हे जगणे आहे...अतिटतीवरचे....
जगणे – विनया पिंपळे
"मनू..."
"हं...."
"बरेच दिवसांपासून बोलेन बोलेन म्हणतेय... पण एक तर तुला वेळ नसतो किंवा मी कामात गुंतलेली असते... शिवाय ह्या अशा गोष्टीवर तुझ्याशी बोलू की नको हाही विचार करत होतेच म्हणा..."
"... आई, एक सांगू ?..."
"हं..."
"तू कशाबद्दल बोलणार आहेस याचा अंदाज आलाय मला...आणि मी बोलायला तयार आहे... तू बोल तुला काय बोलायचं ते..."
"मनू, तुझे बाबा गेले आणि...."
"आई प्लीज... कुठल्याच पार्श्वभूमीचं वर्णन करू नको. बाबा गेल्यानंतरचे सगळे दिवस आपण सोबत काढलेले आहेत. अडचणी, जबाबदाऱ्या, आर्थिक प्रश्न या सगळ्यांवर तू आणि मी सारख्याच राबलोय. त्यामुळे विचारण्यासाठी भूमिका बांधू नको. वातावरण निवळण्याऐवजी आणखी संकोच निर्माण होतो. गुंता वाढतो. थेट विचारलं तर आवडेल मला."
"... मग सांग तुझं आणि राजेशचं तसलं काही आहे का?…."
"… तसलं काही ... म्हणजे लफडं वगैरे असं म्हणायचंय तुला... हो नं?" "मनू ss !! तुझ्या जिभेला काही हाड??…… जी गोष्ट तुझ्याशी कशी बोलू किंवा बोलू की नाही याचा विचार मी गेली कित्येक दिवस करतेय ती तू अशी डायरेक बोलतेस??.… म्हणे लफडं...श्शी !!"
"बोलू की नको असा विचार तू का करत होतीस आई??"
"……"
"मी सांगते. कारण मी जे म्हणाले नं अगदी तेच तुला म्हणायचं होतं. फक्त तू जरा वेगळे शब्द वापरले असते. किंवा न बोलताही त्याच अर्थाचं तुला बोलायचं होतं. बोलण्या न बोलण्याने अर्थाची तीव्रता कमी होते का गं?…"
"... पण मी काय म्हणते. निदान आपलं वय काय, आपण करतोय काय याचा तरी काही विचार??…… आणि लोक काहीबाही बोलतील ते ही एक वेगळंच.."
"मान्य !……अगदी पोरीसोरींसारखं वागावं असं वय नाहीय माझं..पण ज्यावेळी ते होतं तेव्हा मी काकूबाईसारखं वागत होते. त्यावेळी काहीच हरकत नव्हती घेतली तू...आणि लोकांचं सोड. त्यांनी घालून दिलेल्या चौकटीत राहून जीव गुदमरतोय माझा. लोकांनी ठरवलं म्हणून मुलगी परक्याचं धन असते. लोकांनी ठरवलं म्हणून लग्नानंतर तिनं सासरचीच जबाबदारी घ्यायची असते. लोकांनी ठरवलं म्हणून माहेरी मदत करायला तिला सासरची परवानगी लागते. लोकांनी हे ठरवलं...लोकांनी ते ठरवलं...लोकं असं म्हणतील...लोकं तसं म्हणतील...लोकांच्या भीतीपायीच लग्न नाही केलं मी...पण आता जगेन म्हणते थोडं स्वतःसाठी.."
"बरं... लोकांसाठी नाही ...पण सुमी आणि पिऊ दोघींसाठी तरी..."
"दोघींसाठी जे काही करायचं होतं ते केलं मी आई...आता इथून पुढे तरी त्यांच्यासाठी माझ्या आयुष्याचा बळी जाऊ द्यायचा नाहीय मला...तुझा सांभाळ करेन मी आयुष्यभर...पण आता माझ्या अटींवर. माझं माझ्यासाठी जगणं तुला सहन होत नसेल तर माझा नाईलाज आहे.."
"बरं sss पण ज्याच्या भरवश्यावर इतकं बोलतेयस तो तुझ्याशी प्रामाणिक आहे...??"
"प्रामाणिक...??……आमची निखळ मैत्री आहे आई... आणि मैत्रीत असावं तितका प्रामाणिक तो नक्कीच आहे. लोकांना आमच्या मैत्रीत लफडं दिसतं हा लोकांचा दोष! त्याच्याशी बोलतांना मला माझ्या अस्तित्वाचे निराळे पदर जाणवतात, एका कर्तव्यपूर्तीच्या पलीकडेही माझ्या आयुष्याला निराळा अर्थ आहे हे केवळ तोच मला पटवून देऊ शकला...मी 'मी' आहे याची जाणीव त्याने करून दिली. मी मुलगी असूनही माझ्या जबाबदाऱ्यांसह माझ्या आनंदाशी कुठलीही तडजोड न करता जगू शकते हे भान मला त्याने मिळवून दिलं... म्हणूनच मी आता माझ्या मनाप्रमाणे जगणार आहे आई... मुक्त... अगदी मुक्त..."