व्यक्तीचित्रणात्मक कथांची एक वेगळी गंमत असते....बापू त्या कसोटीला पूर्ण उतरते.
बापू – राजेंद्र गायकवाड (संपादन आणि तपासणी – शिवकन्या शशी)
माझ्या घरापासून दोन घरे पलिकडे एक चौसोपी वाडा होता. बापूंचा. बापू म्हणजे माझ्या वडिलांचे चुलत भाऊ. अर्थात माझे काका. बापू जन्माला येतानाच दोन गोष्टी घेऊन आले होते. एक- प्रचंड इस्टेट आणि दुसरे खवचट बोलणे.
बापूंना भाऊ बहिण कोणीच नव्हते व जवळपास ४० एकर जमीन होती. तरूण होईपर्यंत आईवडीलांनी सांभाळले. नंतर लग्न झाले तर सासरे आमदार होते.. यशवंतरावांच्या काळात. त्यांना एकुलती एक मुलगी होती. ती म्हणजे माझी काकू. तिकडची गडगंज इस्टेट मिळाली. म्हणजे तरूणपणानंतर सासर्यांनी सांभाळले आणि वृदधापकाळी मुलांनी. आयुष्यभर दोन मुले काढण्याव्यतिरिक्त कोणतेही भरीव काम बापूंनी केले नाही. पांढराशुभ्र नेहरू सदरा, एकटांगी धोतर आणि किंचित तिरपा कोना असलेली परिट घडीची टोपी. चेहर्यावर भाव सतत ... याची मारू की त्याची मारू!
सकाळी एक दीड भाकरीदूध खावून निघाले की सरळ चावडीवर येवून बसायचे आणि येणार्या जाणारयाला टोचा मारत बसायचे हा एकमेव धंदा. चारचौघात लोकांची इज्जत काढण्यात त्यांना कोण आनंद मिळे!!
" काय विठठलराव.. मुलीच्या डायवोरसची केस कुठपर्यंत आली?"
मुलीचे दुःख म्हणजे कुठल्याही बापाच्या काळजात रूतलेला काटा. तो असा उपसून बापू त्यातून भळभळा रक्त काढायचे.
“लक्ष्मण, अरे का भावजयीला त्रास देतो? देवून टाक इस्टेटीतला वाटा. का तिचे शिव्या शाप घेतो?" .. लक्ष्मण निघाला खाली मान घालून.
“मारतंडराव, तुमच्या थोरल्याने संध्याकाळची बैठक सुरू केली असे ऐकतो, खरे आहे का?"
बापूचा लोकांनी एवढा धसका घेतला होता, की बापू लांबून दिसताच लोक रस्ता बदलून दुसर्या रस्त्याने जात असत. खिजवणयासाठी बापूला वयाचे बंधन नव्हते. माझ्या सारख्या शाळकरी पोरालाही ते सोडत नसत. आम्ही भावंडे दिसलो की,
" तुझ्या बापाचे बरे आहे बुवा. चारी पोरे हुशार निघाली. हा आता इकडे दारू प्यायला मोकळा."
एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घालावा अशी इच्छा व्हायची.
बापू बाहेर कितीही गमजा करीत असला तरी घरी मात्र आवाज निघत नसे. काकू बऱ्यापैकी जहाल होती. एकदा काकूने मला बोलावले व सांगितले,
"राजा, बघ रे, तुझा काका कुठं गेलाय? म्हणावं, उकिरडे फुंकून झाले असतील तर घरी बोलावले."
मी उड्या मारत चावडीवर गेलो. बापू चांडाळ चौकडी घेवून बसलेलेच होते. मी जोरात ओरडून सांगितले,
"बापू, काकू म्हणत होत्या, उकिरडे फुंकून झाले असतील तर घरी या."
चावडीवर हसणयाची लहर उमटली आणि बापू कांढावला.
आणखी एकदा काकूने निरोप दिला,
" जा तुझ्या काकाला शोधून आण. सककाळपासून कोठे शेण खायला गेले कोणाला ठाऊक?"
मी बापूला गावात बरोबर शोधला व जोरात ओरडून सांगितलं, " बापू, शेण खावून झाले असेल तर तुम्हाला घरी बोलावले आहे.”
सगळा गाव ज्या बापूला बघून रस्ता बदलायचा, तो बापू मला बघून रस्ता बदलू लागला.
मयतीला गेल्यावर तर बापूच्या अंगातच यायचं. तिकडे चिता पेटते न पेटते, बापू माईक ताब्यात घ्यायचे.
“उपस्थित दुःखी जनहो, आज आपल्या सर्वांचे लाडके रावसाहेब आपल्याला पोरकं करून आपल्यातून निघून भगवंताला भेटायला गेले आहेत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे अशक्य आहे. समाज सेवा करत असताना त्यांनी कधीही कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. घरात दोन बायकांचा पसारा असतानाही त्यांचं बाहेर झेंगट होतं. पण त्याचा ओघळ कधी त्यांनी घरापर्यंत येवू दिला नाही....."
"आज आपले सर्वांचे मामा तथा सरपंच, आपल्यातून निघून गेले. उत्तर आयुष्यात त्यांच्यावर ग्राम सडक योजनेत पैसे खाल्ल्याचा आरोप झाला. पण मामा, सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास ग्वाही देवू इच्छितो की तुमच्यावरचा हा आरोप निघत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही."
असा हा बिलंदर बापू. एके दिवशी अचानक निरोप आला की सासरवाडीच्या इस्टेटीवर गेलेल्या मुलाला इलेकटरीकचा शॉक लागून तो दगावला. चार सहा महिन्याच्या आत गावातील मुलगा तीव्र ह्रदयविकाराच्या धक्क्याने गेला. तेव्हापासून बापू मात्र खचला. दोन्ही मुलांच्या अशा अचानक जाण्याने काकूने जे अंथरूण धरले, ती परत उठली नाही. वर्षभराच्या आत काकूचाही खेळ आवरला. दोन्ही सुना इस्टेटीवरचा हक्क अबाधित राखून नातवंडांना घेवून माहेरी निघून गेल्या. नातवंडांच्या नाजूक सहवासासाठी हपापलेला बापू टाहो फोडून रडला.
नंतर मी केव्हाही गावाकडे गेलो की बापू वरांडयात बसलेला दिसत असे.. शून्यात बघत. शेजारून कोणी गेले तरी बघत नसे. चोवीसतास परीट घडीच्या कपड्यात असणारा बापू फाटक्या बंडीवर उकीडवा, आकाशात बघत असे. तीन वर्षांपूर्वी बापू गेला. दोन दिवस प्रेत घरात पडून होते. दोन दिवसांनंतर बापू गेल्याचे दुनियेला कळाले. बापूच्या मयतीला कोणाचेही भाषण झाले नाही......