, कावेरी, माली,सुमन या तायांनी सामानाची योग्य आणि सुरक्षित जागी मांडणी केलेली असायची. जोडीला कच्चे लिंबू असायचे. अश्या आणीबाणीच्या वेळी मात्र त्यांना पूर्ण दुर्लक्षित केलं जायचं खरंतर..बाकी गाईगुरं, शेणी-सोळपं, न्हाणीचं जळण उरलेलं सुरलेलं बघण्यासाठी गंगी असायची आणि जोडीला शांतू असायचा. तात्या आजोबा मात्र व्हाळा पलीकडे शेतातल्या मांगरात गेलेले.
इकडे सरींनी जोर धरलेला असायचा त्याही पेक्षा वाऱ्याने स्पर्धा पुकारलेली असायाची. खालच्या अंगाच्या विहिरीच्या शेजारी असलेल्या बांबूच्या बेटातून शीळ ऐकू यायची. तीन वाजता सुरू झालेली ही रणधुमाळी साडे सहाच्या आसपास शांत होऊ लागायची. गरम गरम चहाची एक फेरी व्हायची. पाऊस-वारा आणि त्याजोरावर सुरू झालेली चर्चा तरवा कधी लावायला घ्यायचा इथवर येऊन ठेपायची. आज्जी मात्र माजघराच्या उंबरठ्यावर एक दोन खेपा घालून जायची कारण शेतातल्या मांगरात गेलेले तात्या आजोबा अजून परतलेले नसायचे.
पाऊस थांबलेला. अंगणात तुळशीपुढे थोरलीने लावलेलं मंद तेवणारं निरांजन. घड्याळाच्या काट्याने सातची सीमा ओलांडलेली. अण्णा काकाच्या आणि बाबाच्या कपाळावर सूक्ष्म आठी. कच्चे लिंबू आणि दादा लोकं सगळे एका सुरात रामरक्षा म्हणण्यात मग्न. जानव्याने पाठ खाजवत खळ्यात न्हानू आजोबांच्या येरझऱ्या. आणि एवढ्यात विहिरीकडच्या बांबूच्या बेटाच्या दिशेने येणारा कुकारा...
हा कुकारा क्षणात सगळा तणाव दूर करतो. पाठोपाठ बॅटरीचा झोत अंगणात पडतो. खळ्याच्या मेरेवर हातपाय धुवून डोक्याचा पंचा काढून पिळून झटकून तोंडाने 'शिव-शिव-शिव' म्हणत ओट्यावर टेकून मधलीने आणून दिलेलं पाण्याचं फुलपात्र घटाघटा संपवून तात्या आजोबा दीर्घ श्वास घेतात..आणि माजघराच्या उंबऱ्यावर उभे राहून स्वयंपाक घराच्या दिशेने उद्देशून 'अहो..' अशी हाक मारतात.
आणि पाठोपाठ आजीचं उत्तर येतं,
'होय, धाकटीकडे चहा पाठवलाय'
आजोबा म्हणतात,
'मी काय म्हणतो'
स्वयंपाक घरातून उत्तर येतं,
'होय होय सुलुने घेतलाय कांदा चिरायला.'
आज्जीचं हे उत्तर ऐकल्यावर स्वयंपाक घरात खसखस पिकते. तोंडाला पदर लावून हसू आवरत धाकटी चहाचा कप आणते. वाफाळत्या चहाचा एक घोट घेऊन तात्या आजोबा तमाम कच्च्या निंबूंना आवाज देतात..
'चला रे पोरांनो, भजी खायला'
स्वयंपाक घराच्या कोनाड्यातून बघणाऱ्या आजीकडे पाहून मिशीतल्या मिशीत हसतात.